नगर शहर व परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा जयघोष करत, ढोल ताश्यांच्या निनादात व फुलांच्या वर्षांवात जंगी मिरवणुक काढण्यात आली. अनेक शाळा, कॉलेजचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
शहरातील विविध तरुण मंडळे, संघटना, संस्थांनी चौक सुशोभित करुन मंडपात शिवपुतळा व प्रतिमेचे पुजन केले. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गिते, पोवाडे वाजवले जात होते. सरकारी कार्यालयातुनही शिवाजी महाराजांचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. राजकिय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी झालेल्या सरकारी कार्यक्रमात जुन्या बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर शिला शिंदे, उपहापौर गितांजली काळे, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. तेथुन मिरवणुकीस सुरवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्यावतीने मिरवणुक काढण्यात आली. संस्थेच्या अनेक शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होते. मिरवणुकीत फुलांनी सजवलेले रथ व त्यात छत्रपती शिवाजी, संभाजी, जिजाऊ, मावळे यांच्या वेषभुषा केलेले विद्यार्थी होते. ढोल ताश्यांच्या संगतीने लेझीम झांजचे डावही रंगले. न्यु आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कालेजच्या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा व लाठीचे डाव सादर केले. संस्थेचे पदाधिकारी माधवराव मुळे, रामनाथ वाघ, जे. डी. खानदेशे, रामचंद्र जरे, दिपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, प्राचार्य आर. बी. कुलट आदी सहभागी होते. प्रमुख रस्त्यावरील चौकांत मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. लालटाकी भागातील चौथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
जिल्हा हमाल पंचायतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ब्रिजलाल सारडा यांच्या हस्ते छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. न्याय व समतेचा संदेश देणारे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, त्यांच्या आदर्शाचे आचरण तरुणांनी करावे, असे अवाहन सारडा यांनी यावेळी बोलताना केले. जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांनी प्रास्ताविक केले. कॉ. बाबा अरगडे, बी. एन. लोंढे, गोविंद सांगळे, झुंबरारव आव्हाड, मधुकर केकाण, सतीश शेळके, नवनाथ महानुर, अनुरथ कदम, मोहन सपाते, बाळु अडागळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या आवारातील अर्धपुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर तसेच अधिकारी उपस्थित होते. नगर तालुका पंचायत समिती कार्यालयात सभापती सुनिता नेटके व गटविकास अधिकारी ज्ञानदेव निमसे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. पोलीस मित्र शांतता समिती व सेतकरी संघटनेच्या वतीने हिंदु-मुस्लिम ऐक्यातुन शिवजयंती साजरी करण्यात आली. सय्यद फकिर महमद, मुरादमिया, तात्यासाहेब कोतकर, गेणु कोतकर, डॉ. श्रीकांत चेमटे, बन्सी हजारे, डॉ. बागले, हरिभाऊ लोंढे आदी उपस्थित होते.
भिंगारमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने संजय सपकाळ यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेसच्या केंद्र-राज्य योजना संनियंत्र समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत गर्जे यांच्या हस्ते, कास्ट्राईब महासंघाच्या वतीने एन. एम. पवळे यांनी, केडगावमधील कार्यक्रमात नगरसेवक सुनिल कोतकर यांनी अभिवादन केले.
दुष्काळग्रस्तांसाठी मदत
शिवजयंतीचे औचित्य साधत पक्ष, संघटनांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पांजरापोळ गोरक्षण संस्थेतील जनावरांसाठी चारा भेट दिला. रेसिडेन्सिअल विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. कुलट यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पदाधिकारी अजय चितळे, अशोक रोहकले, राहुल कवडे, अविनाश पठारे आदी उपस्थित होते. चौपाटी कारंजा येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आले.माजी महापौर संग्राम जगताप, नगरसेवक किशोर डागवाले, अ‍ॅड. शिवाजी कराळे, अतुल तरटे, अमोल भंडारे आदी उपस्थित होते.