दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारालाच फास घेऊन तेथील शिपायाने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकारी व सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळच दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे कार्यालय असून त्या ठिकाणी शिपायाने आत्महत्या केल्याने त्या भागात खळबळ माजली होती.
वाहीद शेख (वय ४२, रा. पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे. या घटनेमागचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. शेख हा गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याची कार्यालयीन चौकशीही सुरू होती. त्याची अलीकडेच मोहोळ येथून दक्षिण सोलापूरला बदली झाली होती. तो याच कार्यालयाच्या आवारात राहत असे. परंतु व्यसनाधीनता व कौटुंबिक कलहामुळे तो अस्वस्थ होता. त्यामुळेच तो कार्यालयात सेवेत गैरहजर राहत असे. आपल्यावर कारवाई होणार व नोकरीवर गंडांतर येणार या भीताने त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले.
हवालदाराला लाच घेताना पकडले
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुरेश भगवान माळी यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अवैध वाळू साठा केल्याप्रकरणी एका शेतक ऱ्याविरुद्ध कारवाई टाळण्यासाठी हवालदार माळी याने हस्तकामार्फत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यासमोर सदर शेतक ऱ्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारली असताना त्यास पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.