ऐन उन्हाळय़ात नदीला पाणी सोडले, आताही गोदावरी नदी दुथडी वाहात असतानाही कालवे बंद करून आघाडी सरकार शेतकऱ्यांना आयुष्यभर नरकयातना भोगायला लावत असल्याची टीका शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कमलाकर कोते यांनी केली.
गोदावरी कालव्यातून पुन्हा पाणी सोडावे व लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरून द्यावे यासाठी शिर्डी येथे शिवसेना भाजपच्या वतीने केलेल्या रास्ता रोका आंदोलनात कमलाकर कोते बोलत होते. पाणीप्रश्नाच्या बाबतीत आपण चोर चोर म्हणून भुई बडवत होतो. परंतु आपल्या मानगुटावर बसलेले भूत दुसरे तिसरे कोणी नसून, या भागाचे लोकप्रतिनिधी असल्याची टीका करून कमलाकर कोते यांनी केली. ते म्हणाले, तुमच्या मंत्रिपदाच्या काळात मतदारसंघाची पुरती वाट लागली. कृषिमंत्री म्हणतात, दोन्ही खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मग तुम्ही मंत्री म्हणून काय करता, असा सवाल त्यांनी केला.  
भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन कापसे म्हणाले, २००५ मध्ये राज्याच्या विधिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायदा झाला. त्या वेळी आपले लोकप्रतिनिधी काय करत होते. ज्यांच्या भरवशावर शेती पिकवली त्यांनीच दगा दिला, न्याय मागायचा कुणाजवळ असा सवाल त्यांनी केला. मतदारसंघातील जनतेला वेठीस धरले जात आहे. जे समस्या निर्माण करतात ते समस्या सोडवूच शकत नाही असेही ते म्हणाले.
या वेळी आबासाहेब नळे, आदिनाथ िशदे, राजेंद्र कार्ले, भानुदास कातोरे, राजेंद्र अग्रवाल आदींची भाषणे झाली. यानंतर रास्ता रोको करण्यात आला. शिर्डी येथील साईमंदिरातील हार, फुले प्रसादावरील बंदी उठविलीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार सुभाष कदम व राहाता पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता एस. आर. राहाणे यांना निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. शिर्डीचे पोलीस निरीक्षक संपतराव म्हस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.