बाळपणीचा काळ सुखाचा हे जरी खरे असले तरी जन्मत:च मेंदूच्या काही भागातील पेशींची हानी झाल्यामुळे सेरेब्रेल पाल्सी किंवा मेंदूचा पक्षाघात या आजारामुळे हजारातील सरासरी चार मुलांना व त्यांच्या पालकांनाही या आनंदापासून वंचित राहावे लागते. अशा कुटुंबांना शहरातच उपचार, मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या ‘स्वयंम’ला आता महापालिका प्रशासनानेही मदतीचा हात दिला आहे. पाचपाखाडी येथील कौशल्य मेडिकल फाऊंडेशनच्या रुग्णालयात तळमजल्यावर लवकरच ‘स्वयंम’चे उपचार मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित होणार आहे. एका अर्थाने स्वयंपूर्णतेच्या दिशेने स्वयंमने एक पाऊल पुढे टाकले आहे.
नीता आणि राजीव देवळालकर या दाम्पत्याने जुलै-२००५ मध्ये त्यांच्यासारखाच प्रश्न असणाऱ्या शहरातील पालकांच्या सहकार्याने स्वयंम या स्वमदत आधारगटाची स्थापना केली. या मुलांना शक्य तितके स्वावलंबी बनविण्यासाठी, स्नायूंच्या नियंत्रणासाठी, मज्जासंस्थांच्या योग्य उत्तेजनासाठी तसेच वाणी दोषाच्या उपचारांबरोबरच कायम शिक्षणविषयक मार्गदर्शन द्यावे लागते. यासाठीचे वैद्यकीय उपचार खर्चीक असतातच, शिवाय यासाठी पालकांना मुलांना उचलून घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागते. त्यामुळे पालकांचेही वैयक्तिक व व्यावसायिक जीवन विस्कळीत होते. स्वयंम स्थापन होण्यापूर्वी सेरेब्रल पाल्सी आजारावर ठाण्यात कोणतेही उपचार केंद्र नव्हते.
स्व-मदत गट सुरू झाल्यावर हळूहळू असे पालक एकत्र आले. नौपाडय़ात ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर उपचार केंद्र सुरू करण्यात आले. स्पीच थेरेपी, अ‍ॅक्युपेशनल थेरेपी, मुलांचे तसेच पालकांचे समुपदेशन येथे नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येऊ लागले. हळूहळू पालकांची संख्या वाढत गेली. सध्या स्वयंम स्व-मदत गटात ठाणे परिसरातील २९० पालक आहेत. सेरेब्रल पाल्सी रुग्णांच्या उपचारांसाठी केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्वयंमच्या वतीने गेली काही वर्षे सातत्याने केली जात होती. अखेर पाचपाखाडीमधील कौशल्य मेडिकल फाऊंडेशनच्या रुग्णालयात महापालिकेने केंद्रासाठी जागा दिली आहे.
अर्थात या उपचारांसाठी लागणारी साधने तसेच प्रशिक्षणाचा खर्च अफाट आहे. सध्या पालक वर्गणी काढून हा खर्च भागवीत असले तरी अद्ययावत केंद्रासाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. स्वयंमला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करण्यासाठी दात्यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन संस्थापिका नीता देवळालकर यांनी केले आहे. संपर्क- स्वयंम, तळमजला, साईकृपा इमारत, गणपती कारखान्यासमोर, धर्मवीर मार्केटच्या शेजारी, तीन पेट्रोलपंप, नौपाडा, ठाणे (प), मोबाइल- ९९२०८५३२२५.