* हुंदाई व्हर्ना घ्यावी की होंडा सिटी. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये मला गाडी घ्यायची आहे. गाडीचा अ‍ॅव्हरेजही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कृपया सांगा की कोणती गाडी चांगली ठरेल.
– हृषीकेश बापट
* मी तुम्हाला नवी होंडा सिटी गाडी घेण्यास सुचवेन. ही गाडी स्पेशिअस तर आहेच शिवाय तिचा मायलेजही चांगला आहे. या गाडीच्या इंजिनाचे आयुष्यही भरपूर आहे. तसेच सíव्हसही चांगली आहे. परंतु तुम्हाला जर प्रतिलिटर २० किमी अ‍ॅव्हरेज देणारी गाडी हवी असेल तर तुम्ही मारुती सिआझचा विचार करावा.
* मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. माझे बजेट अडीच ते तीन लाखांपर्यंतच आहे. मला सेडान कार खूप आवडते. या बजेटमध्ये मला ही गाडी घेता येणे शक्य आहे का.
– संजय शिंगाडे, विक्रोळी
* सेडान सेगमेंटमध्ये आणि त्यातही सर्वोत्तम सेडान कार स्विफ्ट डिझायर हीच आहे. २०११ मधील मॉडेल तुम्हाला मिळू शकते किंवा २००८चे होंडा सिटीचे मॉडेलही चालू शकेल. तिचाही रिझल्ट चांगला आहे आणि त्यातही तुम्हाला तीन लाखांत नवीन वाटणारी, परंतु जुनी असलेली गाडी घ्यायची असेल तर शेवरोलेची एॅव्हिओ ही गाडी चांगली आहे. २०१२चे मॉडेल तुम्ही घेऊ शकता.
* मला आय २० एलिट तसेच क्रॉसओव्हर आय २० अ‍ॅक्टिव्ह या दोन्ही गाडय़ा आवडतात. मात्र, यापकी कोणाची निवड करावी याबाबत मला गोंधळ आहे. एलिट आय २० ही चांगली गाडी आहे, परंतु तिच्याबाबतची एक अडचण अशी आहे की, तिच्या हेडलाइटचा फोकस खूप कमी आहे. हायवेवर चालवताना हे जाणवते. त्यामुळे आय २० अ‍ॅक्टिव्ह घेणे योग्य ठरेल का.
– मनीषा खोमणे
* अडचण केवळ हेडलाइटचीच असेल तर तुम्ही त्यात झेनॉन लाइट्स बसवू शकता. परंतु आय २० अ‍ॅक्टिव्ह घेणे केव्हाही चांगला निर्णय ठरेल. तिचा ग्राऊंड क्लिअरन्स चांगला आहे आणि लुकही स्पोर्टी आहे. तुम्हाला जर स्पोर्टी लुक असलेली एसयूव्ही हवी असेल, तर मग फोर्ड इकोस्पोर्ट किंवा रेनॉ डस्टर चांगल्या आहेत किंवा मग फियाट अ‍ॅव्हेंचुराही तुम्हाला योग्य ठरू शकेल. ती डिझेल व्हेरिएंटमधील सर्वोत्तम कार आहे.
* सर, मी डॉक्टर आहे. मी आपले सदर नेहमी वाचतो, प्रथमत मला सेडान, एसयूव्ही, एमयूव्ही, हॅचबॅक इत्यादी गाडय़ांमध्ये नेमका काय फरक असतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे . माझे जास्त फिरणे नसते तरी पण गाडी घेण्याची इच्छा आहे. कमीत कमी बजेटमध्ये कोणती गाडी योग्य राहील ते सांगावे.
–  डॉ. गजानन हिंगमिरे.
* सेडान म्हणजे हाइट कमी आणि एअरोडायनामिक्स जास्त असलेली कार. तिची पुढची आणि मागची बाजू निमुळती असते. एसयूव्ही म्हणजे जास्त उंचीची गाडी. हिचा ग्राऊंड क्लीअरन्स जास्त असतो. एमयूव्ही म्हणजे सात-आठ आसनी गाडी. हॅचबॅक म्हणजे चार मीटर खाली गाडी, जिला वेगळी डिकी नसते. तुम्हाला जर चांगली छोटी कार घ्यायची असेल तर अल्टो के १० सर्वोत्तम आहे. बजेट आणखी कमी असेल तर टाटा नॅनो घ्या. मोठी गाडी घ्यायची असेल तर डॅटसन गो घ्या.
 समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.