studyकोणत्याही क्षेत्रात व कामात जितके नियोजन उत्तम, तितकीच यशाची खात्री अधिक असते. अभ्यासाबाबतही हे तितकेच खरे आहे. परीक्षा जेमतेम महिन्यावर येऊन ठेपलेली असताना आता आपल्याला वेळेचे नियोजन करायला हवे. अभ्यासाचे नियोजन करताना वाचन, स्मरण आणि लेखनाचा वेग वाढवण्यासाठी वेळेची खास तरतूद करणे योग्य ठरेल. वाचायला पुरेसा वेळ मिळाला नाही किंवा उत्तरपत्रिका लिहून झाली नाही वा येत होतं, पण आयत्या वेळी विसरायला झालं, या साऱ्या सबबीमागचं सत्य एकच असतं की, आपला वेग आणि सराव कमी पडला. त्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा.

ऐन परीक्षेच्या वेळी केवळ परीक्षेचा दिवस अभ्यासाला मिळणार आहे. त्याअगोदर जितके विषय तितके दिवस अभ्यासाला राखून ठेवा. परीक्षा केव्हा आहे ते एव्हाना समजलं असेल. हातात तयारीला असणाऱ्या दिवसातून हे दिवस वजा करा. उरलेल्या दिवसांना विषयांच्या संख्येने (१०० गुण) भागा, येणारा भागाकार एवढेच दिवस तुम्हाला आता तयारीला मिळणार आहेत. त्यात पूर्ण उजळणी व्हायला हवी. पुस्तक, वही, प्रश्नोत्तरे, टिपणं यांचं वाचन. मग स्मरण. आठवत नसेल तर तेवढाच भाग पुन्हा आठवणं. नेमकी उत्तरे (गाळलेल्या जागा भरा, व्याख्या, समीकरण) तशीच्या तशी लिहून बघणं, आकृत्या, नकाशे डोळ्याखालून घालणं, कोणताही विषय वा विषयातील एखादा भाग अजून कळला नाही असा राहिला नाही ना याची खात्री करून घेणं हे सारे अभ्यासाचे टप्पे महत्त्वाचे आहेत. बरेचदा वह्य़ा-पुस्तके शोधण्यातच वेळ जातो. म्हणून एका विषयाच्या सर्व वह्य़ा-पुस्तकांना एकाच प्रकारचे कव्हर घाला अथवा त्यावर एकाच प्रकारचा स्टिकर चिकटवा. काही विषयांचा काही भाग उदा. गणिते, भाषांमधील व्याकरण यांच्यासाठी दररोज वेळ राखून ठेवा. कारण एकाच दिवशी एक गोष्ट दहा वेळा करण्याऐवजी दहा दिवस रोज एकदा करून ती दीर्घकाळ लक्षात राहते. योगासने आणि व्यायामासाठी, मोकळ्या हवेतले खेळ खेळण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे राखून ठेवा. याने मेंदू ताजातवाना आणि मन ताणरहित राहते. मेंदूची कार्यक्षमता वाढते. या संपूर्ण दिवसभरात जिथे वेळ वाया जात असेल वा तुम्ही विनाकारण जास्त वेळ देत असाल तर तो शोधा. टीव्हीचा व मोबाइलचा वापर किमान करा. काही दोन अथवा अधिक कामे एकाच वेळी करता आली तर तुम्ही दिवसाच्या २४ तासांचे २८, ३० तास करू शकाल. उदा. प्रवासात वाचन, स्वत:ची तयारी करताना पाठांतर, मित्रांशी गप्पा मारताना उजळणी व आकृत्या चित्रांचा सराव.
एरवी उठता त्यापेक्षा किमान दोन तास अगोदर उठण्याचा सराव करा. एक तर सूर्योदयापूर्वी उठणारा यशस्वी, तेजस्वी होतो असे मानले जाते. त्यावेळी मेंदू ताजातवाना असतो. त्यासाठी झोपताना रोज स्वयंसूचना द्या, ‘मला उदा. पहाटे साडेपाचला जाग येणार आहे..’ आपोआप जाग येईल. याशिवाय लवकर उठण्याने दिवसा डोळ्यावर झोप आलीच तर मेंदूला पूर्वसूचना द्या. तुम्हाला पामिंग (बंद डोळ्यांवर तळवे ठेवणं) करता येईल, त्यामुळे रिलॅक्स व्हायला मदत होईल. तसेच जे करताय त्याहून वेगळं काम करायला घेणं, फेरफटका मारणं असं केलं की झोप उडेल.
रोज रात्री झोपताना दिवसभर झालेल्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि रोज उठताना दिवसभर काय करणार हे आठवून बघा. प्रत्येक प्रकरण, पाठ, पाठय़ांश झाल्यावर काय वाचलंत ते आठवून पाहा. रोज किमान अर्धा तास आणि सुट्टीच्या दिवशी संपूर्ण पेपर घडय़ाळ लावून सोडवा. त्यासाठी प्रथम प्रश्नपत्रिका वाचा. सर्व प्रश्न सोडवता येतात ना याची खात्री करा. मग लिहायला घ्या. वेळ दुपारची अथवा लेखी पेपर ज्या वेळेस असतो तीच ठेवा.
ऐन परीक्षेच्या वेळी फारच थोडा वेळ हातात असणार आहे. म्हणूनच त्या वेळेत समाधानकारक अभ्यास होण्यासाठी आता तयारी करा. जसे महत्त्वाच्या शब्दांखाली रेखांकन, वाक्यांना कंस, फ्लोरोसंट पेनचा वापर, किमान पाठाचं सार थोडक्यात लिहून तयार करणं. यासाठी सुटय़ा, छोटय़ा कागदांचा वापर करा. महत्त्वाच्या व्याख्या, समीकरणं, मोठय़ा उत्तरांचे बनवलेले कोडवर्डस् अथवा मुद्दे छोटय़ा, छोटय़ा तळहाताएवढय़ा कागदांवर लिहून घ्या. म्हणजे हाताळायला सोपे जातील. सतत वाचत राहाता येतील. सर्व अभ्यासक्रमावर केवळ नजर फिरवून त्याचा आवाका घेण्याचा प्रयत्न करा. जणू प्रत्येक पानाचा फोटो काढून तो तुम्ही तुमच्या स्मरणशक्तीत साठवून ठेवत आहात. थोडक्यात- दृक्स्मरणशक्तीचा वापर करा. वादविवाद, संघर्ष टाळा. रोज मनाशी बोला- ‘मला उत्तम यश मिळणार आहे.’आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
goreanuradha49@yahoo.in

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण