‘एड्स’वर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे कोटय़वधी रुपये खर्च केले जात असले तरी एड्सग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्य़ात एड्सच्या जनजागृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविले जात असले तरी गेल्या सात वर्षांत जवळपास १९ हजार एड्सग्रस्त आढळून आले आहेत.
एड्स हा गंभीर आजार असून जगातून त्याला हद्दपार करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना वेगवेगळ्या देशांना कोटय़वधींचा निधी देऊन जनजागृतीपर अभियान राबवित आहे. भारतातही मोठय़ा प्रमाणावर एड्सरुग्ण आढळत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सार्वजानिक आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या रुग्णालयांसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीपर अभियान राबविले जाते तसेच रुग्णांवर उपचार केले जातात. जिल्ह्य़ात शहरी व ग्रामीण भागातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये एड्सवर नियंत्रण व उपचारासाठी अभियान राबविण्यात येत असले तरी हवे तसे यश अद्याप मिळाले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एड्सग्रस्तांची संख्या २०१० च्या तुलनेत २०१२ मध्ये घटल्याचा दावा सरकारतर्फे केला जात असला तरी उपलब्ध आकडेवारी पाहता सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नागपूर जिल्ह्य़ात गेल्या अनेक वर्षांत एड्सवर नियंत्रणासाठी अनेक अभियान राबविण्यात आले. २००५ ते २०१२ पर्यंत जिल्ह्य़ात २ लाख ७२ हजार १७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात एचआयव्ही तपासणीत एकूण १८ हजार ८७६ नवीन रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाकडे असलेल्या या आकडेवारीनुसार २००५ मध्ये जिल्ह्य़ात १० हजार ९५२ रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यात २ हजार ४५५ नवीन रुग्णांना एड्स असल्याचे निष्पन्न झाले. २००७ साली २५ हजार १४५ रुग्णांच्या तपासणीत २ हजार ८५० एड्सग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. २००८ मध्ये ३७ हजार ३३७ रुग्णांच्या तपासणीत २ हजार ६४६ रुग्णांना, २००९ मध्ये ५१ हजार ९८६ रुग्णांच्या तपासणीत ३ हजार १३९ रुग्णांना, २०१० मध्ये ६३ हजार ९६५ रुग्णांच्या तपासणीत ३ हजार २९७ रुग्णांना एड्स असल्याचे निष्पन्न झाले. २०११ मध्ये ७२ हजार ८२७ रुग्णांच्या एचआयव्ही तपासणीत २ हजार ३३० रुग्णांना एड्स असल्याचे आढळून आले आहे. २०१० च्या तुलनेत २०११ साली नवीन आढळणाऱ्या एड्सग्रस्तांच्या संख्येत ९६७ ने घट झाल्याने आरोग्य विभागात समाधान व्यक्त केले जात आहे. एड्सच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात विविध शासकीय महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय संचालकांनी दिली.