शाहीरी आणि लोककलांचे जतन आणि संवर्धन यासाठी कृष्णराव अर्थात दिवंगत शाहीर साबळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. विविध लोकनाटय़े, प्रहसन, वग आदींच्या माध्यमातून लोककलेचे हे वैभव त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमातून त्यांनी मराठी लोककला व परंपरा यांचे दर्शन महाराष्ट्रासह देशाला व जगालाही घडविले. याच कार्यक्रमातून त्यांनी तेव्हाच्या तरुण/उदयोन्मुख कलाकारांना संधी दिली आणि आज ते रंगभूमीवरील ‘सेलिब्रेटी’ झाले आहेत. त्यापैकी काही जणांनी एकत्र येऊन ‘मी आणि शाहीर साबळे’ हा कार्यक्रम तयार केला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ३१ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पहिला कार्यक्रम होणार आहे.
‘महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून प्रशांत दामले, विजय कदम, भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, किशोरी शहाणे, संतोष पवार, दिपाली विचारे, अरुण कदम या आजच्या सेलिब्रेटींनी सुरुवात केली होती. यापैकी शाहीरांचा नातू आणि सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव, लेखक-दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार या तिघांनी ‘मी आणि शाहीर साबळे’ कार्यक्रम तयार केला आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनातील काही प्रसंग, आठवणी, किस्से यात असणार आहेत. तसेच शाहीरांनी गायलेली लोकप्रिय लोकगीते, प्रहसने, लोकनाटय़/वगनाटय़ातील काही प्रवेश केदार शिंदे, भरत जाधव, संतोष पवार सादर करणार आहेत. ‘मी आणि शाहीर साबळे’ हा कार्यक्रम दीड ते पावणेदोन तासांचा आहे. या कार्यक्रमास चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १ ऑगस्ट रोजी कल्याणला आचार्य अत्रे रंगमंदिर तर २ ऑगस्ट रोजी शिवाजी मंदिर, दादर येथेही ‘मी आणि शाहीर साबळे’ कार्यक्रमाचा प्रयोग होणार आहे.