जगभरावर पसरून ‘नववसाहतवादाचे’ रूप धारण करणाऱ्या हॉलीवूडनामक चित्रनगरीतील जगण्याचा सूक्ष्मदर्शी दस्तावेज म्हणून जॅकी कॉलिन्स यांच्या कादंबऱ्यांकडे पाहावे लागेल. स्वत:ला शुद्ध साहित्यिकांच्या (प्युअर लिटररी थिंग) पंथातील न मानता कोटय़वधी पुस्तके खपविण्याची लेखणी परजणारी लेखिका म्हणून जॅकी कॉलिन्स यांची ओळख आहे. लॉस एंजलिसमधील झगमगत्या दुनियेतील काळोखी, तेथील सेलिब्रेटींची लफडी-कुलंगडी, त्यांचे तऱ्हेवाईक व्यवहार, कामस्वैराचार आदी खऱ्या गोष्टींना काल्पनिकांच्या वेशात सजवून त्यांनी बरीच वाचकप्रियता कमावली. ब्रिटनमधील अतिश्रीमंत व उच्चसांस्कृतिक पाश्र्वभूमी बालपणी लाभलेल्या कॉलिन्स हॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेत आल्या. शिक्षण अर्धवट सोडून हॉलीवूड सिनेमांमध्ये घट्ट पाय रोवलेल्या मोठय़ा बहिणीकडे राहिल्या. तत्कालीन सेलेब्रिटी मार्लन ब्रॅण्डोसोबत प्रेमाचा पाठ गिरवून काही काळ छोटय़ा-मोठय़ा भूमिकांमध्ये हौस फिटल्यानंतर त्यांनी लेखनावर लक्ष केंद्रित केले. हॉलीवूडच्या सेलेब्रिटींपासून लॉस एंजलिसमधील गल्लीबोळातील जीवनव्यवहाराची त्यांची निरीक्षणे कागदावर उतरू लागली. कॉलिन्स यांच्या कादंबऱ्या फिल्मी बातम्यांपलीकडचे खरेखुरे उघडे-नागडे सत्य कादंबऱ्यांमधून मांडत होत्या. त्यांची पहिली कादंबरी ‘द वर्ल्ड इज फुल ऑफ मॅरिड मेन’ला त्यांच्या ब्रिटनमधील वास्तव्याचे संदर्भ आहेत. पुढील ‘स्टड’ या कादंबरीत अमेरिकी पाश्र्वभूमी आली. ‘हॉलीवूड वाइव्ह्ज’पासून ते ‘हॉलीवूड डायव्होर्स’पर्यंत त्यांच्या कादंबरी मालिका हॉलीवूड अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथच आहेत. नाइट क्लब, गँगस्टर, अलौकिक सुंदर व सर्वार्थाने धैर्यवान नायिका त्यांच्या कादंबऱ्यांत आल्या. ‘सेमी पोर्न’ अशी या कादंबऱ्यांची संभावना झाली, तरी टीका आणि लोकप्रियता यांचे गणित येथे व्यस्त होते! साठच्या दशकांत जोम धरलेल्या स्त्रीवादी विचारांना पुढे नेण्याचे काम त्यांच्या कादंबऱ्यांनी केले असे म्हटले, तरी चूक ठरणार नाही. गंमत म्हणजे ब्रेट इस्टन एलिस (लेस दॅन झीरो, अमेरिकन सायको) आणि चक पाल्हानिक (फाइट क्लब) यापुढे जगभर लोकप्रिय झालेल्या व निव्वळ पुरुषवादी म्हणून ओळखले जाऊन शुद्ध साहित्यिकांच्या पंथात पोहोचलेल्या अमेरिकी लेखकांच्या कृतींवरही या लेखिकेचा पगडा दिसून येतो. आजच्या काळात ई. एल. जेम्स यांनी ‘ममी पोर्न’ कादंबऱ्यांतून सजविलेल्या कामव्यवहाराचा उद्गम वेगळ्याच रूपात कॉलिन्स यांच्या लिखाणात दिसतो. प्रत्येक पुस्तक ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्ट सेलर यादीत नेणाऱ्या, ‘शुद्ध साहित्यिके’ऐवजी ‘रंजक-खूपविकी’ हा शिक्का असूनही अमेरिकी साहित्यावर प्रभाव पाडणाऱ्या कॉलिन्स यांचे निधन, हा ‘एका साहित्यप्रवाहाच्या सम्राज्ञीचा अंत’ आहे तो यामुळे!