मैत्रेयी किशोर केळकर
मुळात डोंगर उपसून आणलेली तयार लाल माती जी नर्सरीत मिळते तिचा वापर बांगकामासाठी मी कधीही केला नाही. आपल्या घरातील ओला कचरा सुकवून त्याचा चुरा, नारळाच्या शेंड्या, काडीकचरा आणि वाळलेला पालापाचोळा या गोष्टी कुंडी भरण्यास आणि झाड वाढवण्यासाठी पुरेशा असतात. यात वाढणाऱ्या झाडांना सूक्ष्म अन्नद्रव्ये तर मिळत रहातातच, पण पाण्याचाही उत्तम निचरा होतो. लालमाती गच्च होऊन झाडाला जी खेळती हवा मिळत नाही तीही समस्या या पद्धतीत उद्भवत नाही. शिवाय कुंडी वजनाला हलकी होते. गच्ची किंवा गॅलरी मातीच्या ओघळांनी खराब होत नाही ते वेगळंच.

झाडांसाठी आवश्यक असलेल्या एम्.पी. के. ची माहिती आपण मागील लेखात घेतली. या मुख्य अन्नद्रव्यांच्या व्यतिरिक्तही झाडांना अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते.जमिनीत वाढणाऱ्या झाडांना ही सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज मिळून जातात, पण कुंडीत वाढणाऱ्या रोपांना ती पुरेशा प्रमाणात पुरवावी लागतात.आपण जर घरच्याघरी केलेल्या कंपोस्टचा वापर खत म्हणून करणार असू तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची फार काळजी करावी लागत नाही, पण जर लाल मातीत आपण झाडं वाढवत असू तर मात्र वेगवेगळ्या सेंद्रिय घटकांचा वापर करावा लागतो.

हेही वाचा >>>घर, मूल अन् संसार सांभाळत जिद्दीने बनल्या ‘ग्रामीण’ भागातील उद्योजक! पाहा त्यांचा प्रवास…

या संबंधी माझा अनुभव सांगते. मुळात डोंगर उपसून आणलेली तयार लाल माती जी नर्सरीत मिळते तिचा वापर बांगकामासाठी मी कधीही केला नाही. आपल्या घरातील ओला कचरा सुकवून त्याचा चुरा, नारळाच्या शेंड्या, काडीकचरा आणि वाळलेला पालापाचोळा या गोष्टी कुंडी भरण्यास आणि झाड वाढवण्यासाठी पुरेशा असतात. यात वाढणाऱ्या झाडांना सूक्ष्म अन्नद्रव्ये तर मिळत रहातातच, पण पाण्याचाही उत्तम निचरा होतो. लालमाती गच्च होऊन झाडाला जी खेळती हवा मिळत नाही तीही समस्या या पद्धतीत उद्भवत नाही. शिवाय कुंडी वजनाला हलकी होते. गच्ची किंवा गॅलरी मातीच्या ओघळांनी खराब होत नाही ते वेगळंच. त्यामुळे कधीही या सहज उपलब्ध गोष्टींच्या वापराने झाडांची लागवड करणे हे योग्य. जर आपण जसं भरपूर पदार्थ एकाच वेळी पानात वाढून घेतले तर त्या सगळ्या पदार्थांना आपण योग्य न्याय देऊ शकत नाही हा आपला अनुभव आहे. तसंच झाडांचंही आहे. लालमाती, त्यावर कंपोस्ट सोबत कृत्रिम खत असं सगळं एकदाच देऊन कृतकृत्य झाल्याच्या भावनेने आपण जर झाडं उत्तम वाढलीच पाहिजे असं म्हणत राहिलो तर तसं होत नाही. सगळीच अन्नद्रव्ये ही एकदम एकाचवेळी वापरली जात नाहीत. वाढीच्या अवस्थांप्रमाणे पोषकतत्वांची गरज आणि प्रमाण हे बदलत जातं. बी पासून रोपं तयार होताना सुरुवातीला फक्त मातीचा संपर्क, पुरेशी आर्द्रता आणि थंडावा एवढ्याच गोष्टींची गरज असते. बीज अंकुरित झाल्यावर मात्र पोषकत्वांची गरज पडते. अशावेळी मातीत आधीच मिसळलेल्या कंपोस्टचा उपयोग होतो. मूळ, खोड तयार होताना त्याहून अधिक पोषक तत्त्व लागतात आणि फुलं आणि फळधारणेच्या काळात ही गरज खूपच जास्त असते. साधारण झाडांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात हेच वेळापत्रक असतं.

हेही वाचा >>>Menstrual Hygiene Day 2024 : सॅनिटरी पॅड्सच्या जाहिरातीत कशाला हव्यात उड्या मारणाऱ्या मुली?

फळभाज्या, पालेभाज्या यांचा जीवनकाळ लहान असतो त्यावेळी हे सगळं दिवसांच्या हिशोबानं सांभाळावं लागतं. फुलंझाडं आणि फळझाडं यांच्या बाबतीत हे महिन्याच्या हिशोबानं सांभाळावं लागतं. लोह, मॅंगनीज, झिंक बोरॉन, कॅल्शियम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

याबाबतीत माझा एक अनुभव सांगते. मी नियमाने टोमॅटोची रोपं बियांपासून तयार करून वाढवते. जेणेकरून रोजची स्वयंपाकघरातील गरज भागवी. माझ्याकडे एक छोटं कासव आहे ते हिरव्या भाज्या आणि टोमॅटो आवडीनं खातं. कासवाच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या टोमेटोच्या बीया मातीत आपसूकच रूजून येतात आणि भरपूर रोपं तयार होतात.

ही रोपं मी घरी तयार झालेल्या कंपोस्टयुक्त मातीत वाढवते. एक वेळा असं झालं की रोपं उत्तम वाढली. भरपूर फळधारणाही झाली. छोटे गरगरीत हिरवे टोमॅटोही तयार झाले, पण ते मुळी पिकेचनात. लालरंग काही येईना. शिवाय प्रत्येक फळांच्या खाली गोल काळसर रिंगण तयार झालेलं. नीट निरीक्षण केल्यावर ही कमतरता कॅल्शियमची आहे हे लक्षात आलं .मग अंड्यांची टरफल जमवली, स्वच्छ करून वाळवली आणि त्याचा चुरा मातीत मिसळला. तयार फळांवर या उपायाने काही परिणाम झाला नाही, पण नवीन येणारी फळं मात्र चांगली आली. या छोट्या उपायानं कॅल्शियमची गरज सहज भागली.

अशाच काही सोप्या उपायांमधील आपण पुढील लेखात माहिती घेऊ.

mythreye.kjkelkar@gmail.com