ठाणे- बेलापूर मार्गावर घणसोली येथे गाडय़ांचे पार्किंग आजही जैसे थे असून दोन दिवस होणाऱ्या संततधार पावसात या रस्त्यांची एक मार्गिकाच या गाडय़ांनी गायब केल्याने घणसोली नाक्याजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान रिलायन्सजवळ सिग्नल बसविलेला असताना कंपनीचे खासगी वाहतूक नियंत्रक स्वत:च्या गाडय़ा झटपट ये-जा करण्यासाठी वाहतूक कोंडी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर आता वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.  त्यामुळे नवी मुंबई पालिकेने केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्यावर पुनर्बाधणी केलेला हा सहा पदरी मार्ग अपुरा पडू लागला आहे. घणसोली येथे सध्या रिलायन्स कंपनीच्या सर्व कंत्राटदारांच्या गाडय़ा या रस्त्यावर पार्क केल्याचे दिसून येते. अशा गाडय़ा पार्क करणे योग्य नसल्याचे सांगून त्या गाडय़ांवर सातत्याने कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या उपायुक्त (वाहतूक) विजय पाटील यांनीही या अनधिकृत पार्किंगकडे कानाडोळा केला आहे.