“मॉम , यू शट अप! तुला काहीच माहीत नसतं. मला अव्हेंजर पाहिजे आहेत. घोस्ट रायडर हा अव्हेंजर नाहीये काही!” छोटासा वरुण खेळण्याच्या दुकानातच ओरडला आणि चार लोकांनी चमकून एकदम त्याच्या आईकडे बघितलं. तशी सानिका ओशाळली.
आपल्या इवल्याशा मुलाने ओरडून आपला असा अपमान करावा, हे तिला नक्कीच खटकलं. परवा सोसायटीत सायकल चालवताना मी काही सेकंदासाठी सोडली सायकल तर कसला ओरडला होता अंगावर. हे बरोबर नाही. ती स्वतःशी हा विचार करत असताना तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संवाद आठवत होती. बोलता बोलता त्यानं, यू शट अप! बोलल्याचं तिला आठवलं. नेमकं तेच वरुणनं उचललं असणार. परवा आई म्हणाली ते बरोबर आहे. ती म्हणाली, या वयातील मुलं हे एखाद्या स्पंज सारखी असतात. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतून, मोठ्यांच्या कृतीतून अतिशय पटकन सगळं मेंदूत साठवतात. गरज भासेल तसं शब्द आणि संवादात वापरतात. मोठ्यांच्या वागण्याचं प्रतिबिंब छोट्यांच्या कृतीत दिसतं.
परवा शेजारच्या नीताचा सात वर्षांचा अभी तिला म्हणाला, “आई, तू फक्त एक हाऊस वाइफ आहेस ना, म्हणून स्मार्ट दिसत नाहीस. ती सुरुचीची आई बघ किती फॅशनेबल राहते. म्हणून मग आजी तुला गबाळी म्हणाली!” हे ऐकून नीताला फार वाईट वाटलं होतं. आपल्या मुलाला आपल्याबद्दल असं वाटतं याचं आश्चर्य देखील वाटलं. वस्तीतल्या मुलांना शिकवणाऱ्या तिनं तिच्या साध्या नीटनेटक्या राहण्या मागचं कारण मुलाला समजावून सांगितलं, ते त्याला पटलंही, आणि यापुढे असं काही न बोलण्याचं आश्वासनही त्यानं दिलं.
हेही वाचा… शाहरुख… पर्स आणि आदर
एकल पालक असलेल्या निशाला एक दिवस तिचा मुलगा म्हणाला, “शिट यार मॉम ! ही तुझी थर्ड क्लास नोकरी सोडून दुसरी एखादी बरी सॅलरी असलेला जॉब घे की! आपण जरा नीट तरी राहू.” त्याच्या या बोलण्याने ती खूप दुखावली, पण स्वतःला सावरुन तिला त्याला समजावून सांगावं लागलं, की तिच्या या नोकरीपायी आज त्यांच्या डोक्यावर छत आणि खायला पुरेसं अन्न आहे. आपण नशीबवान आहोत. आज आपण जे जगतोय इतकंही अनेकांच्या वाट्याला येत नाही. ती दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे, पण नोकरी मिळणं इतकं सोपं नाही.
बारा वर्षाच्या सावीनं तिच्या आईला, गीताला शाळेच्या गेट पासून थोडं दूर सोडायला सांगितलं. म्हणाली, “इथेच थांब आई! ही असली ओल्ड डबडा गाडी माझ्या फ्रेंड्सनी बघितली तर मला चिडवतील. बाकीच्या मुली कसल्या भारी गाड्यात येतात! आता आपण नवीन गाडी कधी घेणार ते सांग मला!” गीताला फार आश्चर्य आणि वाईटही वाटलं होतं. घरात कार आहे, आपली आई गाडी चालवत सोडायला, न्यायला येते याचं कौतुक दूरच राहिलं. उलट आईचा अपमान करताना काहीच कसं वाटत नाही या मुलांना? तिला वाटून गेलं.
मग एकदिवस गीतानं ठरवून सावीला एका खेड्यात नेलं. लांब अंतरावरून पायी शाळेत जाणारी मुलं, शेतात काम करणारी मुलं, त्यांची छोटी छोटी घरं, आणि त्यांची शाळा हे सगळं दाखवलं. तिथल्या शाळांमधून शिकून मोठ्या गावात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलींची ओळख करून दिली. भर पावसात हातात चपला घेऊन त्यांना कसा चिखल तुडवत जावं लागतं हे दाखवलं. हे सगळं करताना त्या मुली किती आनंदी आणि आशावादी आहेत हे बघून सावीला तिच्या सुखाची जाणीव झाली. आणि ती आईला सॉरी म्हणाली.
पूर्वी आईवडील हे मुलांचं दैवत असायचं. त्यांना उलटून बोलणं तर खूप दूर , साधं बोलणं खोडून काढण्याची हिंमत नसायची. मनात आदर आणि दरारा असायचा. आता पालक मुलांचे मित्र असतात ही खूप जमेची बाजू आहे, पण अशी मैत्री जपताना मुलं त्यांची मर्यादा ओलांडत असतील तर त्याच क्षणी त्यांना प्रेमळ कानपिचक्या देण्याची गरज आहे. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती कायमच त्यांच्या संस्कारांना आव्हान देणारी असणार आहे. त्या आव्हानांना उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यात आणण्याचं अवघड कसब आजच्या पालकांना अंगी बाणवण्याची नितांत गरज आहे. त्यांच्या पुढील वाट निसरडी आहे म्हणून बोलताना आणि वागताना आई वडिलांना देखील प्रचंड संयम बाळगण्याची गरज आहे हे नक्की. पण मुलांना योग्य वेळी योग्य त्या शब्दांत समजावून सांगण्याचीही गरज आहे.