मल्याळम भाषेतील मासिक ‘काक्का’तर्फे १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत दोन दिवसांचा राष्ट्रीय साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘गेटवे लिटफेस्ट’या नावाने होणाऱ्या या महोत्सवात मराठीसह बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया आणि तमिळ या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. मुंबईत नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’येथे महोत्सवातील विविध कार्यक्रम होणार आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका प्रतिभा राय या महोत्सवास उपस्थित राहणार असून प्रादेशिक लिखाणाचे महत्व आणि प्रादेशिक साहित्य स्त्रोत या विषयी त्या आपले विचार मांडणार आहेत. ‘कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर स्वतंत्र परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी, गुजराती व मल्याळम आदी भाषांसाठीही स्वतंत्र चर्चासत्र होणार आहे.
महोत्सवातील विविध कार्यक्रम, चर्चा, परिसंवादात सितांशू यशचंद्र, नंदिता दास, सुबोध सरकार, लीना मणिमेकलई, हेमंत दिवटे, मलिका अमर शेख, सचिन केतकर, डॉ. महेश केळुस्कर, सतीश सोळांकूरकर, ई. व्ही. रामकृष्णन आणि त्या त्या प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक सहभागी होणार आहेत.