प्रसूतीदरम्यान कोणत्याही आवश्यक चाचण्या न करता डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार या महिलेचा पती हरिभाऊ जंबे यांनी पारनेर पोलिसांकडे केली आहे. तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास सोमवंशी यांनी सांगितले.
म्हसणे येथील हरीभाऊ जंबे यांची पत्नी मनीषा हिच्यावर गरोदरपणात वडझिरे (ता. पारनेर) येथील डॉ. हांडे यांच्याकडे उपचार सुरू होते. बाळंतपणासाठीही तिला हांडे यांच्याकडेच दाखल करण्यात आल्यानंतर सिझेरीयन करावे लागणार असल्याने पारनेर येथील डॉ. श्रीकांत पठारे यांच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ. हांडे यांनी दिला. त्यानुसार मनीषा हीस ओंकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. पठारे, डॉ. हारदे, डॉ. आगले यांनी कोणत्याही तपासण्या न करता मनीषावर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. मात्र नंतर तिची व बाळाचीही तब्येत खालावली. बाळाला नगर येथील तांबोळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
पुढच्या दोन दिवसात मनीषा कोमात गेल्याने पठारे यांनी पारनेरमधील त्यांच्याच पाराशर हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले. तेथे तिची तब्येत आणखी बिघडली़  काही रक्त तपासण्या करण्यासाठी डॉक्टरांनी हरीभाऊ यास नगरला पाठवले. नंतर मनीषाला परस्पर नगर येथील पाठक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर पुण्याच्या केईएम रुग्णालयात मनीषास हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मनीषास पुणे येथे नेण्यात आल्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर पुण्यातच रूबी हॉलमध्ये तिला दाखल करण्यात येऊन पुन्हा शस्त्रक्रिया व येथे वीस दिवस उपचार करण्यात आले, मात्र त्याला यश आले नाही. अखेर त्यातच मनीषा हिचा मृत्यू झाला.
पारनेर येथील डॉ. पठारे यांच्याकडून हालगर्जीपणा झाल्यामुळे रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत होणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसे हमीपत्रही त्यांनी सहीनिशी दिले होते. खर्चाची काही रक्कम पठारे यांनी दिलीही. परंतु चुकीच्या उपचारामुळे मनीषाचा मृत्यू झाल्याने डॉ. पठारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हरीभाऊ जंबे यांनी केली आहे. मनीषावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर जंबे नातेवाईकांसह डॉ. पठारे यांच्याकडे गेले असता आपल्याकडे रुग्णाची कुठलीही कागदपत्रे नाहीत, यापुढे हॉस्पिटलमध्ये आलात तर खंडणी व मानहानीचा गुन्हा दाखल करील अशी धमकी त्यांनी दिल्याचेही जंबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. पठारे यांचा इन्कार
यासंदर्भात डॉ. श्रीकांत पठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला. मनीषा हिचा मृत्यू बाळंतपणातील हालगर्जीपणामुळे नाही तर, निमोनियामुळे झाला असे त्यांनी सांगितले. मात्र  जंबे यांना हमीपत्र का लिहून दिले, रुग्णाला पारनेरहून नगरला परस्पर का हालविले याची मात्र समर्पक उत्तरे ते देऊ शकले नाहीत.