आकडी या आजाराभोवती विनाकारण गूढ निर्माण झाले आहे. त्यामुळे उपचारांनी या आजाराची तीव्रता व वारंवारता कमी करणे शक्य असूनही अनेक रुग्णांपर्यंत उपचार पोहोचू शकत नाही. ९ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक आकडी दिना’निमित्त या आजारासंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्न.. ं
कडी हा मेंदूचा सर्वत्र आढळणारा आजार आहे. समाजातील २००पैकी एकाला त्याचा त्रास होतो. बहुतांश आकडी रुग्णांमध्ये या आजाराचे कारण स्पष्ट होत नाही. मात्र त्यामुळे या आजाराभोवतीची गुढता वाढवली जाते. हा आजार मागच्या जन्मीच्या पापाचा किंवा अनुवंशिकतेचा परिणाम आहे, असा समज आहे. त्यामुळे या आजारावर उपचार करण्यात अनेक अडथळे येतात.
एका अभ्यासानुसार ३१ टक्के व्यक्तींनी आकडी हा आजार अनुवंशिकतेने होतो, असे सांगितले. २७ टक्क्य़ांना या आजारामागे पाप असल्याचे वाटते. ४० टक्के लोकांनी आकडी असलेल्यांना नोकरी नाकारली होती. ११ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांना आकडी असलेल्या मुलाबरोबर खेळण्यापासून रोखले होते तर ५५ टक्के महिलांनी लग्न होण्यासाठी त्यांचा आजार लपवला होता. यापैकी ज्यांचे लग्न झाले, त्यांच्यापैकी १८ टक्के स्त्रियांनी घटस्फोट घेतला तर २० टक्के स्त्रियांना वेगळे राहावे लागले. २१ शतकात भारतात हे चित्र आहे. त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गैरसमजाचे आणि त्यामुळे आकडीच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात ०.६ टक्के तर ग्रामीण भागात लोकसंख्येच्या १.९ टक्के लोकांना आकडी आजार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत बंगलोरमधील सस्थेने केलेल्या सर्वेक्षणात १ लाख २ हजार ५५७ लोकांपैकी ८.८ टक्के लोकांना आकडी असल्याचे दिसून आले. शहरी भागात हे प्रमाण ५.७ टक्के तर ग्रामीण भागात ११.९ टक्के आहे.
मेंदूचे कार्य त्यात उत्पन्न होणाऱ्या विद्युत प्रवाहावर चालते. या प्रवाहात अनियमितता आली आणि जास्त वेगाने प्रवाह सुरू झाला की आकडी येते. हे अनिर्बंधित प्रवाह मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागातून उत्पन्न होतात त्यावरून आकडीचे प्रकार ठरतात. मेंदूच्या सर्व भागात प्रवाहात अनिर्बंधता आली तर व्यक्ती जमिनीवर पडते, ताठ होते आणि संपूर्ण शरीर कंप पावते. तोंडातून फेस येतो, काही वेळा जीभ चावली जाते आणि लघवीही होते. आकडीचे इतर प्रकार सौम्य असतात. काही वेळा व्यक्ती शुद्धीत असतो पण त्याला अस्वस्थ वाटत राहते किंवा त्याचे हातपाय कंप पावतात. काही वेळाने ही लक्षणे जातात. काही वेळा व्यक्तीचा गोंधळ होतो आणि तो असंबद्ध वागतो. आकडी येण्याचे प्रमाण जास्त असेल तर वाहन चालवणे, पोहणे किंवा मोठय़ा यंत्रांवर काम करणे टाळायला हवे.
दहापैकी सहा रुग्णांमध्ये आकडीचे कोणतेही स्पष्ट कारण दिसून येत नाही. इतरांमध्ये मेंदूमधील गाठ, मेंदूवरील आघात, अपघातावेळी डोक्याला झालेली जखम, जन्मापासून मेंदूमधील दुखापत, मेंदूला झालेला जंतूसंसर्ग, जेनेटिक आजार आकडीसाठी कारणीभूत ठरल्याचे दिसतात. ऑक्सिजन आणि शर्करेच्या कमतरतेमुळे नवजात अर्भक जन्मताना किंवा जन्मल्यावर काही दिवसात त्याच्या मेंदूला दुखापत होऊ शकते. त्याशिवाय रस्त्यावरील अपघातांमुळेही आकडी सुरू झाल्याचे दिसते. आकडी कोणत्याही वयात सुरू होऊ शकते. बहुतांश वेळी लहान वयातच त्याची सुरुवात होते आणि वयानुसार त्याचा प्रभाव वाढत जाते.
आकडीच्या ७० टक्के रुग्णांना औषधामुळे आजार मर्यादित पातळीत ठेवता येतो. गेल्या दशकभरात उपलब्ध झालेल्या अनेक नव्या औषधांमुळे दुष्परिणाम कमी झाले आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार आकडीचा प्रकार, त्यामागची कारणे बदलत असतात. त्यामुळे योग्य औषधांची निवड केल्यास आकडीचा आजार असलेल्या व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात.

औषधोपचार शक्य
आकडीवर उपचार करणाऱ्या विशेषज्ञाचा किंवा मेंदूविकारतज्ज्ञ आकडीबाबत माहिती व औषधे देऊ शकतात. भारतात आकडीवर स्वस्त औषधे उपलब्ध आहे. पहिल्याच वेळी योग्य औषध वापरल्यामुळे ६० टक्के रुग्णांना फायदा होतो तर दोन औषधांचा वापर करून त्यापुढील १३ टक्के रुग्णांवर चांगले परिणाम दिसून येतात. औषधांमुळे आकडीची वारंवारता कमी होते पण आकडी पूर्ण जात नाही. बहुतांश रुग्णांना वयोमानानुसार आकडी येण्याचे प्रमाण कमी होते व ते कालांतराने औषध घेणे बंद करू शकतात. साधारण दोन ते पाच वर्षांच्या काळापर्यंत औषधे दिली जातात. काहींना जास्त कालावधीसाठी औषधांची गरज असते. औषधे थांबवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मध्येच उपचार थांबवू नका. सकस आहार व पुरेशी झोप यामुळे आकडी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. २० ते ३० टक्के लोकांमध्ये औषधे घेऊनही आकडी सुरू राहते. यापैकी काही रुग्णांना शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र मेंदूशी संबंध असल्याने सर्व प्रकारच्या चाचण्या व साकल्याने विचार करूनच यासंबंधी निर्णय घ्यायला हवा. योग्यप्रकारे निवड केल्यास शस्त्रक्रिया सुरक्षित असू शकते.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?
Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

गैरसमजुती टाळा
आकडी हा दमा किंवा मधुमेहासारखा सर्वसाधारण आजार आहे. मात्र या आजाराविषयी असलेल्या गैरसमजामुळे आकडी असलेल्या व्यक्तींचे आयुष्य तणावात जाते. आकडीच्या उपचारांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारचा खर्च असतो. रुग्णालय, उपचार, औषधे, घरातील उपचारांसाठी प्रत्यक्ष खर्च करावा लागतो. कुटुंबीयांचा वेळ व उत्पादनक्षमता तसेच फुरसतीच्या वेळेचा अपव्यय ही हानीही मोठी असते. दु:ख, वेदना आणि सामाजिक कलंक हे सर्व अप्रत्यक्ष खर्चात येते. यांची तुलना करता या आजारात २७ टक्के प्रत्यक्ष तर ७३ टक्के अप्रत्यक्ष खर्च होतो. पाप-पुण्याशी संबंध न लावता योग्य उपचार घेतले तर अशा व्यक्ती सामान्यांसारखेच आयुष्य जगू शकतात. आकडी असलेली व्यक्ती सामान्याप्रमाणेच अभ्यास, काम, छंद जोपासू शकते. लग्न करू शकते व त्यांना निरोगी अपत्यही होऊ शकते.
डॉ. जयंती मणी -jayanti.mani@gmail.com