काही दिवसांपू्र्वी मुंबईकर तरुणीच्या चॅटचा एक स्क्रीन शॉट व्हायरल झाला. त्या तरुणीनं या चॅटमध्ये जोडीदाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत, याबद्दलचं मत बिनधास्तपणे व्यक्त केलं होतं. त्यात तिनं जोडीदाराला वार्षिक पगार एक कोटी रुपये असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तिच्या या अपेक्षेनं एकच चर्चा रंगली. त्यामध्ये “हल्ली पोरांना पोरी मिळत नाहीत आणि या पोरी एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवतात”, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली होती. कोणी तर या तरुणीला तिचा पगार विचारला, तर कोणी तिच्यावर सडेतोड टीका केली. पण, खरंच या तरुणीचं काय चुकलं? तिनं फक्त तिची स्वत:ची अपेक्षा बोलून दाखवली. श्रीमंत नवरा पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का?

स्त्रियांना जोडीदार निवडण्याचा अधिकार

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पूर्वी स्त्रियांना जोडीदार निवडण्याचा अधिकार नव्हता. आई-वडील किंवा घरातील वडीलधारी माणसं म्हणतील त्या पुरुषाबरोबर तिला बोहल्यावर चढावं लागायचं.आजही देशात अनेक ठिकाणी मुली घरच्यांच्या पसंतीनंच लग्न करतात; ज्याला आपण सोप्या भाषेत अरेंज मॅरेज म्हणतो. पण, काळ बदलला आहे. मुली उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगल्या-वाईटाची समज येत आहे. आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट हे त्यांना कळतंय. त्यामुळे त्या स्वत: जोडीदार निवडण्याचा विचार करतात. ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे, ती व्यक्ती निवडण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणे स्त्रियांनासुद्धा आहे. त्यामुळे ती तिच्या अपेक्षांप्रमाणे जोडीदार निवडू शकते.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
siblings jealousy
भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

महिलांनी भावी जोडीदाराकडून अपेक्षा का ठेवू नयेत?

“मला सुंदर मुलगी हवी आहे, ती पदवीधर असावी, तिनं लग्नानंतर जॉब करू नये, घर, कुटुंब सांभाळणारी मुलगी हवी” अशा अपेक्षा पुरुष मंडळी बिनधास्तपणे बोलून दाखवतात. मग महिलांनी भावी नवऱ्याकडून का अपेक्षा ठेवू नयेत? ज्या आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्या आई-वडिलांचं घर सोडून लग्नानंतर जेव्हा मुलगी एका अनोळखी घरात जाते, तेव्हा त्या पुरुषाकडून अपेक्षा ठेवण्याचा तिला अधिकार आहे. संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तीबरोबर तिला घालवायचं आहे; तो कसा असावा, ही अपेक्षा करणं चुकीचं नाही. मग ती अपेक्षा कोणत्याही प्रकारची असू शकते.

‘श्रीमंत नवरा पाहिजे’ ही अपेक्षा ठेवणे चुकीची आहे का?

अरेंज मॅरेज करताना आई-वडील जेव्हा मुलीसाठी मुलगा शोधतात तेव्हा ते काय बघतात? एक चांगला सुसंस्कृत मुलगा, एक चांगलं कुटुंब, घर-संपत्ती आणि मुलगा चांगला कमावणारा असावा, अशी त्यांची अपेक्षा असते. कोणतेही आई-वडील बेरोजगार मुलाबरोबर त्यांच्या मुलीचं लग्न लावून देणार नाहीत. कारण- त्यांना माहीत आहे की, आयुष्य, घर, संसार चालविण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. श्रीमंत जावई मिळाला, तर कोणत्याही आई-वडिलांना आनंदच होईल आणि मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबाचा भाग होईल, याचं त्यांना समाधान राहील. मग आई-वडील श्रीमंत जावयाची अपेक्षा करू शकतात, तर मग मुलगी श्रीमंत नवऱ्याची अपेक्षा का करू शकत नाही?

खरं तर जोडीदार निवडणं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मुंबईच्या या तरुणीनं तिची अपेक्षा सांगितली. ज्या तरुणाचा वार्षिक पगार एक कोटी रुपये असेल, तो तिच्या अपेक्षेस पात्र राहील. खरं तर हे विसरायला नको की, महिलांनाही नवरा म्हणून पुरुषांना नाकारण्याचा अधिकार आहे. वार्षिक पगार एक कोटी असावा किंवा दोन कोटी असावा ही तिची त्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे; ज्याच्याबरोबर तिला तिचं संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं आहे. मग जोडीदाराकडून आर्थिक बाबतीत ही अपेक्षा ठेवणं काहीही चुकीचं नाही.