उच्च शिक्षणात कार्य करणाऱ्या शिक्षकांनी आपले ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचे सोने केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने मिलिंद कला महाविद्यालयात मराठी, हिंदी व शारीरिक शिक्षण विषयांच्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात डॉ. माने बोलत होते. अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एम. एस. मोरे होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. माधव सोनटक्के, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. कमल जाधव, प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांची उपस्थिती होती. डॉ. माने म्हणाले, की शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने शिक्षकांनी करीअर विकासापुरते चर्चासत्रामध्ये सहभागी न होता वाचन व चिंतनाद्वारे आपले अध्यापन कौशल्य विकसित करावे, तसेच संशोधन दृष्टी ठेवून आपल्या विषयात सखोल संशोधन करावे. प्रा. डॉ. लुलेकर यांनी मराठवाडय़ाच्या शिक्षणाचा जन्म या भूमीतून झाल्यामुळे या भूमीतूनच दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. आत्मकथनाची सुरुवातही येथूनच झाली. दलित साहित्यावरील चर्चासत्रही येथेच सर्वप्रथम १९६७-६८मध्ये झाले. दलित साहित्य नवसंस्कृती निर्माणाचे कार्य करते, असे सांगितले. प्रा. डॉ. सोनटक्के यांनी साहित्यिकांना चांगले दिवस राहिले नाहीत. हिंदी साहित्यात तर एकमेकांचे पाय ओढण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. एवढेच नाही, तर २१व्या शतकात विचार मांडणे, आंदोलन करणे हे प्रायोजित असतात, असे सांगितले. डॉ. कमल जाधव यांनी  खेळाडूंची मानसिक अवस्था चांगली ठेवण्यासाठी क्रीडा मानसशास्त्राचा मोठा उपयोग होतो, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात मोरे यांनी दु:खातून विद्रोहाची निर्मिती होते. डॉ. आंबेडकरांनी दु:खातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. सद्य:स्थितीत साहित्यिकांनी चिकित्सक दृष्टी ठेवून आपले लेखनकार्य करावे, असे नमूद केले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. सुजित गायकवाड यांनी केले.