पुरेसे आर्थिक नियोजन नसल्यामुळे नेहमीच आर्थिक संकटाच्या फेऱ्यातून मार्गक्रमण करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेने यंदाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्यासाठी थेट फेरीवाल्यांच्या खिशात हात घालण्याचा निर्णय घेतला असून फेरीवाला शुल्काच्या माध्यमातून तिजोरीत लाखो रुपयांची भर पाडण्याचा महापालिकेचा हा प्रयत्न रहिवाशांना मात्र त्रासाचा ठरू लागला आहे. डोंबिवली पूर्व भागातील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बाजार शुल्क वसुली विभागाने हिरवा कंदील दाखविल्याचे विश्वसनीय वृत्त असून फेरीवाला शुल्काच्या वसुलीसाठी पदपथ अडवून बसणाऱ्या या फेरीवाल्यांकडे अतिक्रमण विरोधी पथकानेही कानाडोळा सुरू केला आहे. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले असून ते हटविण्यासाठी आयुक्त शंकर भिसे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. प्रभाग क्षेत्र अधिकारी अनिल लाड यांना फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख करण्यात आले आहे. सुरुवातीला हे लाड महाशय कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फे रीवाल्यांना हटविण्याचे काम नित्यनेमाने करत असत. त्यामुळे पदपथ, रस्ते फेरीवाले मुक्त झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे अतिक्रमण होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवली पूर्व भागातील पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, केळकर, मधुबन सिनेमा गल्ली, कामत मेडिकल, नेहरू रस्ता, भाजी गल्ली या परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाकडून फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
लक्ष्यपूर्तीचे गणित
महापालिकेस वर्षभरात फेरीवाला विभागातून ठराविक महसूल जमा करावा लागतो. रेल्वे स्थानक परिसर ‘ना फेरीवाला विभागात’ येतात. फेरीवाला विभाग रेल्वे स्थानकापासून पाचशे मीटर दूर आहेत. तेथे फेरीवाले बसत नाहीत. त्यामुळे बाजार शुल्क वसुली विभागाचे अधिकारी रेल्वे स्थानकातील ‘ना फेरीवाला’ विभागात धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांकडून गेल्या काही वर्षांपासून ठराविक स्वच्छता शुल्क वसूल करतात. महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करताच फेरीवाल्यांनी हे शुल्क देण्यास नकार दिला होता. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हेच पालिकेचे बाजार शुल्क महसुली उद्दिष्ट अनेक र्वष पूर्ण करतात. अधिकाऱ्यांनाही त्यामुळे ‘दिलासा’ मिळतो. डोंबिवली पश्चिमेत फेरीवाला विभागातून शुल्क वसुलीचे लक्ष पूर्ण केले जाते. डोंबिवली पूर्व भागात सुमारे ४०० ते ५०० फेरीवाले धंदा करीत आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच ठेवली तर पालिकेचे आणि अधिकाऱ्यांचे ‘उद्दिष्ट’ पूर्ण होणार नाही या भीतीने आता फेरीवाल्यांवर ‘दयाभाव’ दाखविण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात येते.