“ डॉक्टर, घरचे सारखे विचारतात. सारखी जातेस दवाखान्यात. मग बाळ कधी होणार? ”

“ अगं, स्त्रीबीज तयार होतं तेव्हा तुमच्यात शरीरसंबंधच नीट होत नाहीत. मग गरोदर कशी राहाशील? तुझा नवरा मला भेटायलाही येत नाहीये. मग काय करणार डॉक्टर तरी? ”

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!

हे असे संवाद वंध्यत्वाच्या केसेसमध्ये खूप वेळा होतात. लग्न झाल्यावर बऱ्याच वेळा स्त्रियांना लैंगिक संबंध कसा व्हावा याची कल्पना नसते. जेव्हा प्रेगनन्सी राहात नाही आणि त्या आमच्याकडे उपचारासाठी येतात तेव्हाच शरीरसंबंध नीट होत नसल्याचा खुलासा होतो. गर्भधारणा होण्यासाठी ejaculation म्हणजे वीर्यस्खलन हे योनिमार्गाच्या आतच व्हायला हवं, हे त्यांना समजावून सांगितलं जातं. शरीरसंबंध झाल्यानंतर योनीमार्गातून वीर्य बाहेर येणं हे नॉर्मल आहे. ejaculation योनीमार्गाच्या आत झालं, की तेवढा वेळ शुक्राणूंना गर्भाशयात जायला पुरेसा असतो.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: बदललेल्या जीवनशैलीचा आजार ‘थायरॉइड’

मात्र त्यासाठी आवश्यक लिंग ताठरतेच्या समस्या अनेक पुरुषांमध्ये आढळतात. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत.

१- लग्नाच्या पहिल्या रात्री टेन्शनमुळे लिंग ताठरता म्हणजे इरेक्शनची समस्या येऊ शकते. तसेच कामाचा अतिताण, अजिबात रिलॅक्स होता न येणं याचा विपरित परिणाम बऱ्याच वेळा दिसतो. अशांना समुपदेशनाचा खूप फायदा होतो.

२. समागमाच्या वेळी जोडीदारांनी स्वत:चे शरीर आकर्षक ठेवणं महत्त्वाचं आहे. अन्यथा फार मोठा sexual turn off (लैंगिक रसभंग) होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा लिंग ताठरता कमी होऊ शकते. हे सांगायची काय गरज आहे का, असं वाटू शकेल, पण एवढ्या साध्या गोष्टीसुद्धा बऱ्याच वेळा पाळल्या जात नाहीत. स्वच्छता, सुगंधी द्रव्ये, मुखशुद्धी याचा योग्य वापर व्हायला हवा.

३. लैंगिक उद्दीपन करण्याचा खूप प्रयत्न करूनही जोडीदाराकडून कोणताच प्रतिसाद नसेल तरीही पुरुषांना इरेक्शनची समस्या येऊ शकते.

४. Viagra ही उत्तेजना आणणारी गोळी जेव्हा पहिल्यांदा उपलब्ध झाली तेव्हा सगळीकडे खळबळ माजली होती. काही पुरुषांनी त्या गोळ्यांचा गैरवापर वा अतिवापर केला आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. या गोळ्या हृदयाचे विकार अथवा रक्तदाब असलेल्या रुग्णांना देता येत नाहीत. आता या औषधाच्या बऱ्याच पुढच्या सुधारित आवृत्ती उपलब्ध आहेत. पूर्वीच्या वियाग्राचे बरेच साईड इफेक्ट्स या नव्या औषधांमध्ये नाहीत, पण पुरुषांमध्ये अशा औषधांची भीतीच बसलेली आहे. वैद्यकीय सल्ल्याने लिंग ताठरता सुधारणारी औषधे घ्यायला काही हरकत नसते. बऱ्याच वेळा सुरवातीला ही औषधे घेतली की इरेक्शनची समस्या सुटायला मदत होते.

हल्लीच्या काळात भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. करोनानंतरही बऱ्याच जणांना मधुमेहाचं निदान झालं आहे. तसेच वाढलेला रक्तदाब तरुण पिढीमध्येसुद्धा दिसून येत आहे. या दोन्ही विकारांमध्ये इरेक्शनच्या समस्या दिसतात. हे दोन्ही विकार असलेले रुग्ण अनेकदा योग्य डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. तसेच या विकारांच्या उपचारासाठी लागणाऱ्या काही औषधांमुळेसुद्धा समस्या निर्माण होतात. पण याबद्दल रुग्णांना माहिती नसते आणि जागरूकताही नसते. ज्यांना त्रास होतोय त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलून घ्यायला हवे.

६. पती-पत्नी मध्ये भांडणं, विसंवाद असतील तर लैंगिक जीवनावर परिणाम होतोच. कधी भांडणे आहेत म्हणून इरेक्शनच्या समस्या येतात, तर कधी समस्या आहेत म्हणून भांडणे होतात. याबाबतीत पुरुषांचा इगो खूप संवदनशील असतो आणि तो स्त्रियांनी अतिशय नाजूकपणेच हाताळणं आवश्यक असतं. पुरुषांचा आत्मविश्वास आणि इगो दुखावू न देता त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करून योग्य उपचार करून घेणं स्त्रियांनी वैवाहिक जीवनाच्या यशासाठी करायला हवं.

७. भिन्न लैंगिकता ही सुद्धा वैवाहिक जीवनात एक समस्या असू शकते. समलैंगिक व्यक्तीचं जबरदस्तीनं लग्न लावलं गेलं असेल तर अशा समस्या येणारच. तसेच इच्छेविरुद्ध लग्नहाही एक भाग असू शकतो.

८. आपल्या समाजात पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी कायम कणखर आणि खंबीरच राहायला हवं, अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. कोणत्याही प्रकारचा कमकुवतपणा दाखवण्याची त्यांना मुभा दिली जात नाही. परिणामी, अशा कोणत्याही समस्या लपविण्याचा पुरुष प्रयत्न करतात. आपल्याला काही समस्या आहे हे ते स्वत:शीसुद्धा मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांची मानसिक घुसमट कधी कधी वर्षानुवर्षं होत राहते. हे टाळण्यासाठी पती- पत्नीमध्ये सुसंवाद असणं आवश्यक आहे.

९. काही शस्त्रक्रिया झाल्यानंतर इरेक्शनच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ प्रोस्टेट, हर्निया, कॅन्सर, मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रिया. अर्थात हे प्रत्येक केसवर अवलंबून आहे. मनात कोणताही संकोच न ठेवता शस्त्रक्रियेच्या आधी डॉक्टरांशी यावर चर्चा जरूर करायला हवी.

तर मित्रमंडळी, हा एक पडद्याआडचा, पण महत्त्वाचा विषय आहे. काळानुसार आपण बदलून हा पडदा हटवून योग्य ती माहिती घेणं आणि लैंगिक जीवन निरामय बनवणं आपल्याच हातात आहे.

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत)

shilpachitnisjoshi@gmail.com