प्रश्न – माझ्या मोबाइलमधील संदेश किंवा फोटो इतर कुणालाही दाखवायचे नसतील तर सुरक्षेचे काही पर्याय आहेत का? असतील तर ते सुचवावेत. – शीतल दुरस्ते

उत्तर – तुम्ही अँड्रॉइड जेलीबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत. यात साध्या स्क्रीन लॉक सोबतच एनक्रिप्टेड स्क्रीनलॉकही वापरता येतात. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो. या फोन्समध्ये पासवर्ड, पीन, पॅटर्न आणि फेस अनलॉक अशा विविध प्रकारच्या लॉकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पिन किंवा पॅटर्न लॉक करताना ते थोडे वेगळे किंवा अवघड ठेवा म्हणजे मोबाइलचोराला किंवा हॅकरला ते उघडता येणे शक्य होणार नाही. जर कुणाला लॉक उघडता आले नाही तर फोन चोरीला गेला तरी तुमची माहिती तो मिळवू शकणार नाही. याचबरोबर तुमचे सर्व अॅप्स लॉक असणे आवश्यक आहे. विशेषत: व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरसारखे अॅप्स तर लॉक असणे केव्हाही चांगले. अॅप लॉक करणे ही मोबाइल सुरक्षेची दुसरी पातळी असू शकते. ज्यामध्ये चोराने किंवा हॅकर्सने तुमचे मुख्य लॉक उघडण्यात यश मिळवले तरी अॅप लॉक असतील तर त्याला अॅप्समधली माहिती मिळवणे शक्य होणार नाही. यासाठी अॅप लॉकसारखे मोफत अॅप्सही तुम्ही वापरू शकता. यामध्ये प्रत्येक अॅप वेगळे लॉक करण्याची गरज नसते. तुम्ही या अॅप्सच्या मदतीने तुमचे ई-मेल अॅप किंवा संदेशवहन अॅप एकत्र आणून त्यांना एकत्रित एक लॉक ठेवू शकतात.

प्रश्न – माझ्या जीमेल खात्यामध्ये पाच ते सहा हजार ई-मेल्स जमा झाले आहेत. ते डिलिट करण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगाव्यात. – सागर पवार
उत्तर – जीमेलमधले ई-मेल्स डिलिट करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. यात तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन बिफोर असा पर्याय दिला की त्याच्यासमोर तुम्हाला ज्या तारखेच्या आधीचे मेल्स हवे आहेत ती तारीख टाकावी. तारीख टाकताना वर्ष, महिना आणि तारीख या स्वरूपात टाकावी. असाच पर्याय आफ्टर यासाठीही आहे. तसेच तुम्हाला काही मोठय़ा साइजचे मेल डिलिट करावयाचे असतील तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये साइज असे टाइप करून त्याच्यापुढे १० एबी, १५ एमबी असे टाइप करू शकता. याचबरोबर तुम्ही नावानेही ई-मेल सर्च करू शकता. या सर्चचे जे निकाल येतील ते सर्व निकाल सिलेक्ट करून तुम्ही मेल डिलिट करू शकता. डिलिट झालेले मेल प्रथम ट्रॅशमध्ये जातात. यामुळे ट्रॅश एम्प्टी करणे गरजेचे आहे.

तंत्रस्वामी या सदरात प्रश्न पाठवण्यासाठी lstechit@gmail.com<mailto:lstechit@gmail.com> वर ई-मेल पाठवा.