शिवसेनेत मोठय़ा प्रमाणात झालेली बंडखोरी, भाजपमध्ये ताई-माईंची सुरू झालेली भांडणे, उन्हाळा, सुट्टीचा माहोल, जत्रा, गावी जाण्याची लगबग, लगीनसराई, गुजराती समाजाचे अक्षयतृतीयांच्या निमित्ताने होणारे सीमोल्लंघन या सर्व कारणांमुळे कमी होणारे मतदान राष्ट्रवादीला संजीवनी देणारे ठरण्याची शक्यता आहे. युतीतील बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
क्रिकेटच्या सामन्यात सामना जिंकण्याची पूर्णपणे खात्री झाल्यामुळे क्रीडारसिकांमध्ये उल्हास, उत्साह आणि आनंद द्विगुणित ओसंडून वाहत असतानाच शेवटचा फलंदाज त्रिफळाचीत व्हावा, अशी काहीशी स्थिती नवी मुंबईतील शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांत झाली आहे. त्यामुळे केंद्र व राज्यात झालेले सत्तापरिवर्तन, घराणेशाहीला विटलेली जनता, वीस वर्षांत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तयार झालेली मानसिकता यामुळे सत्ता येणे मुश्कील असल्याची खात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता कुठे आशेचा किरण दिसू लागला आहे. शिंदेशाही आणि नाहटाशाहीने उमेदवारी वाटपात घातलेला गोंधळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे. सेनेच्या एकधिकारशाहीमुळे ४१ बंडखोर निवडणूक रिंगणात उतरले असून त्यातील बहुतांशी उमेदवार सेनेच्या उमेदवारांना पाडण्याच्या ताकदीचे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात टाकण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या छावणीपैकी एक छावणी पडलेल्या घणसोली गावातून मंगळवारी जुन्याजाणत्या शिवसैनिकांनी आपल्या नेतृत्वांना आव्हान दिले. उमेदवारी देताना ऐन वेळी तोंडघशी पाडलेल्या उमेदवारांनी भावनांना आवर घालून पुन्हा पक्षात न परतण्याची काही जणांनी शपथदेखील घेतली. त्यामुळे ४१ बंडखोरांपैकी ५० टक्के बंडखोरांनीही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना अडचणीत आणल्यास ती बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फायद्याची ठरणार आहे. हे बंडखोर कोणत्याही स्थितीत माघार घेण्यास तयार नसून पक्षनेतृत्वाला धडा शिकविण्याच्या दृष्टीने त्यांनी एल्गार केला आहे. शिवसेनेचा ‘खेळ मांडला’ गेला आहे, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी दिली. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्या ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमाचे सहा प्रयोग नवी मुंबईत झाले होते. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने शिवसेनेच्या बाजूने एक वातावरणनिर्मिती झाली होती, पण नेत्यांनी याचा फायदा उठविण्याऐवजी पक्षाचा अक्षरश: खेळ मांडला आहे, अशीही उपरोधिक टीका आहे. शिवसेनेत अशी ही बंडाळी माजलेली असताना भाजप एकोप्याने काम करण्याऐवजी आमदार मंदा म्हात्रे विरुद्ध महासचिव वर्षां भोसले असा सामना या ठिकाणी सुरू झाला असून असून कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
शिवसेनेचे वर्चस्व वाढू नये यासाठी सेनेच्या ६८ प्रभागांत भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी हात वर केले आहेत. या दोन प्रमुख सुंदोपसंदीचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदा होणार असून शहरात राष्ट्रवादी विरुद्ध युती असा सामना आहे. काँग्रेस पक्ष म्हणून कार्यरत नसून काही आजीमाजी नगरसेवक आपले गड राखण्यात मश्गूल आहेत. त्यामुळे या पक्षाची उडी दोन आकडय़ापेक्षा जास्त जाणार नाही असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कोणत्याही पक्षाला किंवा युतीला बहुमत मिळणार नसून युतीच्याच कृपेने राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेकाप आपले खाते खोलणार आहे, पण ती फार समाधानकारक कामगिरी राहणार नाही. आरपीआय आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन मैदानात उतरलेल्या रबाले आंबेडकर नगरमधील सोनावणे मामाच्या दोन जागांवर दुसऱ्या पक्षांनी अगोदरच हार मानली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शनिवार-रविवारी सभा होणार आहेत. त्या या कार्यकर्त्यांत किती जान आणतात हे येणारे सात दिवस ठरविणार आहेत. काँग्रेससाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एक-दोन सभा घेणार आहेत.