जामखेड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी जामखेड तालुक्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टँकर भरण्यासही कोठे पाणी नाही एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी यांनी सांगितले की, जामखेडला सन २००० साली अशीच टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी तालुक्यात ३० टँकरने खर्डा व श्रीगोंदे तालुक्यातील बावडी येथील तलावांमधून पाणीपुरवठा केला होता, मात्र आज तालुक्यात कोठेच पाणी नाही व जामखेडसाठी कोणतीही चांगली पाणी योजना नाही. त्यामुळे यंदा किमान शंभर टँकरने तालुक्यात पाणी पुरवठा करावा लागणार आहे. तालुक्यातील भिमा नदीच्या फुगवटय़ावर हे टँकर भरावे लागतील.
जामखेडचे सरपंच मात्र टंचाईबाबत गंभीर नाहीत. तलावात पाणी संपले आहे. आज शहराला सहा दिवसांनी व तोही अवघा अर्धा तास पाणीपुरवठा होत आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतीने किमान टँकरचे प्रस्ताव देणे गरजेचे होते, मात्र अद्याप प्रस्ताव दिलेले नाहीत. तहान लागल्यावर विहीर खोदण्यात उपयोग नाही. आमदार राम शिंदे यांचेसुद्धा या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे कोठारी यांनी सांगितले.