आराधना जोशी

शालेय जीवनात लसावि, मसावि, चक्रवाढ व्याज, मुद्दल, मुदत अशी गणितं लीलया सोडवणारी मुलं प्रत्यक्ष आयुष्यातील पैशांच्या गणितांबाबत किती जागरुक असतात किंवा किती पालक त्यांना आर्थिक नियोजन शिकवतात? लहान वयात पैशांचे व्यवहार कशाला असा विचार करणारे असंख्य पालक आहेत. मात्र बालवयातच बचत आणि आर्थिक नियोजनाचे धडे मुलांना मिळाले तर भविष्यात ते कोणत्याही आर्थिक अडचणीतून मार्ग काढू शकतात, ती मुलं लवकर स्वावलंबी होऊ शकतात.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
chatura article on small kid, chatura parent article
समुपदेशन : मुलांच्या जगातून पालक हरवतात?
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

बुद्धीचा वापर करून आवश्यक त्या गोष्टींसाठी, योग्य ठिकाणी पैसे खर्च करणं म्हणजेच आर्थिक साक्षरता नव्हे, तर बचत आणि गुंतवणुकीची सवय लावून घेणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या काळात आर्थिक साक्षर असणं हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलाय. महागाई वाढत असताना दैनंदिन खर्च भागवताना बहुतांश पालक मुलांच्या भविष्याचा विचार करून ठराविक रक्कम त्यांच्या नावाने कुठे ना कुठे गुंतवत असतात. शिक्षणाच्या दृष्टीने या गुंतवणुकीचा परतावा कसा मिळेल याचा विचार करत असतात. मात्र या सगळ्यात मुलांनाही आर्थिक व्यवहार समजावेत यासाठी पालकांकडून विशेष प्रयत्न केले जात नाहीत.

हेही वाचा >> “बुवा आला…, पोलीस आले…”; अशी भीती तुम्हीही मुलांना घालता का? मुलांच्या ‘घाबरटपणा’मागे पालकच ठरतात जबाबदार!

हल्ली अनेक घरांमधून एक ठराविक रक्कम मुलांना पॉकेटमनी म्हणून दिली जाते. याच्या मदतीने भविष्यातील आर्थिक तरतूद कशी करता येईल? मित्र – मैत्रिणीला वाढदिवसाची भेट या पॉकेटमनीमधून कशी देता येईल, याचा विचार करायला शिकवता येते. कधीतरी पालकांनी गरज नसतानाही मुलांकडून अगदी किरकोळ रक्कम (त्यांनी साठवलेल्या पॉकेटमनीमधून) मागून घेतली तर, ती देताना मुलांना झालेला आनंद जितका महत्त्वाचा असेल तितकंच बचतीचे महत्त्व त्याला पटवून देण्याचं असेल. आपलं उत्पन्न (पॉकेटमनी) आणि आपण करत असलेले खर्च यांचा ताळमेळ कसा घालायचा, हातात पुरेसा पैसा नसेल तर एखादी महाग वस्तू लगेच घेता येणार नाही, हे लक्षात आल्यावर थोडा काळ वाट बघणं अशा गोष्टी आपसूकच मुलं शिकत जातात. उत्पन्नाला असलेली मर्यादा, त्यात निभावून न्यावे लागणारे खर्च आणि शिवाय, होणारे आकस्मिक खर्च यातून मार्ग काढणं, प्राधान्यक्रम ठरवणं हे सगळं मुलांना लहान वयात शिकविता आलं, तर पालकांची अधिक अधिक पैसे कमावण्यासाठी होणारी धावपळ ही खऱ्या अर्थानं बरीच आटोक्यात येऊ शकते.

थोड्या-मोठ्या वयाच्या मुलांचं बँक अकाउंट पालकांनी काढावं. त्याचे व्यवहार कसे चालतात, बँकेत पैसे कसे भरायचे, त्यावर व्याज कसं मिळतं? बँकेचा चेक कसा लिहायचा? असे अनेक व्यवहार मुलांना यामुळे शिकवता येतात. याशिवाय दिवसभरात घरातल्या व्यक्तींचा एकंदर किती खर्च झाला, तो कुठे झाला याचीही नोंद करायला मुलांना शिकवलं तर अनावश्यक खर्च कुठे झाला? का झाला? याचीही जाणीव मुलांना आणि पालकांनाही होत जाते.

हेही वाचा >> भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

याशिवाय पुढील मुद्देही विचारात घेतले जाऊ शकतात –

  • घरासाठी आर्थिक नियोजन करताना, घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयात मुलांनाही अवश्य सहभागी करून घ्या. वस्तूची खरेदी एकरकमी पैसे देऊन करणार असाल तर त्याचे काय फायदे आहेत किंवा लोन काढून, हप्ते भरून वस्तू विकत घेणार असाल (नवीन वास्तू, नवीन कार) तर त्याचे फायदे तोटे मुलांनाही सांगा. यामुळे मुलांमध्ये आर्थिक बाबींबद्दल जागरूकता निर्माण होते.
  • कुठल्या गोष्टींची गरज आहे आणि कुठली वस्तू घेण्याची इच्छा आहे यातील फरक समजावून सांगण्यात पालक यशस्वी झाले तर मुलं निश्चितच योग्य आर्थिक निर्णय घेऊ शकतात. कुटुंबाचा विचार करताना अन्नधान्य, निवारा, औषधं, शाळा कॉलेजच्या फिया अशा जीवनावश्यक गोष्टींसाठी पहिल्यांदा खर्च केल्यानंतर कपडे, दागदागिने, खेळणी, पर्यटन, महागडे मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा चैनीच्या गोष्टींचा विचार पालक करत असतात. त्यामुळे आवश्यक गरजांची पूर्तता झाल्यानंतर बाकी बाबींचा विचार व्हायला हवा, ही शिकवण मुलांना यातून मिळू शकते.
  • अनेकदा पैशांची बचत कशी करावी याबद्दल पालक मुलांना सांगत असतात पण बचतीच्या पैशांमध्ये वाढ कशी करता येईल याबद्दल खूप कमी वेळा बोलले जाते. हल्लीच्या काळात गुंतवणुकीचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिट व्यतिरिक्त शेअर बाजार, म्युच्युअल फंड याबद्दलही मुलांना माहिती दिली तर ते अधिक आर्थिक साक्षर होऊ शकतात.
  • बजेट आणि बचत यांच्यातील संबंध लक्षात आल्यामुळे मुलांना मोठं झाल्यावर कर्जापासून दूर कसं राहायचं हे समजून घेता येतं. अगदी कर्ज काढण्याची वेळ आलीच तर ते कर्ज लवकरात लवकर कसं फेडायचं याचाही विचार करण्याचं कौशल्य मुलांमध्ये दिसायला लागतं. कर्जाशी संबंधित लहान मोठे तोटे समजून घ्यायला सोपं जातं. मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी एज्युकेशन लोन घेतलं असेल तर त्याची सविस्तर माहिती मुलांनाही अवश्य सांगावी. यामुळे पालकांवर किती आर्थिक भार पडत असतो याची जाणीव काही प्रमाणात तरी मुलांना होत असते.

हल्ली सगळ्या गोष्टी लोनवर किंवा क्रेडिट कार्डवर विकत घेता येत असल्या तरी त्याचे पैसे आज ना उद्या आपल्यालाच भरायचे आहेत याचं भान आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्तीला लगेच येत असते. हातात येणारा पैसा आणि होणारा खर्च हे प्रमाण कायमच व्यस्त असतं. सध्याच्या काळात डबल इन्कम असलं तरी होणारे खर्च एवढे अफाट आहेत की पैसाच पुरत नाही. पण योग्य नियोजन करून पैसा कसा खर्च करायचा हे जर लहान वयातच मुलांना शिकवलं तर अंकगणितात शिकलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी पडतील. ते केवळ पुस्तकी ज्ञान राहणार नाही. व्यवहारोपयोगी आर्थिक गणिते सोडवण्यासाठी म्हणूनच लहान वयात मुलांना आर्थिक साक्षर बनवा. ही काळाची गरज आहे.