बैलपोळ्याचा सण साजरा करण्याची घाई दिवसभर सुरू होती. बहुतांशी मशागत ट्रॅक्टरवरच सुरू असली, तरी कृषी संस्कृतीत राबणाऱ्या बैलाला झूल पांघरून त्याला ओवाळताना शेतकऱ्यांच्या मनात चिंता होती, ती पावसाची. मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर या वर्षी पाऊस चांगला आहे, असे वातावरण निर्माण झाले. दुष्काळ संपला, अशी भावना निर्माण झाली. मात्र, मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व जालना या चारही दुष्काळी जिल्ह्य़ांत पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिली. लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्य़ांतील पावसाच्या सरासरी धरणातील पाण्याची टक्केवारी ४६ असली, तरी औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्य़ांत गंभीर स्थिती आहे. पावसाळा संपत आला तरीही माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीनाकोळेगाव या चारही धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.
औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्य़ांतील पिके हातची जातील, अशी स्थिती आहे. पुन्हा एकदा मोठय़ा पाणीटंचाईच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे की काय, अशी विचारणा आपसांत होऊ लागली आहे. आता भिस्त केवळ परतीच्या पावसावरच आहे. येत्या आठवडाभरात तरी मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागातील अधिकारी सांगतात. गणपतीनंतर मोठे पाऊस झाले तरच पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आजही मराठवाडय़ात १३० टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक ७३ टँकर आहेत. पैठण, वैजापूर, गंगापूर व औरंगाबाद तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्य़ात भूम व कळंबमध्ये टँकरने पाणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांत पावसाच्या सरीही येईनाशा झाल्या आहेत. रिमझिम पावसामुळे पिके तगली असली तरी पाण्याच्या साठय़ात वाढ झाली नाही, तर पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागेल की काय, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठीचे संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होतील, असे चित्र आहे.
आमच्या जालन्याचे वार्ताहर कळवितात, की मागील १८ दिवसांपासून जिल्ह्य़ात पाऊस झाला नाही. खरीप पिकाची अवस्था वाईट नसली, तरी पावसाची गरज मात्र व्यक्त होत आहे. गेल्या १८ दिवसांत नेर-सेवली भागात काही प्रमाणात झालेल्या पावसाचा अपवाद वगळता जिल्ह्य़ात पावसाची गैरहजेरीच आहे. दि. १ जूनच्या सुमारास जिल्ह्य़ात पाऊस सुरू झाला होता. लवकर सुरू झालेला पाऊस लवकर जाईल, अशी शंकाही व्यक्त होत होती. मात्र, गणेशोत्सव व नवरात्राच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ऑक्टोबपर्यंत पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्य़ात या वर्षी ५ सप्टेंबपर्यंत ५४६ मि.मी. पाऊस झाला असून आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १०८ टक्के आहे. वार्षिक अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५ सप्टेंबपर्यंतचा पाऊस ८० टक्के आहे. जिल्ह्य़ात खरिपाच्या क्षेत्रात १०८ टक्के पेरणी झाली. ३ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पीक घेतले गेले. हे पीक आता फुले आणि बोंड लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे. अपेक्षेच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. जवळपास ७० हजार हेक्टर क्षेत्रावर मका आहे.
हिंगोलीचे वार्ताहर कळवितात, की सर्वाधिक पाऊस पडूनही पाणीपुरवठय़ाच्या देयकाची रक्कम थकल्याने आखाडा बाळापूरचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. वीज देयक थकल्याने २५ गावे मोरगव्हाण पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली गेली. त्याच्या विरोधात ग्रामस्थांनी बुधवारी रास्ता रोको केले. वाहतूक बंद पडल्याने पोलिसांनी २०० जणांना अटक केली. या योजनेचे ७१ लाख ७० हजार रुपये वीजबिल थकले आहे.