चारुशीला कुलकर्णी

लग्न झालं तेव्हा माया अवघी १४ वर्षांची होती. लग्न होऊन जालना जिल्ह्यातून ती सासरी नाशिकला आली. सासर होतं झोपडपट्टी परिसरात. लग्न झाल्यानंतर ती चारचौघींप्रमाणे चूल आणि मूल या चक्रात अडकली. गरीबी पाचवीलाच पुजलेली. पण पोट भरायचं तर घरातून बाहेर पडून हाताला काम मिळवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं हे तिच्या लक्षात आलं. ती कामाच्या शोधात घराबाहेर पडली. सरुवातीला कचरा वेचण्याच्या कामाला सुरुवात केली. पण या कामात तिचं मन काही रमेना. हे आपलं काम नाही, अशी अंतर्मनाची साद तिला ऐकू येई. वस्तीतील स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्यावर होणारे अत्याचार ती पहात होतीच, मग त्या विरोधात आवाज उठवावा असं तिच्या मनाला वाटे. मग एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिनं वस्तीतील बायकांचे प्रश्न जाणून घेण्यास व ते सोडविण्यास सुरुवात केली. या कामात ती रमली आणि पुढे हे काम करत असतानाच तिचा प्रवास येऊन पोहोचला तो व्हिडिओ जर्नलिस्ट पर्यंत. विशेष म्हणजे कुठलीही अक्षर ओळख नसलेली माया खोडवे शिक्षण, काम, संसार ही तारेवरची कसरत सांभाळत आंतरराष्ट्रीय स्तरावर वंचितांचा आवाज पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून काम करू लागली.

माया खोडवे मूळची जालना जिल्ह्यातल्या देवढे हातगावची रहिवासी. घरी आई-वडील, चार बहिणी, एक भाऊ असं मोठं कुटुंब. पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती, आर्थिक परिस्थिती बेताचीच; त्यामुळे मायाचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत होते. नकळत्या वयात माया खोडवेंबर कौटुंबिक जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे शिक्षणाशी संबंध आलाच नाही. पदरातल्या मुलीचं लग्न लावून दिलं की एका जबाबदारीतून आपण मुक्त होऊ या विचाराने आई-वडिलांनी वयाच्या १४ व्या वर्षीच मायाचं लग्न लावून दिलं. सासरची परिस्थितीही बेताचीच. तिचा नवरा गॅस टाक्यांच्या गाडीवर डिलिव्हरीचं काम करायचा. त्यातून मोजकंच उत्पन्न मिळायचं. वर्षभरात मूल झालं. आर्थिक परिस्थिती मात्र तशीच राहिली किंबहुना आणखीच खालावली. नवऱ्याचं आजारपण सुरू झाल्यानं उपासमारीचीच वेळ आली. काहीतरी केलं पाहिजे हा विचार मायाला गप्प बसू देईना.

आणखी वाचा-सात समुद्र पार करणारी ‘दर्याची राणी’; कोण आहे बुला चौधरी? जाणून घ्या…

आपली परिस्थिती बदलायची असेल तर स्वत: घराबाहेर पडून काम काम करण्यावाचून गत्यंतर नाही हे माया यांच्या लक्षात आलं. नाशिकची फारशी माहिती नसल्यानं एक दिवस त्या शेजारणीबरोबर कचरा वेचायला गेल्या. पहिल्या दिवशी ३०-४० रुपये मिळाले. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून माया यांनी हे काम सुरूच ठेवायचं ठरवलं. कामावर असताना तिला तिच्या वयाच्या मुली शाळा-कॉलेजात जाताना दिसायच्या. नोकरदार महिला कामावर जाताना दिसायच्या. मायाच्या मनात यायचं, शाळा शिकलो असतो तर आपणही आज असं काहीतरी करत असतो. शिकणााऱ्या मुलींना, कामावर जाणााऱ्या बायकांना पाहून आपणही काहीतरी वेगळं करायचं असं तिच्या मनाला वाटे. कचरा वेचण्याचं काम सुरू असतानाच तिनं मेणबत्त्या बनवण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. स्वत:बरोबर तिनं वस्तीतल्या इतर बायकांनाही त्याचं प्रशिक्षण दिलं. हळूहळू वस्तीतल्या महिलांना ती कायदा, आरोग्याचे महत्त्व, पैशांची बचत, मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व, मासिकपाळीच्या काळात स्वच्छतेचं महत्त्व इत्यादी गोष्टी सांगू लागली. या काळात तिनं शिक्षणाशी पुन्हा मैत्री केली. दरम्यान तिला ‘कागद काच पत्रा संघटने’अंतर्गत एक काम मिळालं. ते करत असतानाच तिनं ‘क्रांतिवीर महिला काचा वेचक संघटना’ नावाने संस्था सुरू केली. वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम केल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तिला सतावत असे. पण इथून पुढे कचरा वेचायचं काम करायचं नाही हे तिनं मनाशी ठरवून टाकलं होतं. आपल्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे ती स्वत:ला वारंवार बजावत असे.

आणखी वाचा-“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

मायाची अशी वेगवेगळी कामं सुरू होती. तिला तिच्या ओळखीतल्या, वस्तीतल्या कचरावेचक बायकांचे फोन यायचे. तेव्हा त्यांच्या अडचणी मात्र ती प्राधान्याने सोडवायची. अशीच छोटी-मोठी कामं करत असताना २०१० मध्ये तिने कचरावेचक महिलांवर एक व्हिडिओ तयार केला. आपलं आपणच शूटिंग केलं. त्याच दरम्यान तिची ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेन्ट’ या संस्थेची माहिती मिळाली. तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीतून तिला ‘व्हिडिओ व्हॉलेंटिअर इंटरनॅशनल’ या संस्थेची माहिती मिळाली. ही संस्था नियमित आर्थिक उत्पन्न नसणाऱ्या आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या व्यक्तींना पत्रकारीतेचे प्रशिक्षण देते. मायाने लगेचच यासाठी अर्ज केला. तो मान्यही झाला. प्रशिक्षणासाठी ती संस्थेच्या गोव्याच्या कार्यालयात जाऊन आली. त्यांनी तिला डॉक्युमेंटरी करण्यासाठी एक छानसा कॅमेरा दिला. नाशिकमध्ये दहा दिवसांचं प्रशिक्षण झालं. मायाला कॅमेराविषयक सर्व प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणानंतर मायानं ‘तुंबलेल्या ड्रेनेज’ मध्ये उतरून ते साफ करणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ तयार केला. त्यांना बोलतं केलं. संबंधित अधिकाऱ्यांना तो व्हिडिओ दाखवला. त्यांनाही तो आवडला. या व्हिडिओमधून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात आलं. या व्हिडिओतून ती वस्तीतल्या लोकांचा, अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करू शकली. त्यानंतर तिने अनेक विषयांवर व्हिडिओ तयार केले आणि स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

आणखी वाचा-सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

दरम्यान आपल्याला लिहायला वाचायला येत नाही त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामना करावा लागतो, हे लक्षात येताच तिनं पुन्हा शिकण्यास सुरुवात केली. लिहिण्याचा सराव सुरू केला. वाचायला लागली. रोजचा जमाखर्च, रोजचे अनुभव ती लिहू लागली. त्यातून तिचा आत्मविश्वास वाढत गेला. शूटिंग करून मग एडिटिंग, स्क्रिप्ट, फोटोशॉप, निवेदन या गोष्टीही महत्त्वाच्या असतात हे लक्षात आल्यानं त्यादेखील तिनं शिकून घेतल्या. ती लॅपटॉप चालवायला शिकली. २०१० मध्ये चीन मध्ये झालेल्या ‘क्लायमॅट चेंज’ परिषदेत तिला महाराष्ट्रचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दहा दिवस तेथे दौरा करून आपलं मत मांडून आली. करोना काळातही तिचं काम चालूच होतं. एका इंग्रजी वृत्तपत्रात तिच्या कामाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून उद्योजक सायरस पूनावाला यांनी तिच्याशी संपर्क करून तिला मुंबईत भेटायला बोलावलं. दरम्यान त्यांनी तिच्यासाठी एक नवीकोरी कार बुक करून ठेवली होती. तिची कागदपत्र मागवून, औपचारिकता पूर्ण करून तिच्याकडे गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. हीच गाडी तिला करोना काळात ग्रामीण भागात जाताना, तिथल्या लोकांना उपचारासाठी, अन्य कामांसाठी नाशिकला घेऊन येण्यासाठी उपयोगी ठरली. सध्या ती पेठ, हरसूल, त्रंबकेश्वर, मालेगाव, सुरगाणा या भागांमध्ये काम करतेय.

सध्या मायाताई काही महिलांना मोहाच्या फुलांपासून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. ही उत्पादने बाजारपेठेत आणून या महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.