देशात सध्या खेळांची यादी वाढत आहे. त्यापेक्षा ऑलंम्पिक व परंपरेत रुजलेले खेळ यांची योग्य ती सांगड घालावी. खेळांची यादी न वाढविता क्रीडा संस्कृती रुजविण्याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे, असे मत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. तथा बाळ करमरकर यांनी व्यक्त केले. सुरेश काळे स्मृतीप्रित्यर्थ नाशिक जिल्ह्यातील प्रथम क्रीडा पुरस्काराने ‘लोकसत्ता’चे अविनाश पाटील यांना करमरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अॅड. यतिन वाघ उपस्थित होते. शहरातील क्रीडा संस्था व संघटना यांच्यातर्फे यंदापासून क्रीडा क्षेत्रातील पत्रकारिता पुरस्कार देण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी करमरकर यांनी क्रीडा पत्रकारितेचा उहापोह केला. क्रीडा पत्रकारिता वाढली आहे. मात्र, पत्रकारांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. या क्षेत्रात काम करताना पत्रकाराचा चांगला स्तर व्हावा याकरिता त्याला वेळोवेळी बढती मिळणे आवश्यक आहे. क्रीडा, आरोग्य, पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत. काही अपवाद वगळता त्याची जाणीव प्रसारमाध्यमांना नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. क्रिकेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. कधी तिकीटांचा काळाबाजार करून तर कधी विशेष निमंत्रितांच्या तिकीट विक्रीद्वारे. मात्र, यातून मिळणारा पैसा खेळाडू किंवा जनतेच्या कामी येत नाही. असे प्रकार पत्रकारांनी उघड करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. क्रीडा संकूल, स्पर्धेसाठी झालेली बांधकामे यांच्यावर पत्रकाराची नजर असली पाहिजे. नाशिक महापालिकेतर्फे प्रस्तावित क्रीडा धोरणाचा संदर्भ घेऊन करमरकर यांनी शहरातील क्रीडा मैदाने वाचविले पाहिजे. त्यांना क्रमांक देऊन संरक्षक भिंत बांधणे, मार्गदर्शकांची नेमणूक आदी व्यवस्था करणे आवश्यक आहे. खेळाडू हा कधीतरी संघटक झाला पाहिजे, अशा केंद्राची व्यवस्था त्याच्यावर सोपविली पाहिजे असेही करमरकर यांनी नमूद केले. प्रास्ताविक आनंद खरे यांनी केले तर ‘मिळून सारे’ संघटनेचे निमंत्रक अविनाश खैरनार यांनी पुरस्कारामागील संकल्पना विषद केली.