काँग्रेसचे राजकारण जुलमी आणि लबाड असल्यानेच चार राज्यांत काँग्रेसला भुईसपाट केले आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राजकारणाचा खातमा युती करणार आहे. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागांसह दक्षिण विधानसभाही शिवसेना लढवणार आहे, अशी घोषणा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी रविवारी मेळाव्यात केली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या करवीर, दक्षिण विधानसभेच्या भागातील शिवसेना गटप्रमुख आणि पदाधिकारी मेळाव्यात अरुण दुधवडकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार चंद्रदीप नरके, युवा सेनेचे संपर्कप्रमुख राहुल खेडेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, महिला आघाडीप्रमुख शुभांगी साळोखे, युवा सेना अधिकारी हर्षल सुर्वे यांच्यासह आजी-माजी जि. प. आणि पं. स. सदस्य उपस्थित होते.
अरुण दुधवडकर म्हणाले, लोकसभेच्या तयारीला आतापासून लागणे गरजेचे आहे. काँग्रेसचे राजकारण जुलमी आणि लबाड आहे. मित्रपक्षांनी बेरजेचे राजकारण बघावे, असा सल्ला देत कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागांसह दक्षिण विधानसभाही शिवसेना लढविणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी काँग्रेसवाले नेहमीच पुढे असतात. त्यामुळे गावागावांत जावा, जनजागृती करा आणि उद्धव ठाकरेंना हवी अशी सेना निर्माण करा, असे सांगत आता गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या दोन्ही जागा तर जिंकणारच, पण दक्षिण विधानसभासुद्धा आम्ही सोडणार नाही. विरोधक पशाचा भडिमार करतील, पण कोणत्याही आमिषाला बळी पडायचा नाही आणि जोमाने काम करीत यंदा जिल्ह्यातून खासदार आणि आमदार निवडून आणण्याचा पणही त्यांनी या वेळी केला.
संजय पवार म्हणाले, काँग्रेसवाले यंग ब्रिगेड आणणार म्हणून सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण यंग ब्रिगेड आणा नाहीतर फायर ब्रिगेड आणा, आता काहीच उपयोग होणार नाही. कारण हे वारे काँग्रेसविरोधी आहे. चार राज्यांत काँग्रेसचा जो पराभव झाला, तसा आता संपूर्ण देशभर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या वेळी सेनेचा खासदार द्यायचाच आहे. या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवा सेनेचे संपर्कप्रमुख राहुल खेडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याच वेळी िहदवी िशदे या मुलीला शिवसेनेच्या वतीने हजार रुपयांची ठेवपावती देण्यात आली. या मेळाव्याला शिवसेनेचे कार्यकत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हर्षल सुर्वे यांनी मानले.