-डॉ. किशोर अतनूरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिकडच्या काळात ‘सिझेरीयन’पद्धतीने प्रसूती होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हा बदल फक्त आपल्या जिल्ह्यात, राज्यात किंवा देशातच नाही तर जगभरात झाला आहे. त्यामागे अनेक शास्त्रीय आणि अशास्त्रीय कारणं आहेत. आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण आजकाल ‘सिझेरीयन’ करण्यामागच्या कारणांची यादी पाहिल्यास ‘पूर्वी झालेलं ‘सिझेरीयन’ हे कारण यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. स्त्री पहिलटकरीण असताना काही कारणामुळे ‘सिझेरीयन’ झालं असल्यास दुसऱ्या वेळेस ‘पूर्वी ‘सिझेरीयन’ झालेली केस’ (A case of previous caesarean section) या कारणासाठी तिच्यावर ‘सिझेरीयन’ केलं जातं. यामुळे एकंदरीत ‘सिझेरीयन’चं प्रमाण वाढण्यात भर पडते.

खरं तर, पहिलटकरीण असताना ‘सिझेरीयन’ झालेलं असल्यास दुसऱ्या वेळेस ‘सिझेरीयन’चं होईल की तिची प्रसूती नॉर्मल देखील होऊ शकते? या प्रश्नाचं सरळ उत्तर, ‘हो, तिची नॉर्मल डिलिव्हरीदेखील होऊ शकते,’ असंच आहे. किंबहुना, जिचं पहिलं ‘सिझेरीयन’ झालेलं आहे तिची नॉर्मल प्रसूती होण्याची वाट पहाण्याजोगी परिस्थिती असल्यास, पुन्हा ‘सिझेरीयन’ करण्याची घाई न करता नॉर्मल प्रसूतीसाठी वाट पाहिली पाहिजे. या नैसर्गिक प्रक्रियेत, बाळाच्या जीवास धोका निर्माण झाल्यास किंवा मातेच्या प्रकृतीवर बेतणार असल्यास पुन्हा ‘सिझेरीयन’ करण्याची गरज निर्माण होऊ शकते ही बाब निराळी.

आणखी वाचा-पती-पत्नीतील करारानुसार ठरलेला देखभाल खर्च मिळणे हा पत्नीचा हक्कच

‘सिझेरीयन’ झालेल्या गर्भवतीच्या बाबतीत तिची प्रसूती नॉर्मल होण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे भीती. पूर्वी ‘सिझेरीयन’ झालेल्या स्त्रीला, प्रसूतीच्या नैसर्गिक कळा सुरु झाल्यानंतर, पूर्वीचे टाके उसवून गर्भाशय फाटण्याची, अति रक्तस्राव होऊन मातेच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती वाटते. खरं पाहिलं तर असं होण्याचं प्रमाण खूप कमी ( ०.२ ते १.५ %) आहे आणि समजा अशी गुंतागुंत (complication) निर्माण झाली तरी, त्यातून मातामृत्यूचं प्रमाण, बाळाच्या जीवाला धोका होण्याचं प्रमाण अद्याप फारच कमी आहे. तरीही, डॉक्टर, गर्भवती, नातेवाईक कुणाचीच अशी रिस्क घेण्याची तयारी नसल्यामुळे पूर्वी ‘सिझेरीयन’ झालेल्या केसमधे नॉर्मल प्रसूतीची वाट न पहाता पुन्हा ‘सिझेरीयन’ केलं जातं. वास्तविक पाहाता, पूर्वी ‘सिझेरीयन’ झालेल्या कोणत्या गर्भवतीची नॉर्मल प्रसूतीसाठी निवड करावी आणि कोणत्या स्त्रीच्या बाबतीत वाट न पहाता थेट ‘सिझेरीयन’ करावं या बद्दल काही निकष असतात. ती निवड जर सावधगिरी बाळगून केली तर पूर्वी ‘सिझेरीयन’ झालेल्या स्त्रीचं बाळंतपण नॉर्मल होण्याचं प्रमाण वाढू शकतं; बाळ आणि माता सुखरूप राहू शकते. “तुमचं पूर्वी एक ‘सिझेरीयन’ झालं असलं तरी, तुम्हाला तपासल्यावर आणि तुमचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहिल्यानंतर, या खेपेला तुमची प्रसूती ‘नॉर्मल’ होऊ शकते असं मला वाटतंय, तुम्ही नॉर्मल होण्याची मानसिक तयारी ठेवा, ऐन वेळेवर आवश्यकता वाटल्यास आपण ‘सिझेरीयन’ करू,” अशा आश्वासक शब्दात डॉक्टरांनी गर्भवती आणि नातेवाईकांशी संवाद साधल्यास ते या नॉर्मल प्रसूती प्रक्रियेतून जाण्यास तयार होतील. असा निर्णय झाल्यानंतर, समजा काही गुंतागुंत झाल्यास ती परिस्थिती हाताळण्याची तयारी हॉस्पिटलच्या सेट-अप मध्ये असणं आवश्यक आहे.

आणखी वाचा-केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांनाही प्रोत्साहन, प्रसूती रजेसह ‘या’ सुविधाही मिळणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

पहिलटकरणीचं नैसर्गिक बाळंतपण असो वा आधी ‘सिझेरीयन’ झालेल्या स्त्रीची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी वाट पाहाण्याची प्रक्रिया असो या दोन्ही गोष्टी घडून येण्यासाठी गर्भवती आणि नातेवाइकांचं सहकार्य लागतं, त्यांच्याकडे खूप संयम असावा लागतो. एखादीची नॉर्मल प्रसूती होईपर्यंत डॉक्टरांना देखील सतर्क राहावं लागतं, बाळंतपणाची नैसर्गिक प्रगती समाधानकारक होत आहे का नाही यासाठी सतत अनेक तास अलर्ट राहावं लागतं. या सर्व प्रक्रियेत अनेक तास अनिश्चीततेची टांगती तलवार असते. ही अनिश्चितता आजकाल कुणालाच नको आहे म्हणून पहिलटकरणी काय किंवा त्यापूर्वी ‘सिझेरीयन’ झालेल्या प्रकरणांमध्ये काय सगळ्यांचाच ‘सिझेरीयन’ करून ‘मोकळं’ होण्याच्या निर्णयाकडे जास्त कल आहे.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एम एस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत)

atnurkarkishore@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens health is there possible to normal delivery after one seizure mrj
First published on: 08-02-2024 at 15:31 IST