ऐन घाटमाथ्यावरच्या त्या सरळसोट प्रस्तरभिंती..कातळाला शरीर भिडवत, त्यातील खोबण्यांमध्ये आपली बोटे अडकवतच माकडाप्रमाणे वरवर चढायचे..खाली पाहिले तर सर्व बाजूस खोल दरी..उभ्या कातळावरचे हे आव्हान आणि भीती दाखवणारी खोल दरी या साऱ्यांचे भय घेत त्या चार चिमुरडय़ांनी गिर्यारोहणात साहसाचा नवा अध्याय रचला आणि तेलबैलाच्या भिंतीही अभिमानाने दीपून गेल्या.

मुंबईतील ‘आयसोलेशन झोन’ या संस्थेचे हे यश. संस्थेच्या काíतक आयरे, प्रथम वडे, रोहन पवार आणि शेजल चव्हाण या अवघ्या ११ वर्षांच्या चार चिमुरडय़ांनी हे साहसी पाऊल टाकले. यातील कार्तिकने तर या संपूर्ण चढाईत नेतृत्व करत चढाईचा मार्ग आखत नवा पराक्रमच केला आहे.
लोणावळय़ाच्या दक्षिणेस जाऊ लागलो, की सह्याद्रीचा ऐन घाटमाथ्यावर आपण येऊ लागतो. या माथ्यावर पर्वत, कडे आणि सुळक्यांचा हा खेळ आणखी अंगावर येतो. यामध्येच सालतर खिंडीच्या पुढे तेलबैला गावाच्या मागे या दोन प्रस्तरभिंती उभ्या आहेत. चारही बाजूने सोलून काढलेल्या या भिंतींची समुद्रसपाटीपासून उंची आहे तब्बल ३३२२ फूट. तर प्रत्यक्ष उंची अडीचशे फुटांच्या घरात. या अशा भिंतीवर ‘आयसोलेशन झोन’च्या या मुलांनी नुकताच इतिहास घडवला. गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, सराव आणि मार्गदर्शन घेतलेल्या या चिमुरडय़ांनी या दोन्ही भिंती एकामागे एक सर केल्या. या संपूर्ण चढाईत या मोहिमेचे नेतृत्वही या मुलांपैकीच कार्तिकने केले. या वेळी अंजली परब, प्रमोद चव्हाण आणि अरुण सावंत आदी गिर्यारोहकांनी त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले.