ठरवून केलेलं लग्न असो, प्रेमविवाह असो वा लग्नाविना सहजीवन (हेही आता लग्नातच मोडतं, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे!); लग्न टिकवायचं तर तडजोड, जोडीदाराचा गुणदोषांसह स्वीकार, वैचारिक परिपक्वता आणि समजूतदारपणा अत्यावश्यक! साथीदाराला त्याच्या स्वतंत्र अवकाशासाठी (space) मोकळीक देणंही गरजेचं!! या गोष्टीही पुन्हा उभयपक्षी असायला हव्यात. अन्यथा लग्नाचे तीन-तेरा वाजलेच म्हणून समजा. लग्नाच्या या ना-ना तऱ्हा नाटक, सिनेमा व मालिकांतून नेहमीच दाखवल्या जात असतात. आधुनिक जीवनशैलीच्या नवरा-बायकोतल्या नात्याचा पंचनामा करणारं ‘टॉम आणि जेरी’ हे नाटक सध्या गाजतं आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’ (नाटक), ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ (मालिका) यांच्यापाठोपाठ आता एका लग्नाची तिसरी गोष्ट सांगणारं नाटक रंगभूमीवर आलेलं आहे.. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ गंमत म्हणजे ‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये प्रशांत दामलेंच्या तोंडच्या गाण्याचे हे शब्द आहेत. त्या व या नाटकात अनेक बाबतींत साम्य आहे. ‘एका लग्नाची गोष्ट’मध्ये सासू-सुनेच्या संघर्षांमुळे लग्न वांध्यात येतं. इथं मात्र राजा-राणीच्या संसारात दुसरं कुणी तडमडायला नसतानासुद्धा सुनिधी आणि सुहासच्या नात्यात दुरावा येतो. कारण काय, म्हणाल तर तसं ठोस काहीच नाही. साधीच धुसफूस. म्हणजे- नवऱ्यानं आपल्याला वेळ न देणं, ऑफिसचं काम घरी आणून करणं, आपल्या आवडीनिवडीत सहभागी न होणं, नवऱ्याला आयतं सगळं हातात द्यावं लागणं, आपल्या कष्टांची त्याला कदर नसणं, वगैरे वगैरे.. हे आरोप बायकोच्या बाजूनं!
नवऱ्याचं त्यावर म्हणणं असं : आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरमागे धावताना नाही जमत बायकोला पुरेसा वेळ देणं; पण तिनं ते समजून घ्यायला नको? मला काय हौस आहे दिवसाचे २४ तास ऑफिसचं काम करण्याची? ‘बायकोच्या आवडीनिवडी’ हा आणखी एक वादविषय. पण तिला तिच्या आवडीनिवडी जपायचं स्वातंत्र्य असताना माझ्याही आवडीनिवडी तिच्याचसारख्या असाव्यात, असा तिचा हट्टाग्रह का? कशासाठी? हं, एक मात्र खरंय, की मला एका वेळी अनेक गोष्टी नाही जमत तिच्यासारख्या. शंभर टक्के मान्य! पण तेवढंच घेऊन रोज भांडण उकरण्यात काय मतलब?  खरं तर अशा चिल्लर गोष्टी (अर्थात पुरुषांच्या मते!) पुरुषांच्या गावीही नसतात. पण बायका मात्र त्याच घेऊन बसतात. त्यांच्या लेखी त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यावरून नेहमी दोघांचं वाजतं. काटय़ाचा नायटा होतो. आणि मग वैवाहिक जीवनाला तडे जायला वेळ लागत नाही.
खरं तर या सगळ्याला स्त्री व पुरुषाची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची भिन्न दृष्टी, परस्परविरोधी मानसिकता, त्यांच्या लेखी त्या गोष्टींना असलेलं/ नसलेलं महत्त्व, इत्यादी कारणीभूत ठरतात. आता शास्त्रीय संशोधनाअंती तर मनरा-बायकोच्या संबंधबिघाडास स्त्री-पुरुषाच्या मेंदूची विशिष्ट रचना कारणीभूत असल्याचं सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. स्त्रीचा मेंदू पुरुषापेक्षा ३० टक्के अधिक क्रियाशील असतो. त्यामुळे त्या एका वेळी अनेक गोष्टी लीलया करू शकतात. तर पुरुषी मेंदूच्या विशिष्ट रचनेमुळे तो एका वेळी फक्त एकच गोष्ट परिपूर्णतेनं करू शकतो. मात्र, हे शास्त्रीय सत्य सर्वसामान्यांपर्यंत, विशेषत: स्त्रियांपर्यंत न पोचल्यानं नवऱ्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी मागल्या पानावरून पुढे चिरंतन सुरू राहिल्या आहेत.
सुनिधी आणि सुहासमध्ये खरं तर साध्या साध्याच मुद्दय़ांवरून वाद होतात. सुहास बायकोच्या या नस्त्या त्राग्यांकडे शक्य होईला तितका काणाडोळा करतो. परंतु सुनिधी मात्र त्यातूनही भलता अर्थ काढते आणि सुहासला सोडून निघून जाते. खरं तर एकाच गोष्टीकडे दोघांच्या पाहण्याच्या परस्परभिन्न दृष्टिकोनामुळेच त्यांच्यात भांडणं होत असतात. पण ही गोष्ट कुणीच समजून घेत नाही. विशेषत: सुनिधी! शेवटी सुहासचा मित्र डॉ. सुदेश त्यांच्यातल्या वादंगाला स्त्री-पुरुषांच्या मेंदूची कार्य करण्याची विशिष्ट क्षमता कशी कारणीभूत आहे, हे शास्त्रीय वास्तव त्यांच्या लक्षात आणून देतो आणि त्यांच्यातले वाद मिटतात. (तात्पुरते की कायमचे, कुणास ठाऊक!) अर्थात त्यांच्या नात्यात येणाऱ्या ‘गोड’ पाहुण्याकडेही याचं श्रेय जातं.  
सुनील हरीश्चंद्र लिखित आणि सुदेश म्हशीलकर दिग्दर्शित ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हे नाटक ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाच्याच वळणानं जातं. त्यातही सूत्रधार आहेत; जे उभयतांमधील भांडणांत मध्यस्थाची व समुपदेशकाची भूमिका निभावतात. इथं फक्त सासू-सून संघर्षांचा तिसरा कोन नाहीए, हाच फरक. त्याऐवजी लिंगनिविष्ट भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींचे अहम् आणि समोरच्याला समजून न घेता आपलं तेच खरं करण्याच्या अट्टहासातून त्यांच्या वैवाहिक जीवनाला कसे तडे जातात, आणि मानवी स्वभावही त्यात कशी भूमिका बजावतो, याचं सखोल अवलोकन म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ होय. गंमत म्हणजे दोघांतली ही भांडणं प्रेक्षकांना विश्वासात घेत होतात. नवरा-बायकोनं एकमेकांच्या गुणदोषांचीच सतत उजळणी करत राहिल्यास कुठलंही लग्न टिकणं अशक्यच. दोन भिन्न प्रकृतीच्या, वेगळ्या प्रवृत्तीच्या आणि विरोधी मानसिकतेच्या व्यक्ती लग्नगाठीनं एकत्र आल्यास काय होतं, याचं खुमासदार चित्रण या नाटकात आहे. या नाटय़ात्मक चित्रणाला सूत्रधाराकरवी दिलेली शास्त्रीय संशोधनाची जोड प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालणारी असली, तरी नाटकात मात्र ती ठिगळासारखी येते. त्यानं रसभंग होतो. सूत्रधार हे पात्र नाटकात अपरिहार्य न ठरता ओढूनताणून आणल्यासारखं वाटतं. त्याचा आवश्यक तेवढाच वापर झाला असता तर ते सुसह्य़ ठरलं असतं. हा दोष वगळता नाटक भिन्न स्वभावाच्या व्यक्तींच्या सहजीवनातले ताण हसतखेळत मांडतं. ते मनोव्यापाराच्या अंगानं जात असलं तरी प्रेक्षकांच्या भावनिक ताणाचा दोर नको इतका ताणला जाणार नाही याची योग्य ती खबरदारी लेखक-दिग्दर्शकानं घेतली आहे. त्याकरता त्यांनी ब्रेख्तीयन शैली वापरली आहे. एकीकडे रंजन करत असतानाच दुसरीकडे मानवी स्वभावाच्या तऱ्हा, त्यांतले ताणेबाणे आणि त्याची होणारी परिणती प्रसन्नपणे मांडणारं हे नाटक प्रेक्षकाला बांधून ठेवतं, ते यामुळेच. नवरा-बायकोच्या नात्यातले परिचित कंगोरेच जरी नाटक मांडत असलं तरी त्याकडे पाहण्याचा नाटककर्त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्याला शास्त्रीय वास्तवाचं अस्तर जोडल्यानं मानवी नात्यातली ही गंमत त्रयस्थपणे छान एन्जॉय करता येते. सुदेश म्हशीलकरांच्या दिग्दर्शनात काही ठिकाणी नवखेपण जाणवत असलं तरी कलाकारांकडून हवं ते काढून घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. अपवाद : त्यांचा स्वत:चा! ते सहजपणे वावरले असले तरी मुळात या पात्राचं प्रयोजन जेवढय़ास तेवढंच राखणं गरजेचं होतं. सुहास आणि सुनिधीच्या क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रिया यांवरच हे नाटक बेतलेलं असल्यानं त्यांचा एकजिनसी मेळ महत्त्वाचा होता. तो नाटकात छानच जुळून आलाय. ‘बायको’ नामक प्राण्याची सगळी लक्षणं, त्यांच्या वर्तनातलं विक्षिप्तपण, नवरा कसाही वागला तरी त्यालाच दोषी ठरवण्याची बायकांची अफाट वकिली क्षमता आणि त्याकरता लागणारी तल्लख तर्कबुद्धी, कांगावखोरपणा वगैरे गोष्टी सुलेखा तळवलकर (सुनिधी) यांनी इतक्या बारकाव्यानं दाखवल्या आहेत, की समस्त नवरे मंडळींनी त्यांना ‘दिलसे’ दाद द्यावी. विलक्षण बोलका चेहरा हे अस्त्र त्यांना याकामी उपयोगी पडलं आहे. संतोष जुवेकर (सुहास) यांनी सरळमार्गी, परंतु बायकोच्या विचित्र, विक्षिप्त वागण्यामुळे मेटाकुटीला आलेला ‘बिच्चारा’ नवरा प्रभावीरीत्या उभा केला आहे. आपलं काही चुकलेलं असो वा नसो, तरीही सतत बचावात्मक पवित्र्यात राहणारा सुहास त्यांनी मस्त अभिव्यक्त केलाय. बाकी तांत्रिक अंगे ठीक.  
चार घटका निखळ करमणूक करणारं आणि नवरा-बायकोच्या नात्यातील काटेरी कंगोऱ्यांना शास्त्राधार सापडल्यानं हायसं वाटायला लावणारं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ एकदा प्रत्यक्ष अनुभवायला हरकत नाही.