सलग पाच वष्रे निष्क्रीय राहून वाढदिवसाला केवळ फ्लेक्स बोर्डावर दिसणारे आमदार नाना शामकुळे यांच्याविरोधात नाराजीचा तीव्र सूर उमटायला सुरुवात झाली असून नागपूरचे पार्सल आम्हाला नको, या मागणीने जोर पकडल्याने चंद्रपूरच्या जागेवरून भाजपच्या केंद्रीय वर्तुळात सुंदोपसुंदीला सुरुवात झाली आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेता भाजपच्या वर्तुळात जागा वाटपावरून चांगलेच शीतयुध्द होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याला कारण चंद्रपूरचे विद्यमान आमदार नाना शामकुळे यांच्याप्रती जनतेत प्रचंड रोष आहे. हा रोष यंदा विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्राच्या माध्यमातून प्रगट होणार आणि त्याचा विपरीत परिणाम या जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरी, बल्लारपूर व लगतच्या गडचिरोली, अहेरी विधानसभा मतदारसंघावर होणार असे भाजपचे नेते मंडळीच सांगत आहेत. विशेष म्हणजे, हा रोष चंद्रपुरातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडून चौकाचौकात ऐकायला मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर मतदारसंघ एससीसाठी राखीव झाल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार, तर खासदार हंसराज अहीर यांनी राजेश मून यांचे नाव समोर केले. अहीर-मुनगंटीवारांच्या राजकीय वितुष्टात भाजपचे चाणक्य नितीन गडकरी यांनी नेमका डाव साधला आणि कट्टर समर्थक नाना शामकुळे यांना दहा दिवसापूर्वी आमदारकीची उमेदवारी दिली. दहा दिवसापूर्वी आमदारकीचे साधे स्वप्नही न पडलेले शामकुळे अहीर-मुनगंटीवार यांच्या पुण्याईच्या बळावर येथून आमदार म्हणून निवडून आले. मुनगंटीवार-अहीर यांच्याकडे पाहून या शहरातील मतदारांनी शामकुळे यांना निवडून दिले, परंतु सलग पाच वष्रे निष्क्रीय राहून शामकुळे यांनी चंद्रपूरकरांचा विश्वासघात केला.
मतदार संघात फिरायचे नाही, लोकांना भेटायचे नाही, त्यांचे प्रश्न, समस्यांची दखल घ्यायची नाही. वाढदिवस आला की चौकाचौकात फ्लेक्स बोर्डावर झळकायचे, या पलिकडे शामकुळे यांनी काही केले नाही. स्वतंत्र महिला रुग्णालय, वरोरा नाका उड्डाणपूल या दुसऱ्यांनी मार्गी लावलेल्या कामाचे श्रेय लाटायचे आणि मुंबई, नागपुरात बसून गडकरी नावाचा जप करण्यापलिकडे काहीच केले नाही. त्याचा परिणाम शामकुळेंच्या निष्क्रियतेचा फटका आमदार मुनगंटीवार व आमदार अतुल देशकर यांना बसण्याची दाट शक्यता आहे. देशात मोदी लाटेला ओहटी लागल्याने भाजप नेते चिंतेत असतांना आता शामकुळेंची निष्क्रियता भाजपच्या स्थानिक नेत्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. किमान यंदा तरी भाजपने नागपूरचे पार्सल गडकरी वाडय़ावर सोडून यावे अन्यथा, आम्ही मते देणार नाही, असा सूर शहरातील प्रत्येक चौकात ऐकायला मिळत आहे. भाजपच्या नेतेमंडळींना आमदारकीसाठी चंद्रपुरातील एक निष्ठावान कार्यकर्ता मिळू नये, यासारखे दुर्देव दुसरे नाही, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. गडकरींनी नागपुरातील पार्सल पुन्हा एकदा का चंद्रपूरकरांच्या माथी मारले तर आम्ही प्रचंड बहुमताने पराभव करून वाडय़ावर परत पाठवू, अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.
शामकुळे यांचा कार्यकाळ केवळ खोटी आश्वासने व दुसऱ्यानी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यात गेला. त्यामुळे यंदा तरी आम्हाला चंद्रपुरातील निष्ठावान आमदार द्या, अशी मागणी स्वत: चंद्रपूरकर जनता करू लागली आहे. तिकडे भाजपप्रमाणेच कॉंग्रेसने सुध्दा बाहेरचा उमेदवार दिला तर या शहरातील एखाद्या गरीब कार्यकर्त्यांला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे आणि प्रचंड बहुमताने विजयी करायचे, अशी तयारी सुरू झाली आहे. शहरातील सर्व प्रमुख चौकात ही चर्चा रंगायला सुरुवात झाल्याने भाजप नेत्यांच्या वर्तुळात सुंदोपसुंदीला सुरुवात झाली आहे. शामकुळे यांना यावर्षी पुन्हा उमेदवारी दिली तर या जिल्ह्य़ातील चित्र कदाचित वेगळे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काहीही करा, परंतु शामकुळे यांना उमेदवारी देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका, अशी विनंती राज्य व केंद्र पातळीवरील नेत्यांना केली आहे.
रेल्वे भाववाढीपाठोपाठ गॅस व पेट्रोलचे दर वाढणार असल्याने मतदारांनी हेच का मोदींचे अच्छे दिन, असा प्रश्न विचारून भाजप नेत्यांना चक्रावून सोडले आहे. अशातच केवळ फ्लेक्स बोर्डावर झळकणाऱ्या शामकुळेंना पुन्हा उमेदवारी दिली तर जनतेचा प्रचंड रोष ओढवून घ्यावा लागेल, असा अहवाल भाजपच्या केंद्रीय समितीकडे देण्यात आला आहे. त्यामुळे यंदा चंद्रपूरच्या जागेवरून भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.