राजकारणात राहूनही अजातशत्रू अशी ओळख निर्माण करणारे, विरोधकांशी मैत्री जोपासत मतभेदाला मनभेदाकडे जाऊ न देण्यासाठी आटापिटा करणारे, अशी शांताराम पोटदुखे यांची ओळख होती. ऐंशी व नव्वदच्या दशकात चंद्रपूरचे सलग चारदा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे पोटदुखे हे ‘इंदिरानिष्ठ’, पण त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपद भूषवले ते मात्र नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात. मूळचे पत्रकार असलेले शांतारामजी राजकारणात स्थिरावले. हे क्षेत्र सभ्य माणसांचे आहे, यावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांनी कधीही कुणावर अनुचित टीका केली नाही. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांना गुरू मानत ते त्यांच्या याच स्वभावामुळे! १९९६च्या पराभवानंतर त्यांनी राजकारणातून जवळपास निवृत्तीच घेतली, पण सार्वजनिक जीवनातील त्यांचा वावर अखेपर्यंत कायम होता. चंद्रपूर व गडचिरोली या दोन मागास जिल्ह्य़ांच्या शैक्षणिक विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले.

अफाट वाचन व साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या शांतारामजींनी सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रांत अनेक संस्था उभ्या केल्या. विदर्भ साहित्य संघाचे ते अखेपर्यंत विश्वस्त होते. चंद्रपुरात त्यांनी दोन अ. भा. साहित्य संमेलने यशस्वी करून दाखवली. याशिवाय विदर्भ पातळीवर होणाऱ्या अनेक संमेलनांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांनी उभारलेल्या शिक्षण संस्थांचा परीघ आजही मोठा आहे. यात सर्व विचारांच्या लोकांना त्यांनी सामावून घेतले. त्यांच्याच संस्थेत काम करणारे प्राध्यापक विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवायचे, त्यांच्याविरुद्ध प्रचार करायचे, पण पोटदुखेंनी कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही अथवा सुडाचे राजकारण केले नाही. नोकरी मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची गुणवत्ताच त्यांनी बघितली. त्यामुळे त्यांच्या संस्थेचे स्वरूप कायम सर्वपक्षीय राहिले.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
palghar lok sabha election 2024, bahujan vikas aghadi palghar marathi news
पालघरमध्ये ठाकूरांचा उमेदवार महायुतीच्या विरोधात रिंगणात
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला त्यांनी कधी पाठिंबा दिला नाही. विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात झाल्यामुळेच येथील जनतेला तुकाराम, ज्ञानेश्वर हे संत कळले, अशी भूमिका ते नेहमी मांडत. तरीही त्यांनी विदर्भवाद्यांना कधी शत्रू म्हणून संबोधले नाही. देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली तेव्हा ते अर्थमंत्री मनमोहन सिंगांसमवेत अर्थराज्यमंत्री या नात्याने मंत्रिमंडळात होते. सत्तेच्या दालनात राहून या बदलाचे साक्षीदार ठरलेल्या पोटदुखेंनी विदर्भाच्या विकासातही मोलाचे योगदान दिले.

राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पक्षातील नव्या पिढीच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. काँग्रेसमधील गटबाजीकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. जे चांगले असेल, त्याच्या पाठीशी उभे राहायचे व वाईटाकडे दुर्लक्ष करायचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने आधीच्या पिढीतील एक महत्त्वाचा साक्षीदार विदर्भाने गमावला आहे.