नोकरी तसेच व्यापार करण्याकरता विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे अत्यावश्यक असते. हे लक्षात घेत केंद्र सरकारने कौशल्यांवर आधारित काही विशिष्ट प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. नव्याने सुरू झालेले हे अभ्यासक्रम तुम्ही राहत असलेल्या शहरापासून दूर अशा शहरात उपलब्ध असले तरीही ते अल्पावधीचे असल्याने तुम्हाला काही दिवसांत पूर्ण करता येतील, या हेतूने या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून देत आहोत-
‘डिझाइन ऑफ इंटेलिजन्ट मशीन’ या विषयावर चेन्नईस्थित, एमएसएई डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट या संस्थेने  प्रशिक्षणक्रम सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते. संगणकीय सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्राचा वापर करून सध्या विविध प्रकारची यंत्रे, उपकरणे तयार केली जातात. इंटेलिजन्ट मशीनमध्ये विविध प्रकारचे रोबो, रोबोटिक्स हॅण्ड, स्पीच रिक्गनिशन, क्रिकेटमध्ये सध्या वापरात असलेले फोर्थ अंपायर, व्हॉइस सिंथेसिस, स्वयंचलित वाहने यासारख्या संयंत्रांचा समावेश होतो.
संगणकीय बुद्धिमत्तेचा वापर करून वेगवेगळ्या परिस्थितीत ही संयंत्रे विविध कामे अचूक करतात. ही बुद्धिमत्ता कृत्रिम असून त्यावर मानवाचे नियंत्रण असते. विशिष्ट प्रकारचे काम करण्यासाठी या यंत्रांचे सॉफ्टवेअरच्या स्वरूपात प्रोग्रॅिमग केले जाते. त्यानुसार ही संयंत्रे कार्यरत असतात. अशा इंटेलिजन्ट उपकरणांच्या डिझाइनचे प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत दिले जाते.
हे प्रशिक्षण २० दिवसांच्या कालावधीचे आहे. या प्रशिक्षणात इंटेलिजन्ट वस्तू विकासातील सद्य प्रवाह, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर, अ‍ॅक्चुरेटर्स, सॉफ्टवेअर प्रोग्रॅिमग, मॅटलॅब, मायक्रोकंट्रोलर, एम्बेडेड सिस्टीम्स, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, आर्टििफशिअल इंटेलिजन्सची तोंडओळख या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
संस्थेचा पत्ता-
असिस्टंट डायरेक्टर,
एमएसएमई-डीआय कॅम्पस, ६५/१
जीएसटी रोड, गिंडी, चेन्नई- ६०००३२.
वेबसाइट- http://www.msmedi-chennai.gov.in
सुरेश वांदिले