मालिका असोत किंवा सिनेमा, विनोदाच्या बदलत्या स्वरुपाबद्दल चांगल्या वाईट प्रतिक्रिया नेहमीच दिल्या जातात. असे असले तरी, विनोदाचे स्वरुप कितीही बदलले तरी, त्याचे प्रमुख उद्दिष्ट प्रेक्षकांना निखळ आनंद मिळवून देणे हे असले पाहिजे, असे मत चतुरस्र अभिनेत्री भारती आचरेकर यांनी व्यक्त केले.
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये विनोदवीरांचे स्थान महत्त्वाचे आहे. अगदी दादा कोंडकेपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे, मकरंद अनासपुरेपर्यंत प्रत्येक विनोदवीराने महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. याच विनोदवीरांच्या गौरवासाठी ‘झी टॉकिज’ने यंदा ‘झी टॉकिज कॉमेडी अवॉर्ड्स’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पुरस्कारांचे परीक्षक समितीचे अध्यक्ष अशोक सराफ असून, दिलीप प्रभावळकर, सचिन पिळगावकर यांच्यासह भारती आचरेकर व विनोदाच्या क्षेत्रांतील इतर दिग्गज कलाकारांचा या समितीमध्ये समावेश आहे. यावेळी बोलताना मनोरंजन क्षेत्रातील एकूणच बदलत्या विनोदाच्या स्वरुपाबद्दल भारती आचरेकर यांनी मनमोकळे भाष्य केले.
‘पूर्वीच्या काळातील तंत्रज्ञान आजच्याइतके प्रगत नव्हते. त्यामुळे कलाकारांना आजच्याइतक्या संधी उपलब्ध नव्हत्या. म्हणूनच पूर्वीच्या तुलनेने आज विनोदाच्या क्षेत्रात प्रयोगाला जास्त वाव आहे. त्यामुळे विनोदाच्या स्वरुपामध्ये कालानुरूप बदल होणे साहजिकच नव्हे तर गरजेचेही आहे. पूर्वी प्रासंगिक विनोदावर जास्त भर दिला जात असे. रोजच्या आयुष्यातला विनोद लोकांना जास्त भावतो,’ असे त्यांनी सांगितले.
विनोदांमध्ये प्रयोगाला स्वातंत्र्य असले तरी सध्या त्यामध्ये निखळ आनंदापेक्षा कृत्रिमपणा जास्त भरल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. सध्या मालिका आणि चित्रपटांमध्ये चांगल्या कथेचा असलेला अभाव, हे त्यामागचे कारण असल्याचे त्या सांगतात. त्याचवेळी विनोदी मालिका आणि विनोदी चित्रपटांमध्ये महिला पात्रांचा प्रामुख्याने अभाव जाणवत असल्याबद्दल त्यांनी सांगितले की, ‘पूर्वी चित्रपटामध्ये शुभा खोटे, ललिता पवार यासारख्या विनोदी कलाकारांसाठी खास भूमिका तयार केल्या जायच्या. आजचे चित्र वेगळे आहे. आज चित्रपट नायकप्रधान असतो, त्यामुळे विनोदी स्त्री भूमिका दुर्मीळ झाल्या आहेत.’