पावसाळा, हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळा हा तसा सरसकट भटकंतीसाठी प्रतिकूल हंगाम. वर आग ओकणारा सूर्य, सर्वत्र करपलेला भवताल, पाण्याचे दुर्भिक्ष्य या पाश्र्वभूमीवर भटकंतीचे नाव देखील अनेकांच्या पोटात गोळा उभा करते. पण तेच दुसरीकडे सुटय़ांचा हंगाम, मित्रांबरोबर भटकण्याची ओढ यातून बाहेर पडण्याचा मोहही अनेकांना सोडवत नाही. तेव्हा अशाच उन्हाळी भटकंतीला ‘सावली’ देणाऱ्या या चार गोष्टी.

* उन्हाळी भटकंतीत स्थळ निवडीपासूनच सावधपण असावे. हिरवीगार जंगले, पाणथळींच्या जागा, नद्यांची खोरी, देवराया, कलात्मक मंदिरे, लेण्या, भूदुर्ग, जलदुर्ग, समुद्र किनारे, खाडय़ांचा प्रदेश या स्थळांचा भटकंतीसाठी विचार करावा.
* उन्हाळी भटकंतीत वेळही महत्त्वाची. डोक्यावरचे ऊन तापण्यापूर्वीच भल्या सकाळी निघावे आणि ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी परतावे. यामध्ये उर्वरित दिवस ठरलेले स्थळ पाहण्यासाठी मिळतो.
* उन्हाळी भटकंती वेळी अंगावर साधे, सुती आणि सैल कपडे घालावेत. डोक्यावर टोपी, कान-मान झाकणारा रुमाल अवश्य बरोबर घ्यावा. तंग, पॉलिस्टरचे कपडे घालू नयेत.
* थेट उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल आणि सनस्क्रिन लोशन’चाही उपयोग होतो.
* उन्हाळी भटकंती वेळी पुरेसे पाणी, लिंबू-मीठ-साखर, इलेक्ट्रॉल-ग्लुकोज पावडर अवश्य बरोबर ठेवावी.