Rekha Jhunjhunwala 118 Crore Property Deal: दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मलबार हिल येथील एका इमारतीतील सर्व फ्लॅट्स तब्बल ११८ कोटींना विकत घेतल्याचे वृत्त आहे. मनीकंट्रोलच्या हवाल्याने फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अथांग अरबी समुद्राचा नजारा विना अडथळा अनुभवता यावा यासाठी रेखा यांनी सदर व्यवहार केल्याचे समजतेय. यापूर्वी झुनझुनवाला यांच्या मलबार हिल येथे स्थित ‘RARE’ व्हिलातुन समुद्राचे सुंदर दृश्य पाहता येत होते, मात्र या व्हिलाच्या मागेच असलेल्या रॉकसाइड सोसायटीचे क्लस्टर स्कीम अंतर्गत पुनर्बांधकाम होणार होते. यानंतर व्हिलामधून दिसणाऱ्या सी व्ह्यूमध्ये अडथळा येणार होता, हे टाळण्यासाठी रेखा यांनी रॉकसाइड सोसायटीमधील सर्व फ्लॅट्स ११८ कोटी रुपये खर्च केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेखा झुनझुनवाला यांनी कसा व्यवहार केला?

प्रख्यात डेव्हलपर शापूरजी पालोनजी यांनी सादर केलेल्या महत्त्वपूर्ण प्रस्तावात, रॉकसाईड सोसायटीच्या नव्या बांधकामातील रचनेत प्रत्येक घर मालकाला जवळपास ५० टक्के अतिरिक्त कार्पेट एरिया मिळणार असल्याचे सांगितले होते. Zapkey द्वारे प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार, नोव्हेंबर २०२३ पासून झुनझुनवाला यांनी एकाधिक संस्थांचा वापर करून, पुनर्विकासाधीन असलेल्या या इमारतीतील नऊ अपार्टमेंट्स ११८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. अहवालानुसार, आतापर्यंत या कुटुंबाने इमारतीतील २४ पैकी १९ फ्लॅट्स खरेदी केले आहेत.

कोण आहेत रेखा झुनझुनवाला?

रेखा झुनझुनवाला या दिवंगत उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश झुनझुनवाला हे भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध होते. झुनझुनवाला हे ‘रेअर एंटरप्रायझेस’ चे संस्थापक होते आणि टाटा समूहाच्या अंतर्गत असलेल्या टायटन या कंपनीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण शेअर्स होते. दिवंगत राकेश झुनझुनवाला यांना त्यांच्या व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल २२ मार्च २०२३ रोजी मरणोत्तर पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

रेखा झुनझुनवाला यांचे जीवन आणि शिक्षण

रेखा झुनझुनवाला यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबई विद्यापीठात घेतले होते. १९८७ मध्ये, त्यांनी भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना निष्टा, आर्यमन आणि आर्यवीर अशी तीन मुले आहेत.

हे ही वाचा<< मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती

फोर्ब्सच्या मते, (२५ मार्च २०२४ पर्यंत) रेखा झुनझुनवाला यांच्याकडे अंदाजे ८.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांच्याकडे टायटन, मेट्रो ब्रँड्स, स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्स या कंपनीचे प्रमुख शेअर्स आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai women buys 19 flats worth 118 crores in malbar hill just to see sea at marine drive who is rekha jhunjhunwala net worth svs
First published on: 27-03-2024 at 10:32 IST