रोटरी इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने ‘ग्रुप स्टडी एक्स्चेंज’ या उपक्रमांतर्गत सोलापुरातील महावीर मेहता व अण्णाराज ऊर्फ पुष्पराज धर्मराज काडादी यांच्यासह पाचजणांचा अभ्यासगट एक महिन्यासाठी मेक्सिकोकडे रवाना झाला आहे. महावीर मेहता हे या अभ्यास गटाचे नेतृत्व करीत असून या अभ्यासगटात पुष्पराज काडादी यांच्यासह सानिया विवेक मेहता, शेखर भन्साळी व सुधीर काबरा यांचा समावेश आहे. त्यांना शनिवारी निरोप देण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या माध्यमातून मेक्सिकोला रवाना झालेल्या या अभ्यासगटाकडून मेक्सिको येथील विविध उद्योग प्रकल्प, व्यापार, तेथील लोकजीवन, मेक्सिको व भारताचे व्यापार संबंध, रोटरीचे विविध प्रकल्प, रोटरी सभा, वैचारिक व सांस्कृतिक देवाण-घेवाण करून आंतरराष्ट्रीय मैत्री, शांतता व सामंजस्य वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण अभ्यास दौऱ्याचा खर्च रोटरी फाऊंडेशन करणार आहे. १०६५ पासून ‘ग्रुप स्टडी एक्स्चेंज’ हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत २५ ते ४० वर्षे वयोगटातील चार सदस्यांची निवड केली जाते.