शहरात आयआरबी कंपनीच्या वतीने सुरू असलेली टोलवसुली बेकायदेशीर असल्याने या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनाला अनेकदा कळवूनही कारवाई केलेली नाही. याबाबत पोलीस प्रशासनाने हालचाली न केल्यास येत्या सोमवारी पोलीस अधीक्षकांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती फौजदारी बार असोसिएशनने शनिवारी टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलतांना दिली. टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा इंदूलकर, रमेश मोरे, बाबा पार्टे आदींनी आज फौजदारी बार असोसिएशनचे अॅड.विलास नलवडे, अॅड.हुतलांडे, अॅड.गिरीश नाईक आदी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.     
आयआरबी कंपनीच्या वतीने सुरू असलेली टोलवसुली बेकायदेशीर आहे, कंपनीच्या वतीने करण्यात आलेले रस्तेकाम निकृष्ट दर्जाचे आहे. यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. याबाबत राजारामपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तथापि पोलिसांनी फिर्याद दाखल करूनही आयआरबी कंपनीवर कसलीही कारवाई अद्याप केलेली नाही. याकामी फौजदारी बार असोसिएशनने टोलविरोधी कृती समितीला मदत व पािठबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.
यासंदर्भात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा केली. बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आयआरबी कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्य़ांच्या कागदपत्रांची माहिती घेऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांना आयआरबी कंपनीवर गुन्हे दाखल करण्यास सांगू अथवा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, अशी माहिती दिली.
विद्युत कामातील दोष
 आयआरबी कंपनीने रस्तेकाम निकृष्ट दर्जाचे करतानाच विद्युतीकरणाच्या कामातही अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीचे तज्ज्ञ अभियंता व टोलविरोधी कृती समिती नियुक्त दोन विद्युत अभियंता यांनी विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. या अहवालात विद्युतीकरणाच्या कामाच्या अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या अहवालाकडे महावितरण दुर्लक्ष करीत असून त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका उपलब्ध झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न टोलविरोधी कृती समितीने पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे.