सर्वोच्च उंची लाभल्यामुळे ‘एव्हरेस्ट’ हे सतत चर्चेत राहणारे हिमशिखर आहे. दरवर्षी त्याच्या निघणाऱ्या मोहिमांपासून ते त्याबाबतच्या विविध उपक्रम- विक्रमांपर्यंत विविध गोष्टींची चर्चा या नावाभोवती घडत असतात. यातूनच गिर्यारोहण जगात या शिखराबद्दल अनेक मतप्रवाह देखील तयार झाले आहेत. यावर आधारीत एक परिसंवादाचे आयोजन मुंबईतील ‘हिमालयन क्लब’ने १४, १५ फेब्रुवारी रोजी केले आहे.
या विशेष परिसंवादात व्हीक्टर सॉड्रस, दावा स्टीपन शेर्पा, दिव्येश मुनी, उमेश झिरपे, डॉ. मुराद लाला, हरिष कपाडीया हे मान्यवर गिर्यारोहक सहभागी होणार आहेत. तर ज्येष्ठ गिर्यारोहक लिंडसे ग्रिफीन हे या चर्चासत्राचे अध्यक्ष आहेत. ग्रिफीन हे ‘अमेकिन अल्पाईन क्लब’ आणि ‘माऊंट एव्हरेस्ट फाउंडेशन’चे अध्यक्ष आहेत. व्हिक्टर सॉंड्रस हे ब्रिटिश गिर्यारोहक असून त्यांनी जगभरात अनेक ठिकाणी आरोहण केले आहे. या चर्चेत ते ‘व्हिडीओ कॉन्फरस’च्या माध्यमातून उपलब्ध असतील. दावा स्टिफन शेर्पा यांनी आजवर दोन वेळा ‘एव्हरेस्ट’वर आरोहण केले आहे तर गेल्या काही वर्षांत ‘एव्हरेस्ट’वरील कचरा आणि प्रदूषण दूर करण्यासाठी त्यांनी मोहिमा आखल्या आहेत. झिरपे यांनी आजवर एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालु या आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या तीन शिखरांवरील नागरी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे. डॉ. लाला यांनी २०१३ मध्ये ‘एव्हरेस्ट’वर यशस्वी आरोहण केले आहे. कपाडीया हे ज्येष्ठ गिर्यारोहक लेखक असून त्यांनी हिमालयातील अनेक अस्पर्शित परिसरात भटकंती आणि लेखन केले आहे.
१४ फेब्रुवारीला ग्रिफीन यांच्या सादरीकरणाने या परिसंवादास सुरुवात होणार आहे. १९९० मध्ये एका छोटय़ा चमूच्या मंगोलियातील मोहिमेत झालेल्या अपघातानंतर प्रतिकूल परिस्थितीत केलेली सुटका आणि त्या मोहिमेतील थरार ते आपल्या सादरीकरणात मांडणार आहेत. ‘हिमालयन क्लब’तर्फे दरवर्षी देण्यात येणारे ‘केकू नवरोजी बुक अ‍ॅवॉर्ड’ इंग्लंडचे टॉनी स्मिथ यांच्या ‘माय फादर फ्रॅक’ या पुस्तकास देण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात गिर्यारोहण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘जगदीश नानावटी सन्मान’ प्रदान करण्यात येईल. माटुंग्यातील ‘द म्हैसूर असोसिएशन’च्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहीतीसाठी ०२२-२४९१२८२९ अथवा events@himalayanclub.org वर संपर्क साधावा.