सातारा जिल्ह्य़ातील माण-खटाव तालुक्यांचा भाग म्हणजे सारा दुष्काळी पट्टा. या भागात डोंगरांच्या तुरळक काही रांगा दिसतात. पण त्या साऱ्या भकास-उघडय़ा बोडक्या. या डोंगररांगांवरच काही गडकोटही विसावले आहेत. यातलाच हा वडूजजवळचा भूषणगड!
साधारण ९७० मीटर उंचीचा हा गड सातारा जिल्ह्य़ातील वडूजपासून १७ किलोमीटरवर आहे. पायथ्याशी भूषणवाडी. या गावातूनच एक पायरीमार्ग गडावर निघतो. साधारण अर्धाएक तासात आपण गडाच्या प्रवेशद्वारात दाखल होतो. ही प्रवेशद्वारे आता ढासळली आहेत. पण त्याच्या त्या कमानी, भोवतालची तटबंदी आपले स्वागत करते.
भूषणगडाचा माथा आटोपशीर आहे. त्यावर वृक्षारोपण केल्याने तो अन्य भागाच्या तुलनेत हिरवा वाटतो. या वृक्षराजीतच मग एकेक दुर्ग अवेशष दिसू लागतात. हरणाई देवीचे मंदिर, महादेवाचे मंदिर, तळी, विहिरी,
जुन्या इमारतींचे चौथरे आदी वास्तू डोकावू लागतात. या वास्तूंमध्ये चिंचेचा एक जुना वृक्षही लक्ष वेधून घेत असतो. साधारण एक

तासाभरात आपण ही भूषणगडाची दुर्गफेरी करून मोकळे होतो. या भटकंतीमध्ये हाताशी वाहन आणि वेळ असेल तर इथून जवळच असलेला वडूज-कोरेगाव रस्त्यावरील वर्धनगडही पाहता येतो. माणदेशीचे हे गडकोट उंचीने थोटके असले तरी दुर्गाच्या जगात मात्र आपल्याला रमवून टाकतात.