|| कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

Salman Khan house firing incident
Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
Viral Video Nagpur Dolly Chaiwala Meet Delhi Vada Pav girl Telling People To Stop Trolling Her
डॉली चहा विक्रेता पुन्हा चर्चेत! व्हायरल वडापाव गर्लची घेतली भेट; VIDEO शेअर करीत म्हणाला, ट्रोल…

 

‘‘देख कुलवंत, कोठी दस बाय दस की हो, दस कमरों की हो या दो सौ कमरों की हो, इन्सान वही रहना चाहिये। जागा बदलतात, पण बदलणाऱ्या जागांमुळे माणूस बदलता कामा नये, नाही तर माणूस माणसापासून तुटतो, दुरावतो व त्यातू्न अनर्थ होतो.’’ राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपतींच्या झोपायच्या खोलीत, अंगात साधासा बनियान आणि कच्छा परिधान करून भारताचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंगजी माझ्याशी बोलत होते. पन्नासच्या दशकात पंजाबातील काँग्रेसचा एक साधा कार्यकर्ता म्हणून भेटलेले ग्यानी झैलसिंगजी तीस पस्तीस वर्षांनंतरही तसेच होते, साधेसे होते.

ग्यानी झैलसिंगजी आणि माझं नातंच असं अनौपचारिक होतं. ग्यानीजी मला पहिल्यांदा भेटले ते माझे मावसोबा, म्हणजे माझ्या मावशीचे यजमान सरदार गुलाबसिंग यांच्या घरी. गुलाबसिंगजी खूप महान देशभक्त होते. भगतसिंग यांच्या प्रभावातून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना वयाच्या सतराव्या वर्षीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तिथं तुरुंगवास भोगताना, त्यांच्या संपर्कात प्रतापसिंग कैरो नावाचा एक तरुण देशभक्त आला व त्या उभयतांमध्ये पिता-पुत्राचं नातं बनलं. तुरुंगात ज्येष्ठ असलेल्या गुलाबसिंग यांची अनेक कामं प्रतापसिंग करायचा. त्या काळातल्या काही आठवणी गुलाबसिंगजी आम्हाला सांगत. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. जेलमधील छोटय़ा छोटय़ा बराकीत अनेक देशभक्त कैदी होते. त्यात काही अट्टल गुन्हेगारही असत. सर्वाच्या मूत्रविसर्जनासाठी, खाकाऱ्या-खोकाऱ्यासाठी एकच भांडं असे. परिणामी सर्वत्र खूप घाण वास पसरत असे. एके दिवशी या सर्व देशभक्त कैद्यांनी बराकीची साफसफाई करायची ठरवली. गुलाबसिंगजी सांगत, ‘‘त्या दिवशी जेव्हा ते पात्र सफाईसाठी घेतलं, तेव्हा जवळपास चार इंच घाणीचा एक आख्खा पदर निघाला. सर्वाच्या पोटात ढवळलं, कोणाला उलटय़ा झाल्या, पण त्यानंतर सर्वाच्याच मनातली या सर्व कामाविषयीची घृणा कायमची निघून गेली. सर्व जेल एक झालं. भगतसिंग आणि गांधीजी अशा दोन विचारधारा तेव्हा एकरूप झाल्या असं सर्वाना वाटलं. खरं म्हणजे त्या वेगळ्या नव्हत्याच!’’

पुढे प्रतापसिंग कैरो हे पंजाबचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या अवघ्या पाच जणांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आवर्जून गुलाबसिंग यांचा समावेश केला. हे दोघं अगदी शेजारी राहत, त्यामुळे दररोज सकाळी घरी येणं जाणं चाले, चहा-पाणी घेता घेता ते राज्याच्या भल्याचा विचार करत. मी मावशीकडे गेलो की मला हे सर्व जवळून पाहायला मिळे. त्या वेळी या मंडळींत तरुण ग्यानी झैलसिंगजी येत. ते प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी होते, उत्साही होते आणि विचारीही होते. त्यांना आपली मतं विचारपूर्वकच मांडायची सवय होती. उंचे पुरे, अगदी टिपिकल पंजाबी दिसणारे ग्यानीजी आपला आब राखून असत, पण त्यांच्याकडे बघितल्यावर ते आढय़तेखोर वगरे न वाटता, आपल्या घरातला एक वडीलधारा आपल्याला भेटतोय असंच वाटे.

माझ्यापेक्षा ग्यानीजी अठरा वर्षांनी तरी मोठे होते, पण माझी व त्यांची गट्टी जमली होती. आम्ही शहरातल्या गल्ल्यांत फिरायचो. त्यांना भरपूर खायचा शौक होता. सोबत असलेल्यालाही ते खिलवत असत. आम्ही चंदीगढच्या गल्ल्यांत हातगाडय़ांवर उभं राहून गोलगप्पे (पाणीपुरी) ओरपत असू, खरबुजं खात असू. दिल्लीहून चंदीगडकडे परत जाताना, कित्येकदा ग्यानीजी मोटारगाडीच्या प्रवासात सोनिपतला थांबून संत्रं, सफरचंदं, खरबुजं वगरे विकत घेत. त्यांना खरबुजं आवडत असे. खरबुजं घेण्यांचं आणखी एक कारण म्हणजे खरबुजांना पाणी सुटत नाही, किलगडांना पाणी सुटतं व त्यामुळे कपडे वगरे खराब होत नाहीत. ही खरबुजं सुरीने वगरे न कापता ग्यानीजी हातानेच फोडत असत. दणकट शरीरयष्टीच्या ग्यानीजींना असं हातानं खायला आवडत असे. मी अनेकदा त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने खाद्यभ्रमंती केली आहे. गुलाबसिंगजींनाही ही सवय होती. स्वातंत्र्यलढय़ात तुरुंगामध्ये असताना गुलाबसिंगजी, झैलसिंगजी, कैरोजी अशांची बरीच उपासमार झाली असल्याने त्यांना नंतरच्या काळात जिभेचे चोचले पुरवावेसे वाटत. पण ते चोचले एकटे पुरवत नसत, तर सोबतच्या सर्वाना त्या खाद्ययज्ञात सामील करून घेत. मी लहान असल्याने झैलसिंगजी सर्वात आधी मला खाऊ घालत व मग स्वत: खात.

ग्यानीजी जेव्हा केव्हा मुंबईत येत असत, तेव्हा ते मला फोन करत असत व एक संध्याकाळ तरी आमच्या घरी व्यतीत करत असत. ग्यानीजींना लोकप्रिय नेता म्हणून मान्यता मिळायला सुरुवात झाली होती. तरीही हा लोकप्रिय नेता जमिनीवर होता. एक साधा भारतीय नागरिक म्हणून ग्यानीजी त्या वेळी मुंबईत येत असत, राहत असत, फिरत असत. त्यांना जेव्हा पहिल्यांदा विधिमंडळाची निवडणूक लढवायची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी मला सर्वप्रथम ट्रंक कॉल केला व म्हणाले, ‘‘कुलवंत, काय करतो आहेस?’’ मी उद्गारलो, ‘‘काही नाही. नेहमीप्रमाणे गल्ल्यावर बसलोय ग्यानीजी- मी यंदाची पंजाब विधिमंडळाची निवडणूक लढवतोय, तेव्हा त्यासाठी मुंबईतून काही आíथक मदत मिळते का ते पाहायला, मी मुंबईत येतोय.’’ आणि ग्यानीजी मुंबईत आले. आले ते थेट प्रीतममध्ये. मला त्यांचे शब्द आजही आठवतात. ते म्हणाले, ‘‘कुलवंत, आज मैं बेटे के पास खाना खाऊंगा और उसका ब्लेसिंग्ज भी मांगूंगा।’’ मी गडबडून म्हणालो, ‘‘ग्यानीजी, प्लीज ऐसा कुछ मत कहिये, बेटा हूँ और बेटाही रहने दीजिये।’’ ग्यानीजी – ‘‘तो ठीक है। खाना खाऊंगा और दातघिसाई भी ले लुंगा।’’ त्यांनी आवडीचं भोजन केलं. ग्यानीजींचे खाण्यापिण्याचे फारसे चोचले नसत, जे खात ते चवीनं खात. शाकाहार, मांसाहार असं दोन्ही त्यांना चालत असे. तरीही त्यांना शाकाहार अधिक आवडे. जेवण झाल्यावर ते म्हणाले, ‘‘खाना तो हो गया। अब मेरी दातघिसाई दे दो।’’ मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो, मला वाटलं ते मजाक करत आहेत. पण तसं नव्हतं. ते गंभीर होते. माझे पापाजीपण नव्हते. मी पटकन गल्ल्यात हात घातला. फारशी दौलत नव्हती. लगभग पाचशे असतील त्या दिवशी. सर्व पसे काढले, एका पाकिटात घातले. आणि नम्रतापूर्वक ग्यानीजींच्या हाती ठेवले. ग्यानीजींनी दोन्ही हातांनी ते पाकीट स्वीकारलं, त्या पाकिटाचं चुंबन घेतलं, डोळे मिटून कपाळाला लावलं, नंतर ते माथ्यावर ठेवलं व मग ते पाकीट हातात धरून ते म्हणाले, ‘‘कुलवंत, तुझ्याकडे का आलो, हे तुला आत्ता कळणार नाही. पण या तुझ्या पशांना बरकत आहे हे मला माहिती आहे. तू एक रुपाया जरी दिला असतास तरी मी तो घेतला असता, कारण त्यात तुझं, तुझ्या कुटुंबाचं प्रेम आहे. पापाजींना माझा नमस्कार सांग.’’ ग्यानीजी पंजाबात गेले, विधिमंडळाची निवडणूक लढवली. नंतर ते जिंकलेही. ग्यानीजी स्वत:च्या कर्तृत्वानं यशाची शिडी चढत गेले. ते यशस्वी होत गेले, पण त्यांच्यातला माणूस कधीही हरवला नाही. ते सर्वसामान्यांतलेच एक राहिले. ते उच्चविद्याविभूषित नव्हते, पण त्यांना ग्यानीजी म्हणत. ग्यानीजी म्हणजे ज्ञानी व्यक्ती. आयुष्याचं तत्त्वज्ञान ग्यानीजींना गवसलं होतं. त्यांची नाळ पंजाबच्या, भारताच्या भूमिपुत्रांशी अचूक बांधली गेली होती. मुख्यमंत्रिपदावर असतानाही ते एखाद्याच्या मळ्यात शिरून त्याच्याशी गप्पा मारता मारता शेतातली कणसं हातावर मळून खात असत. आमच्या गुरूगोविंदसाहेबांची तशी शिकवणच होती. गुरूगोविंदसिंगांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जातिभेदविरहित समाजाची उभारणी केली. त्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय आदी समाजरचना धुडकावून लावली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आडनावं काढून टाकायला सांगितली व पुरुषांनी नावामागे सिंग (म्हणजे सिंह- सिंहासारखा वीर पुरुष) आणि स्त्रियांनी नावानंतर कौर (राजकुमारी) असं लावा, असा आदेश दिला. मी माझ्या नावानंतर कोहली हे आडनाव लावतो, हे गुरू गोविंदप्रभूंच्या आदेशाप्रमाणे नाहीये. गुरुजींना पराक्रमी कौम हवी होती. ते म्हणत, ‘‘चिडियों से मैं बाज़् लडमऊं। सवा लाख से एक लडाऊं। तब गोविंदसिंग नाम लगाऊं॥’’ ग्यानीजी गुरू गोविंदसिंगांचे सच्चे चेले होते. प्रारंभीच्या काळात ते प्रवचनं करत असत. पराक्रमी होते. त्यांच्या साध्याशा चेहऱ्याकडे पाहिल्यावर ते एक नरमदिल व्यक्ती वाटतात, पण मुख्यत: ते अत्यंत निग्रही होते. जे ठरलं ते ठरलं, त्यात बदल नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शिख समाजासाठी खूप काही केलं. त्यांनी मोठय़ा प्रमाणावर धार्मिक स्वरूपाची संमेलनं, सामुदायिक प्रार्थनासभा आयोजित केल्या, एका राष्ट्रीय महामार्गाला त्यांनी गुरू गोविंदसिंगांचं नाव दिलं, भारतीय स्वातंत्र्यलढय़ात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसनिकांसाठी आयुष्यभर चालणारी पेन्शन योजना सुरू केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गुरू गोविंदसिंग यांच्या ब्रिटिशांनी नेलेल्या वस्तू परत आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या जनरल ओड्वायर याला जवळपास वीस वर्षांनी त्याच्या निर्घृण कृत्याची सजा देऊन त्याला यमसदनास पाठवणाऱ्या आणि त्यासाठी फासावर गेलेल्या सरदार उधमसिंग यांच्या अस्थी त्यांनी भारतात परत आणण्यासाठी पुढाकार घेतला. या सर्व गोष्टींविषयी ते माझ्याकडे बोलत असत, पण त्यांनी कधीही राज्याचे वा देशाचे धोरणात्मक निर्णय माझ्याजवळ आधी उघड केले नाहीत, ते उत्तम व कार्यक्षम प्रशासक होते.

आधी एक आमदार, मग पंजाबचे विविध खात्यांचे मंत्री आणि नंतर पंजाबचे मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द होती. आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधी सत्तेवर पुन्हा परतल्या तेव्हा झैलसिंग हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून भारताचे गृहमंत्री झाले. झैलसिंगजी गृहमंत्री झाले त्याच्या आदल्या रात्री त्यांनी मला फोन केला व म्हणाले, ‘‘कुलवंत, उद्या संध्याकाळी मी तुझ्याकडे येणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास एका खासगी विमानाने निघेन व साडेपाचपर्यंत येईन.’’ मी त्यांच्या सन्मानार्थ एक छोटेखानी पार्टी ठेवली. त्या वेळी मला माहित नव्हतं की ते गृहमंत्री होणार आहेत. मी त्या पार्टीला काही मंत्री, पोलीस कमिशनर, डेप्युटी कमिशनर्स, काही अभिनेते- अभिनेत्री व काही सन्माननीय व्यक्ती बोलावल्या होत्या. सारे येणार म्हणून निरोप आला आणि अचानक तीन वाजता ग्यानीजींनी फोन केला, ‘‘कुलवंत, मीटिंग अजून चालूच आहे. मला निघायला अजून थोडा वेळ लागेल.’’ मी एकदम बावरलो, आपण एवढी माणसं बोलावली आहेत आणि ग्यानीजीच नाहीत. माझी अडचण त्यांच्या लक्षात आलीच होती. ते म्हणाले, ‘‘मी सात साडेसातपर्यंत येतो. काळजी करू नकोस.’’ ग्यानीजी साडेसहा वाजता दिल्लीतून विमानाने निघाले आणि साडेनऊच्या सुमारास प्रीतमवर आले. आज जिथं धाबा आहे तिथं लॉन होतं, त्या लॉनवर सारे जण जमले होते, ग्यानीजी थेट लॉनवरच आले. सर्वाना भेटले, तोवर सर्वाना ते गृहमंत्री झाल्याचं कळलं होतं. तो त्यांचा गृहमंत्री झाल्यानंतरचा पहिला कार्यक्रम होता. काही मिनिटांत ग्यानीजी मला म्हणाले, ‘‘कुलवंत, मी सकाळी साडेदहा वाजल्यापासून फेटा सारखा केला नाही की, अंघोळही केली नाही. मला फ्रेश व्हायचंय.’’ ते आमच्या घरी आले. तो साधा माणूस तेव्हाही साधाच होता. भारताचे गृहमंत्री घरच्यासारखे वावरले, सगळ्यांशी दोन मिनिटं बोलले, आवरलं आणि पंधरा मिनिटांत पार्टीत सामील झाले. रात्री बारा वाजता जेवणं उरकून ते म्हणाले, ‘‘कुलवंत माझ्याबरोबर चल. राजभवनावर गप्पा मारू.’’ मी ग्यानीजींना म्हणालो, ‘‘रात्री बारा वाजता माझा ड्रायव्हर नाही. मी कसा परतणार?’’ ग्यानीजी डोळे मिचकावत उत्तरले, ‘‘कुलवंत, तू भारताच्या गृहमंत्र्याबरोबर आहेस, विसरलास. रात्री परतायला तुला बिल्ल्याची गाडी देतो.’’ (म्हणजे सरकारी गाडी, ग्यानीजी नेहमी सरकारी गाडीला बिल्ल्याची गाडी म्हणत.) मी त्यांच्यासमवेत राजभवनावर गेलो. ग्यानीजींचे दोन सचिव होते आय्. एस्. बिंद्राजी आणि त्रिलोचनसिंग. त्यांनी त्रिलोचनसिंगना दुसऱ्या गाडीतून यायला सांगितलं, बिंद्राजी पुढं बसले आणि मला त्यांनी शेजारी बसवून घेतलं. राजभवनावर ग्यानीजी साधासा बनियान घालून कच्छा पेहनून आले व सहजपणे म्हणाले, ‘‘बघ, कुलवंत, प्रामाणिकपणे लोकसेवा केली की माणूस दहा बाय दहाच्या खोलीतून इथवर येतो. पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची. सत्ता व पद हे अंघोळीच्या पाण्यासारखं असतं, डोक्यावर घेतलं की वाहून जातं, पण या दोन्ही गोष्टी लोकसेवेची तहान भागवण्यासाठी आहेत, असं समजून घेतलं तर ते पाणी शरीरात जिरतं व दुसऱ्याला जगवतं. त्यातच आपल्या कामाचा मोक्ष आहे.’’

काही वर्षांनी ग्यानी झैलसिंग हे स्वतंत्र भारताचे सातवे राष्ट्रपती झाले. एक सामान्य कार्यकर्ता देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. ते राष्ट्रपती झाले आणि राष्ट्रपती भवनातून मला फोन आला की, ‘‘राष्ट्रपती अमुक दिवशी मुंबईत येणार आहेत, तुम्हाला त्यांनी विमातळावर बोलावलं आहे.’’ त्या वेळी विमानतळावर थेट विमानापर्यंत जाता येत होतं. मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटलो. त्या वेळी मी नुकताच पंजाब असोसिएशनचा अध्यक्ष झालो होतो. ग्यानीजींच्या कानात हळूच म्हणालो, ‘‘ग्यानीजी, मी पंजाब असोसिएशनचा अध्यक्ष झालो आहे, एखाद्या कार्यक्रमात मला तुमचा सत्कार करता येईल का?’’ त्यांनी बिंद्राजींना विचारलं की, ‘‘भई कुलवंतको खूश करना है। कुछ समय मिल सकता है क्या?’’ राष्ट्रपतींचे कार्यक्रम भरगच्च होते. शेवटच्या दिवशी नाश्त्या नंतर राष्ट्रपतींना थेट विमानतळावर जायचं होतं. ग्यानीजींनी मार्ग काढला, ‘‘गेट वे ऑफ इंडियाजवळ महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे. त्याचं दर्शन भारताच्या राष्ट्रपतींनी घेऊन त्यांना नमस्कार करणं आवश्यक आहे. आपण सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ या व नंतर कुलवंत, तू ताजमध्ये कार्यक्रम ठेव. तिथून आपण थेट विमानतळाकडे जाऊ या.’’

मी लगेच तयारीला लागलो. हातात दोन दिवस होते, आमचे सदस्य बाराशे होते. सर्वाना एका दिवसात निरोप कसा देणार? तेव्हा साधे फोनही नीट चालत नसत. मग, मी सरळ वर्तमानपत्रात पाव पान जाहिरात दिली की राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा सत्कार पंजाब असोसिएशन करणार आहे. झालं! ती जाहिरात बघून पोलीस माझ्या घरी आले. ही जाहिरात कशी दिलीत, यात प्रोटोकॉल चुकतो. अरे बाप रे, मी म्हटलं की, ‘‘मला यातलं काहीच माहित नव्हतं, क्षमस्व. मी ग्यानीजींची व आपली माफी मागतो.’’ ग्यानीजींकडे गेलो तर ते हसत म्हणाले, ‘‘मी सकाळीच वर्तमानपत्रात तुझी जाहिरात पाहिली. ठीक आहे, पुन्हा असं होऊ देऊ नकोस.’’ ग्यानीजी हे नुसते ज्ञानी नव्हते, ते अंतज्र्ञानी होते. त्या कार्यक्रमात बोलताना ग्यानीजी म्हणाले, ‘‘प्रीतमसिंग हा माझा मुलगाच आहे.’’ नंतर त्यांच्या लक्षात आलं, प्रीतम हे आमच्या हॉटेलचं नाव. हसत हसत त्यांनी स्वत:ला दुरुस्त केलं व म्हणाले, ‘‘प्रीतम हॉटेल आणि कुलवंतसिंग कोहली हे एकच आहेत, त्यामुळे थोडी गल्लत झाली.’’

पण, ती चूक थोडीच होती; अंतज्र्ञानी ग्यानीजींनी जाणलं होतं की, प्रीतम आणि मी वेगळे नव्हतोच. आणि देशाचे राष्ट्रपती मला पुत्रदर्जा देत होते. अजून काय हवं आयुष्याला!

शब्दांकन : नीतिन आरेकर