देशातील ३० कोटी हिंदी भाषिकांच्या हाती स्मार्टफोन देण्याच्या हेतूने प्रेरित भारतीय बनावटीच्या स्पाईस मोबाइल्सने बुधवारी अँड्राइड प्रकारातील हिंदी भाषेतील आज्ञावली असलेला ड्रीम उनो एच हा फोन सादर केला. नवी दिल्लीत यानिमित्ताने कंपनीचे मुख्याधिकारी प्रशांत बिंदल व मुख्य विपणन अधिकारी राजीव सेठी उपस्थित होते. स्पाईसचा हा नवा स्मार्टफोन म्हणजे गुगलद्वारे नुकताच सादर करण्यात आलेल्या अ‍ॅन्ड्रॉईड वन फोनवरच आधारित आहे. हिंदी कीबोर्डसह गुगलचे सर्च, यूटय़ुब, मॅप्स आदीही यात हिंदी भाषेतच देण्यात आले आहेत. ५ व २ मेगा पिक्सल कॅमेरा, विस्तारित ३२ जीबी मेमरी, ११.४३ सें.मी. स्क्रीन आदी वैशिष्टय़े असलेल्या या फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. स्पाईसचे सध्या देशभरात दोन कोटींहून अधिक ग्राहक आहेत. स्मार्ट फोनच्या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा पाच टक्क्य़ांच्या घरात आहे.