लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना दुसरीकडे या काळात वेगवेगळ्या माध्यमातून अपप्रचारही केला जात असल्याचा अनुभव आहे. आक्षेपार्ह लघुसंदेश हा त्याचाच एक भाग. निवडणूक काळात वातावरण गढूळ करण्यास या प्रकारचे लघुसंदेश कारणीभूत ठरतात. अशा लघुसंदेशावर नजर ठेवण्याबरोबर त्या बाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी शहर पोलिसांनी स्थापलेल्या तांत्रिक विश्लेषण कक्षाकडे चार दिवसांत एकही तक्रार आलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून पारंपरिकसह वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. सर्वसामान्य मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी ही धडपड केली जात असली तरी काही अनिष्ट प्रवृत्ती याच माध्यमांचा अपप्रचार करण्यासाठी वापर करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आक्षेपार्ह लघुसंदेशाचा विषय बराच गाजला होता. आक्षेपार्ह लघुसंदेश पाठवून प्रतिस्पर्धी उमेदवाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार काहींनी केली होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणेने आक्षेपार्ह लघुसंदेश पाठविणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण विभागात खास कक्ष स्थापन केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणाच्याही भ्रमणध्वनीवर या स्वरूपाचा लघुसंदेश प्राप्त झाल्यास तो लघुसंदेश आणि ज्याने तो पाठविला आहे, त्याच्या माहितीसह या विभागाकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे आक्षेपार्ह लघुसंदेश तक्रारदार ८६०५२६८६१९ या क्रमांकावर पाठवू शकतात. कक्षाची स्थापना होऊन चार दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु, आतापर्यंत एकही आक्षेपार्ह लघुसंदेशाविषयी तक्रार आली नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. प्रगत तंत्रज्ञानामुळे भ्रमणध्वनीधारक आता ‘वॉट्स अप’चाही मोठय़ा प्रमाणात वापर करतात. संदेश देवाणघेवाणीचा कट्टा असे त्याचे स्वरूप. वॉट्स अपवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संदेश फिरत असल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्या अनुषंगाने कोणी तक्रार करण्यासाठी पुढे आलेले नाही.