गड-किल्ल्यांच्या बिकट अवस्थेविषयी केवळ ओरड करण्यापेक्षा स्वत: सक्रिय झाल्यावर अशा ठिकाणी काय बदल होऊ शकतो हे नाशिक येथील ‘शिवकार्य गडकोट मोहीम’ या संस्थेने दाखवून दिले आहे. अवघ्या एका वर्षांत या संस्थेने १३ ठिकाणच्या मोहिमा पूर्ण करत नाशिकमधील १३ किल्ल्यांवर संवर्धनाचे काम पूर्ण केले आहे. दुर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या या संस्थेचा येत्या २९ जून रोजी वर्धापन दिन साजरा होत आहे.
दुर्गसंवर्धनाच्या या चळवळीचा जिल्ह्य़ातील गिरणारे गावात एका श्रमदानातून प्रारंभ झाला. या गावातील भग्नावस्थेत असलेल्या पेशवेकालीन तीन विहिरींना गतवैभव देण्यासाठी ही श्रमदानाची चळवळ सुरू झाली. सतत सात वर्ष हेश्रमदान करण्यात आले. सिडको महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्य त्यासाठी लाभले आणि या साऱ्या प्रयत्नातून या विहिरींना गतवैभव पुन्हा प्राप्त झाले.
प्रा. सोमनाथ घुले आणि सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचे लक्ष मग भोवतीच्या गडकोटांकडे गेले. गावात श्रमदानाने जे करू शकतो, ते शिवरायांच्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी का नाही असा विचार करून या दुर्गप्रेमींनी संवर्धनाची चळवळ उभी केली. दर महिन्याला एका किल्ल्यावर जायचे. तिथला कचरा गोळा करायचा. वास्तूंची साफसफाई करायची. टाक्यांमधील गाळ काढायचा. उघडय़ा-बोडक्या डोंगरांवर वृक्षारोपण करायचे असे हे कार्य सुरू झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराई किल्ल्यावर सुरू झालेल्या या मोहिमेत मग रामशेज, राजदेहेर, वाघेरा, श्रीगड, भास्करगड, हरिहर, नाशिक-नगरच्या सीमेवर असलेला विश्रामगड, रांजणगिरी असे एकेका किल्ल्यांचे संवर्धन होऊ लागले. या उपक्रमात शालेय विद्यार्थी देखील सहभागी होऊ लागले. या अशा उपक्रमांच्या प्रसारासाठी काही स्पर्धा-उपक्रमही सुरू करण्यात आले. दुर्गम भागातील देवडोंगरा ते खैराई या पाच किलोमीटरच्या सायकल स्पर्धेत ४० मुलांनी सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. गड-किल्ल्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळांमध्ये संस्थेतर्फे व्याख्यानेही दिली जातात. गेले वर्षभरात मोहिमेचे हे कार्य अधिक व्यापक झाले आहे. या कार्यक्रमाच्याच तपपूर्तीनिमित्त येत्या २९ जून रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नाशिक येथील प्रबोधनकार ठाकरे पत्रकार भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात इतिहासकार पी. के. आंधळे पाटील, इतिहास संशोधक मुरली खैरनार, लेखक नंदन रहाणे मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी संस्थेच्या १३ मोहिमांचा माहितीपट दाखविला जाणार आहे. छायाचित्र प्रदर्शन आणि परिसंवाद अशा कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे.