छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या वादामुळे सध्या राज्यात वर्षांतून दोन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. हिंदुत्ववाद्यांकडून एकदा तर शासनाकडून एकदा. हा वाद टाळून शिवजयंती कोणत्याही एकाच दिवशी साजरी करण्यासाठी येथील शिवशाही प्रतिष्टानने मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यास सुरुवात केले आहे.
वर्षांतून दोन किंवा तीन वेळा जयंती साजरी करणे योग्य नसल्याची भूमिका प्रतिष्ठानने मांडली आहे. फाल्गुन वद्य तृतीया असो किंवा अक्षय्यतृतीया असो, शिवजयंती कोणत्या तरी एकाच दिवशी साजरी करण्याची गरज आहे. हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांकडून एका दिवशी, तर शासनाकडून एका दिवशी शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे लहान मुलांनाही शिवजयंती वर्षांतून दोन वेळा साजरी करण्याचे प्रयोजन काय, हे कळेनासे झाले आहे. शिवजयंती एकाच दिवशी साजरी केल्यास शिवछत्रपतींची अस्मिता जपता येऊ शकेल, असे शिवशाही प्रतिष्ठानचे म्हणणे आहे. शिवजयंती कोणत्याही एकाच दिवशी साजरी करण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे ‘एक शिवजयंती- एक स्वाक्षरी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जमा होणाऱ्या स्वाक्षरीची प्रत मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, मनसे, भाजप यांसह इतर पक्षांच्या नेत्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.