एकिकडे छापे, दुसरीकडे निदर्शने

वेगवेगळ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांत गुन्हे दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या घरांसह कार्यालयावर छापे टाकत…

वेगवेगळ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणांत गुन्हे दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी माजी सार्वजनिक मंत्री छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या घरांसह कार्यालयावर छापे टाकत बेनामी मालमत्तेचा शोध सुरू केला असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत भुजबळ यांच्यावरील हे राजकीय षडयंत्र थांबविण्याची मागणी केली. या घडामोडीत पक्षाने भुजबळ यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र असले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाद्वारे हे सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.
nashikbhujbal-andolanसार्वजनिक बांधकाम खात्याची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणाऱ्या भुजबळांचे नांव मागील चार ते पाच वर्षांत अनेक प्रकरणांशी जोडले गेले. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आम आदमी पक्षाने त्यांच्या डोळे दीपविणाऱ्या मालमत्तेची आकडेवारी सादर करत चौकशीची वारंवार मागणी केली होती. तथापि, काँग्रेस आघाडीच्या काळात ती मान्य झाली नाही.
महाराष्ट्र सदन व अन्य काही गैरव्यवहार प्रकरणी अलीकडेच गुन्हे दाखल झाल्यानंतर या खात्यातील अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकल्यावर कोटय़वधींची मालमत्ता उघड झाली होती. याच तपासातील पुढील अध्याय खुद्द भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेच्या झडतीसत्राद्वारे सुरू झाला.
आ. छगन भुजबळ, आ. पंकज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या राज्यातील इतर मालमत्तांसह नाशिक जिल्ह्यातील घर व कार्यालयांत सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक धडकले. भुजबळ फार्म येथील चंद्राई व राम बंगला, राजेशाही थाटाची आठवण करून देणारा आणि फारसे कोणालाही दृष्टीपथास न पडलेला भुजबळ पॅलेस, येवला येथील बंगला आणि कार्यालय, मनमाड येथील बंगला आणि कार्यालय आदींची एकाचवेळी तपासणी सुरू केली. घरात सापडलेली कागदपत्रे आणि तत्सम बाबींची छाननी सुरू असली तरी तपास अधिकाऱ्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला.

या घडामोडी सुरू असताना राष्ट्रवादी जिल्हा-शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यात ठाण मांडून काही काळ वाहतुकही रोखून धरली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्यावर भाजप-शिवसेना युती सरकार राजकीय सुडातून गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. भुजबळ यांच्यावर ज्या आरोपांवरून गुन्हे दाखल केले जात आहेत, ते निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह मिंत्रमंडळाने व उपसमित्यांनी घेतले आहेत. त्यात एकटय़ा भुजबळांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. गुन्हे दाखल करण्यापूर्वी या प्रकरणाची योग्य शहानिशा करणे आवश्यक होते. भुजबळांना राजकारणातुन संपविण्यासाठी राजकीय द्वेषातून ही कारवाई होत आहे. विधीमंडळात भुजबळांनी सरकारला धारेवर धरले. त्यांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधारी सुडाचे राजकारण करत असून या प्रकरणात भुजबळ कुटुंबियांना गोवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत हे षडयंत्र त्वरित रोखावे अशी मागणी निवेदनाद्वारे आंदोलकांनी केली.

भुजबळ कुटुंबिय संपर्क क्षेत्राबाहेर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुजबळ कुटुंबियांच्या मालमत्तेचे झडतीसत्र आरंभले असताना माजीमंत्री आ. छगन भुजबळ, त्यांचे पुत्र आ. पंकज आणि पुतणे माजी खासदार समीर हे नाशिकमध्ये नव्हते. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्याची माहिती मिळाल्यावर काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांचे दूरध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले गेले. शहरातील भुजबळ फार्म येथे तीन बंगले आहेत. या ठिकाणी काही निकटचे नातेवाईक वगळता प्रमुख व्यक्तींपैकी कोणी उपस्थित नव्हते. मनमाड व येवला येथील कार्यालयाची जबाबदारी काही व्यक्तींवर सोपवण्यात आली आहे. तपासणीवेळी तेच कार्यालयात होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या कारवाईविरोधात आंदोलन केले. निकटच्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. तथापि, सकाळपासून कोणाशी संपर्क होऊ शकला नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

अखेर महालाचे दरवाजे किलकिले..

एखाद्या राजे-रजवाडय़ांच्या ऐश्वर्यसंपन्नतेची प्रचिती देणाऱ्या भुजबळ फार्ममधील कोटय़वधी रुपयांच्या भव्य हवेलीचे ‘दूर’दर्शन छाप्याच्या निमित्ताने सर्वाना झाले. भुजबळ कुटुंबियांशी संबंधित अगदी मोजक्याच व्यक्तींना या अलिशान हवेलीचे दरवाजे उघडे होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडतीसत्र सुरू केल्यावर भुजबळ फार्ममध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बाहेर रोखून धरले. परंतु, आजपर्यंत केवळ चर्चेत असणाऱ्या भव्यदिव्य हवेलीचे रुप समोर आले. गतवर्षी या महालात भुजबळ कुटुंबिय वास्तव्यास गेले होते. भुजबळ कुटुंबियांची शहराच्या मध्यवस्तीत मुंबई-आग्रा महामार्गावर सिडकोजवळ बरीच मोठी जागा आहे. हाच परिसर भुजबळ फार्म म्हणून ओळखला जातो. हा संपूर्ण परिसर सात ते आठ फूट उंचीच्या संरक्षण भिंत आणि त्यालगत उंच झाडांनी वेढलेला असल्याने नव्याने बांधलेली ही वास्तु दृष्टीस पडत नव्हती. ३० हजार चौरस फूट आकाराच्या या महालाचे बांधकाम जवळपास दोन वर्ष चालल्याचे सांगितले जाते. महालाकडे जाण्यास सर्वाना मज्जाव होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी त्याबाबत केवळ ऐकून होते. महालाकडे कोणी जाऊ नये म्हणून खास सुरक्षारक्षक तैनात असत. मात्र, तपासणी सुरू झाल्यावर या महालाची भव्यता सर्वाच्या दृष्टीपथास आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raids on the property of chagan bhujbal in nashik

ताज्या बातम्या