आराधना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणजे युद्धाच्या कथा ऐकायला खूप छान असतात असं म्हटलं जातं. पण ते नक्की कोणासाठी? तर ज्याला त्या युद्धाची झळ पोहोचलेली नाही त्याच्यासाठी. बाकी हा शस्त्र संघर्ष कुटुंबे, समुदाय आणि मानवी समाजातील प्रगती विस्कळीत करण्यासाठी जबाबदार आहे. समाजातील सर्व घटक यामुळे प्रभावित होत असले तरी, त्याचे सर्वाधिक परिणाम महिला आणि मुलींना मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात.

अगदी पुराण काळाचा विचार केला तर रामायण असो की महाभारत, त्यावेळी झालेल्या युद्धाची झळ महिला वर्गाला सर्वाधिक बसलेली बघायला मिळते. मग ती रामायणातील सीता असो की महाभारतातील कुंती, गांधारी, द्रौपदी, उत्तरा यासारख्या स्त्रिया असो. अर्थात हे फक्त भारतातच नाही तर जगभरातील युद्धात बघायला मिळाले आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांच्या अभ्यास लेखानुसार, सध्याच्या काळातील युद्धाचा विचार केला तर असा अंदाज आहे की युद्धात मृत्यू झालेले सुमारे ९० टक्के नागरिक आहेत. त्यातही बहुतांश महिला आणि मुले आहेत. मागील शतकापर्यंत जेवढी युद्धे झाली त्यात प्राण गमावलेल्यांपैकी ९० टक्के लष्करी कर्मचारी होते. आता ते नागरिक असतात.

विध्वंसादरम्यान कौटुंबिक उपजीविकेची जबाबदारी महिलांकडे

अशा संघर्षाच्या परिस्थितीत अनेकदा स्त्रियांचा वापर हा युद्धाची रणनीती (हनी ट्रॅप) म्हणून पद्धतशीरपणे केला जातो. याव्यतिरिक्त सशस्त्र संघर्षात होणाऱ्या महिलांवरील हिंसाचाराच्या इतर प्रकारांमध्ये हत्या, गुलामगिरी, जबरदस्तीने गर्भधारणा आणि जबरदस्तीने नसबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. असे असूनही, महिलांकडे केवळ युद्धाचे बळी म्हणून पाहिले जाऊ नये अशी भूमिका संयुक्त राष्ट्रांनी वेळोवेळी मांडली आहे. त्यांच्या मते, अराजकता आणि विध्वंसादरम्यान कौटुंबिक उपजीविकेची जबाबदारी उचलण्यात महिला महत्त्वाची भूमिका बजावत असतात. याशिवाय अनेकदा शांतता चळवळीतही त्या सक्रिय असतात आणि त्यांच्या समुदायांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे काम त्या पार पाडत असतात. जागतिक स्तरावर होणाऱ्या शांतता वाटाघाटीच्या टेबलावर मात्र महिलांची अनुपस्थिती चांगलीच जाणवणारी असते.

हेही वाचा >> भारतातील दुर्मीळ ‘हरगीला’ पक्ष्यांचे संवर्धन करणाऱ्या पूर्णिमादेवी बर्मन कोण? ‘हरगीला आर्मी’बद्दल जाणून घ्या

आतापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सशस्त्र संघर्षाच्या प्रसंगी, कुटुंबे सहसा त्यांची घरे, मालमत्ता, मित्र आणि कुटुंबे सोडून इतर समुदायांमध्ये किंवा देशांमध्ये आश्रय घेतात, ज्यामध्ये सुमारे ५० टक्के महिला आणि मुली असतात. सक्तीने केले जाणारे किंवा होणारे विस्थापन यामुळे महिला आणि मुलींवर नकारात्मक परिणाम होताना दिसतात. लिंग-आधारित हिंसाचाराला बळी पडणे, शिक्षण सोडावे लागणे अशा अनेक समस्यांना या वर्गाला तोंड द्यावे लागते.

युद्धजन्य परिस्थितीत महिलांच्या आरोग्यावर परिणाम

युद्धजन्य परिस्थितीत महिला आणि मुलींच्या प्रजनन तसेच आरोग्यावर संघर्षाचा फार मोठा परिणाम होत असतो. अशा वेळी त्यांच्या मानसिक, पुनरुत्पादन आणि एकूण आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या निर्माण होत असतात. अनेकदा संघर्षांमुळे हिंसाचाराच्या घटना वाढतात; बलात्कार, एच. आय. व्ही./एड्ससह संक्रमित संसर्ग आणि नको असलेली किंवा जबरदस्तीची गर्भधारणा, मासिक पाळीच्यावेळी आवश्यक स्वच्छता, योग्य प्रमाणात पॅड्स न मिळणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खूप गंभीर स्वरूपाच्या असतात.

हेही वाचा >> पाणी भरण्याची जबाबदारीही ‘कंपल्सरी’ बाईचीच?…

हिंसाचारात महिलांचा शस्त्र म्हणून वापर

महिला, मुलींवरील लिंग आधारित हिंसाचाराचा वापर युद्धात शस्त्र म्हणून केला जातो. त्यात पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह आणि हिंसा, बलात्कार, मानवी तस्करी, जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले जाणे यांचा समावेश होतो. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की संघर्षमय परिस्थितीत ७० टक्क्यांहून अधिक महिला आणि मुलींनी लिंग आधारित हिंसा अनुभवली आहे. महिला आणि मुलींना बहुतेक वेळा लैंगिक शक्तीची ताकद दाखवण्यासाठी लक्ष्य केले जाते.

सीरियन गृहयुद्धादरम्यान, हिंसाचारामुळे तिथे अस्तित्वात असलेल्या सामाजिक रचनेमध्ये मोठे बदल बघायला मिळाले. या हिंसाचाराचे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हते, तर हिंसाचारातून वाचलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कारण त्यांची राजकीय आणि सामाजिक स्थिती त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आली आणि त्यांच्यांकडे केवळ ‘पीडित’ म्हणून बघितले जाऊ लागले.

रशिया युक्रेन, इस्रायल हमास युद्ध असो किंवा गृहयुद्ध; त्यासंबंधीच्या बातम्या टीव्हीवर बघताना अतिरंजित आणि भडकपणे बातम्या देण्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यांचा कल असल्याचे बघायला मिळाले. पण या युद्धांमुळे तिथल्या नागरिकांवर आणि विशेषतः महिला वर्गावर काय परिणाम झाला किंवा होत आहे याचे वार्तांकन झालेले बघायला मिळाले नाही. म्हणजे तिथेही समाजातल्या या महत्त्वाच्या घटकाकडे माध्यमांनीही दुर्लक्षच केल्याचे बघायला मिळाले.

युद्धामध्ये काय कमावले आणि काय गमावले याचा ज्यावेळी हिशेब लावला जातो त्यावेळी जीवितहानी, मालमत्तेची हानी याचा विचार होतो. मात्र मानवी जीवनावर आणि त्यातही महिलांवर होणारे त्याचे दूरगामी परिणाम यांचाही विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात यावी या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांच्या विविध उपसंस्था कार्यरत आहेत. मात्र अद्याप त्यांनाही यावर ठोस उपाय मिळालेला नाही हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extreme torture forced marriage rape human trafficking etc women are victims of war chdc sgk
First published on: 18-05-2024 at 17:39 IST