-मैत्रेयी किशोर केळकर
बागकाम करताना रोपांची अचूक निवड करणं महत्त्वाचं असतं, पण त्याबरोबरच झाडांना लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि खतांची निवडही महत्त्वाची असते. यासाठी रासायनिक पर्याय न निवडता साधी सहज उपलब्ध होणारी सेंद्रिय खतं निवडावीत. नव्याने बागकाम करणारी व्यक्ती अतिशय उत्साहाने नर्सरीतून एखादं रोपं आणते. काही दिवस ते उत्तम वाढतं. पुढे मात्र त्याची वाढ खुंटते किंवा मंदावते. बरेचदा तर ते सुकून जाते. त्यामागचं कारण न कळल्याने मग हळूहळू वाढत राहते.

नर्सरीमध्ये रोपांची निगुतीने काळजी घेतली जाते. ती आणि तेवढी जर घरी आपण घेतली नाही तर मग साहजिकच रोपं मरतात. कुठल्याही कुंडीत वाढणाऱ्या झाडाला पाणी, सूर्य प्रकाश, मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये या गोष्टींची गरज असते. अलीकडे इनडोअर प्लांटस् म्हणजे सावलीत वाढणारी झाडं मिळतात. ती वाढवताना हे लक्षात घ्यायला हवं की एकदोन दिवसाने का होईना त्यांनाही सूर्यप्रकाश मिळायला हवा. प्रखर ऊन नको पण स्वच्छ सूर्यप्रकाश (क्लिअर सनलाईट) मात्र हवाचं, तरच त्यांची चांगली वाढ होईल, अन्यथा त्यांची पानं पिवळी पडायला लागतील.

आणखी वाचा-निसर्गलिपी: पुष्पलता

खतांमध्ये एन् पी. के. (NPK) म्हणजे नत्र (नायट्रोजन) स्फुरद (फॉस्फरस) आणि के म्हणजे पालाश (पोटॅशियम) यांनी युक्त असे खत. नायट्रोजनमुळे झाडं तजेलदार दिसतात. पाने हिरवीगार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांची सर्व अंगाने उत्तम वाढ होते. पावसाळ्यात जर तुम्ही एक छोटासा प्रयोग केलात तर तुम्हालाही या नायट्रोजनमुळे कसा फरक पडतो ते सहज कळेल. एकाच प्रकारचं रोप लावलेल्या दोन कुंड्या घेऊन त्यातील एक कुंडी पावसाचं पाणी मिळेल अशा ठिकाणी ठेवली व दुसरी अजिबात पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवली तर आपल्याला फरक दिसेल. पावसाचं पाणी ज्याला मिळत होतं ते झाड अधिक हिरवं, तजेलदार आणि फोफावलेल असेल. यावरून नायट्रोजनचं महत्त्व अधोरेखित होईल.

फॉस्फरस म्हणजेच स्फुरद हा घटक झाडाला उत्तम फुलं आणि फळं येण्यासाठी आवश्यक असतो तर पोटॅशियम म्हणजे पालाशमुळे अन्नद्रव्यांची वहन आणि प्रकाशसंश्लेषण तसेच श्वसन क्रियेत भाग घेणाऱ्या घटकांची कार्यक्षमता वाढते. बाजारात तयार NPK खत मिळतं, पण आपण जर ते घरच्या घरी तयार करून वापरलं तर अधिक चांगलं. चहाची पूड स्वच्छ धुवून कोरडी करून वापरली तर झाडांना नायट्रोजनचा पुरवठा होतो. केळ्याची वाळलेली सालं स्फुरद देतात तर चुलीतील राखेच्या वापराने पालाश मिळतं.

आणखी वाचा-निसर्ग लिपी – सरत्या ऋतूत येत्या ऋतूची तयारी

जर हे घटक एकत्र करून यांचं मिश्रण एकत्रितपणे दिलं तर रोपांची उत्तम वाढ होते. या व्यतिरिक्त जर घरात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांची देठे, साली, नारळाच्या शेंड्या, निर्माल्याची फुलं, वाया गेलेली पिठं, डाळ तांदूळ धुतलेलं पाणी या घटकांचा वापर ही झाडांच्या वाढीला हातभार लावतो. यासाठी कोणताही खर्च येत नाही. रोजच्या वापरातील भाज्या, फळांची देठं आणि साली या कचऱ्यात न टाकता साध्या वर्तमानपत्र किंवा खाकी पिशव्यांवर पसरून सुचवल्या आणि चुरून त्याचा खत म्हणून वापर केला तरी रोपांची वाढ जलद होताना दिसेल.

कंपोस्ट करण्याएवढी जागा असेल तर मग तो पर्यायही वापरता येईल. एखाद्या बादलीत किंवा ड्रममध्ये कंपोस्ट तयार करता येईल. शेण्या किंवा गोवऱ्यांचा चुरा वापरता येईल. या सगळ्या घटकांमुळे झाडांची वाढ उत्तम होईल.

या गोष्टी सहज उपलब्ध तर आहेतच, पण वापरायलाही सोप्या आहेत. खतं देण्याबरोबरच योग्य छाटणी करणे हेही वाढीसाठी आवश्यक असतं. पुढच्या लेखात छाटणी, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि खतांसाठी इतर कोणते पर्याय वापरता येतील ते पाहू.

mythreye.kjkelkar@gmail.com