लातूर, औसा व रेणापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ६ महिन्यांत स्वखर्चाने ४५ कोटी ४० लाख रुपयांचा गाळ उपसला. यंदा चांगला पाऊस झाल्यास सिंचनसाठय़ात चांगली वाढ होणार आहे.
या तीन तालुक्यांतील २ हजार ९८३ शेतकऱ्यांनी ५६ लाख ८७ हजार ७४६ घनमीटर गाळ काढला. शेतकऱ्यांना ३५ कोटी ६७ लाख ३५ हजार ७६० रुपये खर्च आला. शासकीय दराने गाळ काढला गेला असता तर त्याची रक्कम ४५ कोटी ४० लाख ७९ हजार ९२८ रुपये झाली असती. गाळ उपशामुळे सुमारे ५६ लाख ८७ हजार ७४६ घनमीटर पाणीसाठवण क्षमता वाढली. तीन तालुक्यांतील ४ हजार ७६ हेक्टर जमिनीवर गाळ पसरण्यात आला. २२ लाख १७ हजार ८२ मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. गाळ उपसण्यास ३ हजार ५०७ ट्रॅक्टर, १ हजार २८ टिप्पर, ९२९ जेसीबी व १ पोकलेन इतकी यंत्रसामग्री कार्यरत होती. गाळ काढण्यामुळे जे अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे, त्यातून ३ लाख ९७ हजार ४४ हेक्टर जमिनीवर अधिकचे सिंचन होणार आहे. गाळ काढण्याच्या मोहिमेत सर्वाधिक सहभाग औसा तालुक्याचा, त्याखालोखाल लातूर तालुक्याचा व नंतर रेणापूरचा असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी दिली. गाळ काढण्याच्या मोहिमेत शेतकऱ्यांनी मोठा सहभाग दिला. आता वरुणराजानेही आपला सहभाग द्यावा, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.