मराठवाडयाला पाणी दिले पाहिजे याला विरोध असण्याचे कारण नाही. पंरतु पाणी देण्याचे धोरण एकमेकांना पूरक असायला हवे होते, मात्र आपल्याकडील मंडळींनी माझ्याबरोबर एकत्र भूमिका मांडली असती तर ही वेळ आली नसती, असा टोला राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार मधुकर पिचड व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची नावे न घेता हाणला.
राहाता व चिंचपूर येथे विविध कृषी अवजारे व साहित्य वितरण कार्यक्रम प्रसंगी आयोजित केलेल्या मेळाव्यात विखे बोलत होते. यावेळी जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हा कृषि अधीक्षक पंडित लोणारे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले यांच्या सह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
विखे म्हणाले की, मराठवाडयाला पाणी सोडतांना राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष पिचड यांना राज्याची तर थोरात यांना औरंगाबादचे पालकमंत्री म्हणून भूमिका मांडायची होती, त्यामुळे या प्रश्नात दोघांची अडचण झाली. आपल्या भागातील लोकांचे हित महत्वाचे होते त्यावेळी मात्र सर्वानी गप्प बसण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील धरणांची पाणी परिस्थिती पाहून नियोजन केले. पंरतु महसूल व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी केवळ कागदोपत्री पाण्याच्या आकडेवारीचे घोडे दामटल्याने प्रवरा व गोदावरी खो-यातील शेतक-यांना पाणी मिळाले नाही.
इंडिया बुल्सला पाणी आरक्षित केले तेव्हा मी आवाज उठवला, गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी कोणी एकत्र आले नाही, पाणी उपलब्ध करायचे सोडून कोपरगांवचे नेते राजकारण करीत बसले. प्रादेशिक वाद घालणे आणि टीका करणे याऐवजी सर्वानी राजकीय जोडे बाजूला ठेवून तुटीच्या गोदावरी खोऱ्यात जादा पाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मंत्री विखे यांनी केले.
पुढाऱ्यांच्या आशीर्वादावर निघालेल्या रोपवाटिकांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात खते व बियांणाचा काळाबाजार कोठेच होत नाही असा दावा विखे यांनी केला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी पंडित लोणारे, जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांची भाषणे झाली.